Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

गराज सेल : सौहार्दाचा अंश
माझा मुलगा व त्याचे बाबा त्यांची सकाळची चालण्याची रपेट संपवून घरी आले तेव्हा त्यांच्या हातात चार-सहा चिमुकल्या बश्या होत्या. त्या मला दाखवत लेक म्हणाला, ‘आई, आज शनिवार. गराज सेल सुरू झालेत. हे कोस्टर्स बघ आम्ही तिथूनच आणलेत. आपण सगळे नाश्ता उरकून गराज सेल पाह्यला जाऊया.’ मी म्हटलं, ‘व्वा! मज्जाच मज्जा!’ माझा नातू उठल्यावर मी त्याला म्हटलं, ‘आता आपण गराज सेलला जायचं. एक वेगळंच अमेरिकादर्शन असतं ते.’ सकाळची आन्हिकं उरकून आम्ही निघालो. मुलानं नेटवरून गराज सेलच्या पत्त्यांची नोंद करून घेतली होतीच. एक सेल तर अगदी जवळच होता. तिथं आम्ही पायी पायीच निघालो. चार पावलं चालल्यावर एका घराच्या अंगणात मोठमोठय़ा छत्र्या उघडून ठेवलेल्या दिसल्या. त्याखाली अनेक

 

वस्तू टेबलांवर मांडून ठेवल्या होत्या. जाणाऱ्या-येणाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी छान रंगीबेरंगी फुगे हवेत लहरत ठेवले होते. आम्हाला पाहताच त्या कुटुंबानं हसतमुखानं आमचं स्वागत केलं. तिथं खूप खेळणी, कपडे, बूट, स्वयंपाकघरातील देखणी भांडीकुंडी, शोभेच्या वस्तू असं सारं मांडून ठेवलं होतं. प्रत्येक वस्तूवर अपेक्षित किंमत लिहिली होती. एका टेबलावर तर बऱ्याच भेटवस्तू पॅकबंद अवस्थेतच मांडल्या होत्या. त्या कुटुंबातल्या मालकिणीला मी म्हटलं, ‘हा माझा नातू. अमेरिका बघायला आला आहे. त्याच्या आई-बाबांनी त्याला इथली प्रेक्षणीय स्थळं दाखवली. मी आज त्याला अमेरिकन माणसं दाखवायला घेऊन आले आहे. तुमच्या जीवनशैलीची अनेक शिस्तप्रिय अंगं मला भावतात. त्यातलाच एक हा गराज सेल.’
हे ऐकून ती अगदी खूश झाली. माझ्या नातवाच्या बोटाला धरून ती आम्हाला खेळण्याच्या ढिगाऱ्याकडे घेऊन गेली. तिथं एका चटईवर खूप सॉफ्ट् टॉइज् होती. ती म्हणाली, ‘ही बघ- सारी माझ्या मुलांची खेळणी. खेळणी कसली ती! त्यांची त्या वयातली दोस्त मंडळीच म्हणायची. हा ससुल्या आहे नं तो माझ्या मुलाचा. त्याचं नाव त्यानं ठेवलं होतं ‘फझी’! आणि ही माऊ माझ्या लेकीची. हिचं नाव ठेवलं होतं ‘सुझी’! मग थोडी हसत, मुरकत माझ्याकडे बघत ती सांगू लागली, ‘सारखी भांडायची दोघं आणि क्षणात एक व्हायची. मग कधी कधी नं ती दोघं खेळता खेळता या फझी आणि सुझीची भांडणं लावून द्यायची. काय मजा यायची ती भांडणं बघताना! मुलांच्या मनात दडलेल्या कितीतरी गमतीजमती कळायच्या मला त्या भांडणांतून. आज इतक्या वर्षांनी ते सारं आठवतानाही किती हसू येतंय बघ मला!’
माझ्या नातवानं त्या खेळण्यांतून एक टेडी बेअर उचलला. तो पाहून ती त्याला सांगू लागली, ‘याची गंमत सांगू तुला? इथं मागच्या बाजूला बघ एक चेन आहे. ती उघडली की टेडीच्या तोंडातला दिवा लागतो. टेडी हसतोयसं वाटतं. त्या झिपच्या कप्प्यात टूथपेस्ट आणि ब्रश ठेवायला जागा आहे. लहान असताना माझा मुलगा कधी त्याच्या मित्रांच्या घरी राहायला गेला की याला सोबत न्यायचा आणि त्यालाच कुशीत घेऊन निजायचा.’
