Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

विलक्षण मनस्वी
जनवादी महिला संघटनेच्या अग्रभागीच्या फळीतील धडाडीच्या कार्यकर्त्यां ही कॉ. कालिंदी देशपांडे यांची सामाजिक ओळख होती. कुटुंबियांसाठीही त्या म्हणजे एक प्रेमळ आधारवड होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या ‘ज्योतीवन्सं’नी चितारलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व-
कॉ.कालिंदी देशपांडे- जनवादी महिला संघटनेच्या अग्रभागीच्या फळीतील धडाडीची कार्यकर्ती. स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात पोटातल्या संतापाला नियोजनबद्ध मांडणीची चौकट घालत, पोलीस स्टेशनातून, कोर्टातून धडका मारणारी, नेटानं-चिकाटीनं एक-एक प्रकरण हातावेगळं करणारी लढाऊ सैनिक..

 

दिल्लीतल्या जुग्गी झोपडीतल्या अशिक्षित स्त्रियांपर्यंत आपला मुद्दा- विचार सोप्या-सरळ भिडणाऱ्या पद्धतीनं पोहोचवणारी, पोटात माया घेऊन वावरणारी एक माणूस- कॉ. कालिंदी देशपांडे.
एक अष्टावधानी आणि विलक्षण कार्यकर्ती हा तिचा लौकिक गेल्या ३०-३५ वर्षांतला. पण त्या आधीही जगण्याला चारी बाजूनं भिडण्याच्या तिच्या वृत्तीनं ती सदोदित कुठल्या ना कुठल्या मोहिमेत गुंतलेली असे. कधी दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांना स्वत: ड्रायव्हिंग करीत दिल्ली दाखवून आणायची, तर कधी सईबरोबर नाटकाची तालीम. शिवाय आप्त-मित्र-मंडळींना काही ना काही खास स्वत:च्या हातांनी करून जेवू घालणं, हाही तिचा अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा कार्यक्रम. पुढे मुलं जरा मोठी झाल्यावर तिनं J.N.U.  तून फ्रेंच घेऊन M.A. केलं. हे सगळं करीत असताना घरातल्या आघाडय़ाही कुशलतेनं सांभाळणारी आमची ही थोरली वहिनी. प्रसिद्ध विचारवंत व नाटककार गो. पु. देशपांडे यांची पत्नी.
हिला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती माणिक ऐनापुरे होती. तसं खरं तर पहिल्यांदा मी तिला नेमकं कधी पाहिलं हे आठवत नाही. धारदार नाकाच्या, टपोऱ्या डोळ्यांच्या एका मुलीचा फोटो रहिमतपूरच्या आमच्या घरी प्रथम पोहोचला. तो सर्वानी नवलाईनं आणि उत्साहानं पाहिला. माणिक ऐनापुरे गो. पु.ला दिल्लीत भेटली आणि लवकरच तो तिला रहिमतपूर दाखवायला घेऊन येणार आहे आणि मग तिला हुर्डा खायला शेतातही न्यायचं आहे, ही बातमी आम्ही शाळाभर पसरवली.
लग्नापूर्वी तिनं मला (व माझ्या भावंडांनाही) विचारलं, ‘मी आता इथून पुढं काय म्हणू तुला? ज्योती, ज्योतीताई. ज्योतीवन्सं? यातलं काय?’ हे तिचं असं विचारणं मला लईच भारी वाटलं तेव्हा. मग मी (पोटात गुदगुल्या होत असूनही) खूप गंभीरपणे तिला वन्सं म्हणण्याचा आदेश दिल्याचं आठवतं.
गो. पु. व माणिकचं लग्न होईपर्यंतच्या पुढल्या काळात आम्हाला वेडावूनच टाकलं या तरुण मुलीनं. साध्या साध्या क्षणांचेही उत्सव करून टाकण्याची तिची रीत. रोजच्या दिनक्रमाच्या गोष्टीही नेटकेपणानं, शिस्तीनं आणि प्रसन्नतेनं करण्याची तिची हातोटी. लहानसहान वाटणारी कामंही तपशिलातून, व्यवस्थित करण्याबाबतचा कटाक्ष आणि हे सर्व लीलया करीत जाताना कुटुंबातल्या प्रत्येकाशी भावबंध जोडत नेणारी एक संवेदनशील माणूस! आज ती नसताना पुन्हा नव्यानं माझ्या डोळ्यांसमोर येते आहे.
माणिकच्या पोटात राग मावत नसे. वादविवादाची खुमखुमी असे तिला कायम. माझ्या-तिच्यात झडलेले अनेक वाद आठवताना एक गोष्ट लख्खन हाताला लागते. आम्ही एकमेकांशी भांडत गेलो ते प्रत्येक वेळी अधिक जवळ येण्यासाठी. शेवटी शेवटी तर सगळे राग वितळून गेले आणि लोभ उजळून निघाले. असं निकोप नातं फार क्वचितच हाताला लागतं.
आम्ही रहिमतपूरच्या मुलींनी तेव्हा जग नव्हतं पाह्य़लं फारसं. सेवादल-कलापथकासाठी पुण्यापर्यंत जाणं होई तेवढंच. बाकी आमच्या रहिमतपूरच्या घरासारखे स्वच्छंदच होतो आम्ही. माणिक भेटण्यापूर्वी आवाबेन नावाचं तेजाळ डोळ्यांचं माणूस आमच्या घरात दाखल झालं होतं.. (आमची काकू. सेवादल कलापथकाची कार्यकर्ती. नंतर तिने अखेपर्यंत कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली.) या मुक्त कलासक्त वाऱ्याचा हात धरून आम्ही नुकती कुठं पळायला सुरुवात केली होती आणि त्या पाठोपाठ ही भेटली माणिक. या दोन बायांनी आमच्या जगण्याचा पोतच बदलून टाकला. माझ्या वात्रट म्हणावं अशा वयात जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र असू, तेव्हा तेव्हा माणिक सतत माझ्या अनघड मनाशी संवाद साधायच्या उद्योगात आनंदानं आणि आत्मीयतेनं मग्न होऊन जायची.
लग्नाआधी माणिक होमगार्डस्मध्ये मोठी अधिकारी होती. वॉर्डन रोडला तिच्या जंगी क्वार्टर्स होत्या. तिथून अमुक नंबरच्या बसमध्ये चढ आणि सिटीलाइटला उतर, असं तिनं माझ्या बावरलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करून ठाम आवाजात सांगितल्याचं आठवतं.. हे करताना तिनं जाणीवपूर्वक माझ्या रहिमतपुरातच भिरभिरणाऱ्या डोळ्यांना बाहेरच्या जगाकडे वळवलं होतं.
एका जिंदगीत खूप मोठा प्रवास केला तिनं. एक संवेदनशील, बुद्धिमान, विवेकी माणूस असाल तुम्ही तर स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी किती आणि काय काय करू  शकता, याचा वस्तुपाठच देऊन गेली आहे ती.
होनाजी बाळाची एक सुरेख लावणी आहे, गो. पु.च्या खास आवडीची. गो. पु.चं कवितेवरचं, मराठी भाषेवरचं प्रेम अनेकांना माहिती आहेच. पण वास्तवात त्यालाही भेटली होती ही एक..
पाक सूरत कामिना
की दाही बोटी मिना
हाता मधे वीणा घेऊन गाशी
तुला गुणिजन अवघे चाहती
तुला गुणिजन अवघे चाहती
ज्योती सुभाष