माझ्या नातवाला टेडी आवडलाच, पण गराज सेलची कल्पनाही खूप आवडली. माझं लक्ष पॅकबंद काचसामानाच्या टेबलाकडे गेलं. त्यात मला एका प्रसिद्ध पफ्र्युम कंपनीचा छाप असलेला चार बश्यांचा सेट दिसला. मी म्हटलं, ‘किती छान आहेत गं या बश्या!’ ती म्हणाली, ‘अगं, या माझ्या आजीनं मला ख्रिसमसला दिल्या होत्या. तिची ख्रिसमसची संध्याकाळ ती एका अनाथालयातल्या मुलांसोबत घालवायची. माझ्या घरी ती येऊ शकत नसे. तिची अनुपस्थिती जाणवू नये म्हणून तिनं खास नाताळसाठी आम्हा चौघांसाठी या बश्या दिल्या होत्या. पण खरं सांगू का? मी कधी हा सेट उघडलाच नाही गं. माझ्यासाठी खास ख्रिसमसला माझ्या घरी आलेली ती माझी आजी होती. दरवर्षी मी या बॉक्सला सुंदर रॅप करून सजवून ठेवायचे. आजीला कामाला कसं लावणार मी? आता सामान सांभाळणं झेपत नाही.’ मी त्या बश्या घेतल्या. सर्व पैसे देऊन आम्ही निघालो तेव्हा माझ्या नातवाला पाठीवर थोपटत ती म्हणाली, ‘या वस्तू तुझ्या घरी पण असाच आनंद देत राहतील बघ!’
त्यानंतर दर शनिवारी आम्ही निरनिराळ्या गराज सेलला जात राहिलो. एके ठिकाणी एका भल्यामोठय़ा खोक्यात देशोदेशीचे बीअर कॅन्स भरून ठेवले होते. ते अत्यंत उत्तम अवस्थेत होते. मी त्या माणसाला विचारलं, ‘किती वर्षे गोळा करीत होतास रे?’ तो म्हणाला, ‘खूप भटकलो. हे जेवढे कॅन्स दिसताहेत नं, तेवढय़ाच सुंदर सुंदर आठवणी आहेत त्या- त्या दिवसाच्या. आता मी फारसा देशाबाहेर जात नाही. म्हणून वाटलं, वेळीच सोपवावा कुणा हाती हा खजिना!’ मी म्हटलं, ‘येईल कुणीतरी तुझ्यासारखाच.’ तो म्हणाला, ‘येईल म्हणजे काय? अहो, आलाच. भल्या सकाळीच आला. नेटवर ही माहिती वाचल्यावर म्हणाला, भीती वाटली- कुणी त्याच्या आधी येऊन कॅन्स घेऊन गेला तर, म्हणून! सकाळी मॉर्निग वॉकला जातानाच आला. पैसे देऊन गेलाय. परतीच्या वाटेवर घेऊन जाईन म्हणालाय.’
एका सेलमध्ये तर प्रचंड प्रमाणात सामान मांडलेलं होतं. देशोदेशीच्या उत्तमोत्तम कलावस्तू तिथं होत्या. शोभेच्या वस्तू होत्या, तसाच तिथं एक उत्तम पुस्तकसंग्रहही होता. जुन्या रेकॉर्डस् होत्या. संपन्न अभिरुची असलेल्या कुणा माणसाचं ते घर असावं, असं ते सामान पाहूनच वाटलं. शोभेच्या वस्तूंपैकी तर काही अगदी असामान्य होत्या. अशा वस्तू कायमच फॅशनमध्ये असतात, राहतात. घरमालक जेमतेम पन्नाशीचा दिसत होता. त्याची बायकोही त्याच वयाची. आणि शेजारच्या खुर्चीवर बसलेली विशीतली त्यांची मुलगी दिसत होती. मी त्या बाईला म्हटलं, ‘इतक्या सुंदर वस्तू कुणाला देऊन टाकाव्याशा का वाटल्या तुम्हाला?’ त्यावर ती प्रौढा म्हणाली, ‘हे घर माझ्या बहिणीचं. नुकतीच देवाघरी गेली ती. तिला मूलबाळ नव्हतं. त्या नवरा-बायकोला प्रवासाची, वस्तू जमवायची खूप हौस. फार छान जगली ती दोघं. आता हे घर या माझ्या लेकीला दिलंय तिनं. हिचं लग्न आहे महिन्याभरात. म्हणून आज गराज सेल मांडलाय.’
मी त्या लेकीला विचारलं, ‘काय गं, तुला या वस्तूंचा मोह नाही झाला?’ ती म्हणाली, ‘मावशीनं मला आजवर खूपच वस्तू दिल्यात. तिनं मला इतकं प्रेम दिलंय, की खरं तर वस्तूंतून तिची आठवण ठेवायची गरजच वाटत नाही. मावशीकडे कुणीही- अगदी तिची आवडती वस्तू जरी मागितली, तरी लगेच त्याला ती वस्तू देऊन टाकायची. या वस्तू म्हणजे तिच्या सदिच्छा, आशीर्वाद आहेत, अशी माझी भावना झाली. घर आवरताना वाटलं की, या सदिच्छा खूप दूरवर पोहोचाव्यात. उगीच मोह का करायचा? मी तर आता तिच्या घरातच राहणार आहे नं लग्न केल्यावर?’
अमेरिकेतल्या बाजारू संस्कृतीनं तिथल्या रहिवाशांवर केलेलं गारुड मला खूप व्यथित करतं. मी तिथं जायला उत्सुक नसते. आता माझा लेक, सून तिथं आहेत म्हणून जावंसं वाटलं. तिथं गेल्यावर तिथल्या जगण्यातलं ‘अवघं वस्तूपण’ मला हरघडी अस्वस्थ करत होतं. त्यावर गराज सेलच्या निमित्तानं व्यक्तिगत पातळीवर घडत राहिलेलं हे अमेरिकन माणसाचं दर्शन छान मलमपट्टी करत राहिलं.
म्हणून मग मी आमच्या शिबिरासाठी, त्यातल्या मुलांसाठी अनेक वस्तू तिथून वेचून आणल्या. त्यात कुणा एका आजीबाईनं तिच्या नातवंडांसाठी विणलेला चिमुकला ससुल्या आहे. छान गुलाबी कोट घातलेला, गळ्यात लालचुटूक टाय बांधलेला. दोन बाजूंनी त्याचं तोंड दाबलं की तो हसतो आणि त्याच्या तोंडातून एक कँडी बाहेर पडते. मुलांना आल्या आल्याच तो कँडी देतो. असाच एक गमतीदार कँडी डिस्पेन्सर मला मिळाला. हल्ली इथं जागोजागी व्हेंडिंग मशिन्स आहेत. त्यात पैसे टाकले की चहा, कॉफी, चॉकलेट मिळतं. मी आणलेला डिस्पेन्सर घरगुती वापरासाठी आहे. वरच्या बाजूला एक कँडी भरलेली बरणी ठेवायची आणि सरकपट्टी सरकवायची. लगेच खालच्या इवल्याशा बादलीत ती भरून जाईल एवढी कँडी पडते. मी जेम्स घालून बरणी भरून ठेवते. थेट जॅक अ‍ॅण्ड जिलच्या गाण्यातून उचलून आणलेली ती बादलीही मुलांना आवडते. पण ती बादली ही मुलं वापरत नाहीत. ती सरळ तिथं आपली ओंजळ धरतात. पसाभर जेम्स्चा आनंद त्यांच्या डोळ्यांतून सांडतो.
अमेरिकन जीवनशैलीतून हरवत चाललेला सौहार्दाचा अंश मी अशा कैक वस्तूंतून इथं आणला आहे. ही मुलं खतपाणी घालून तो वाढवतील, त्याला जपतील. ती मोठी होतील तोवर यंत्रयुग कितीतरी पुढे गेलेलं असेल. त्या वेगापायी माणसांची कदाचित आणखी फरफट होईल. पण त्यावेळी स्वत:च एक वस्तू बनण्यापासून ही मुलं स्वत:ला नक्कीच वाचवतील, अशी खात्री या सौहार्दानं मला दिली आहे.
डॉ. लता काटदरे