Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

निकड गराज सेलची!
अमेरिकेतील गराज सेल म्हणजे आपल्याला नको असलेल्या वा अडगळ झालेल्या, परंतु सुस्थितीत असल्याने दुसऱ्याला उपयुक्त ठरू शकणाऱ्या हरतऱ्हेच्या वस्तू सेल लावून विकणे. आणि असे करण्यात तिथे कोणतीही लाज वा कमीपणा मानला जात नाही. खरं तर ही एक सामाजिक गरज पूर्ण करणारी अनुकरणीय गोष्ट आहे. सर्वच अमेरिकन मंडळींना ‘वापरा व फेकून द्या’ या वृत्तीने पछाडले आहे, अशी आपल्याकडे समजूत आहे. परंतु ती खोटी आहे, हे गराज सेलवरून लक्षात येते. अमेरिकेतल्या न्यू हॅम्पशायरच्या ‘पॉनशॉप्स’मध्ये लहान मुलांच्या वाढीबरोबर निरुपयोगी ठरलेले त्यांचे कपडे गोळा करून,

 

धुऊन व इस्त्री करून विकले जातात. ते घेण्यासाठी गरीब व श्रीमंतांचीही तिथे गर्दी होते. याखेरीज अथे नायलॉनच्या जुन्या मच्छरदाण्या, फोम, टायर वगैरे टाकाऊ वस्तूंतून नव्या वस्तूही बनविल्या जातात. हॉटेल्स तसेच घरोघरी त्या विकत घेऊन खुशीने वापरल्या जातात. तिथे अशा दुकानांची साखळीच असते. अशा प्रकारचे उद्योग आपल्याकडे काढल्यास इथेही नवे कारागीर निर्माण होतील, रोजगार व छंद वाढतील. एक नवे मार्केटही तयार होईल.
१९७९ मध्ये माझा भाऊ कंपनीतर्फे प्रशिक्षणासाठी सहा महिने जर्मनीला गेला होता. तो परतल्यावर मी त्याच्याकडून तिथले समाजजीवन व समाजव्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तिथे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याबद्दलची त्याने दिलेली माहिती खूपच उपयुक्त होती. तिथे दर तीन महिन्यांनी वृत्तपत्रांतून एक जाहिरात दिली जाते. एका विशिष्ट दिवशी आपल्याला नको असलेल्या वस्तू (जुने फ्रीज, टीव्ही सेट, खुच्र्या, टेबले, गाद्या वगैरे) घरासमोरील रस्त्यावर आणून ठेवायच्या. त्यातली कोणतीही वस्तू तेथील गरीब (?) माणसाला फुकट घेऊन जाण्याची मुभा असते. तीन दिवसांनी म्युनिसिपालिटीची गाडी येते आणि उरलेले सर्व सामान गोळा करून ती गाडी स्क्रॅप यार्डमध्ये जाते. आज ही प्रथा तिथे चालू आहे की नाही, माहीत नाही.
आपल्याकडे मध्यमवर्गीय व श्रीमंत वर्गाच्या मानसिकतेत हे बसणारे नाही, हे जाणूून १९९५ ते २००० यादरम्यान मी एक योजना राबवून पाहिली. एका पत्रकाद्वारे लोकांना आवाहन केले की, तुमची कोणतीही जुनी वस्तू सेकंड हँड म्हणून विकायची असेल तर आमचा फॉर्म भरून द्यावा. त्या माहितीच्या आधारे आम्ही दुकानासमोर एक फलक लावून ‘फ्रीज, कार, मोटरसायकल, फ्लॅट वगैरे विकणे आहे’ असे लिहीत असू. जो चौकशी करील त्याला वस्तूचे वर्णन, अपेक्षित किंमत व विकणाराचा पत्ता देत असू. चौकशी करणाऱ्याने मालकाची भेट घेऊन परस्पर व्यवहार करणे अपेक्षित असे. त्यात आमच्या मध्यस्थीची गरज नव्हती. आम्ही दलालीही घेत नव्हतो. बोर्डावर लिहिण्याकरता महिन्याभराचे पंचवीस-तीस रुपये शुल्क तेवढे घेत असू. याशिवाय कुणाला नोकर हवे असतील तर तीही सोय या योजनेत होती. त्यावेळी माझ्याकडे फोन नव्हता. तरीही सुमारे दोनशे लोकांनी या योजनेचा फायदा घेतला. दलाली न घेता लोकांचे जुने सामान विकून द्यायचे, हे उद्दिष्ट मनात ठेवून ही योजना आखली होती.
ही योजना बरीच वर्षे मनात घोळत होती. ती सुरू करण्यापूर्वी एका मित्राशी त्याबद्दल बोलत असता त्याने सांगितले की, विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात अशा स्वरूपाची योजना चालू आहे. तिथे जाऊन पाहिले तर त्यांच्या तळमजल्याच्या प्रवेशद्वाराशेजारी लोकांनी त्यांच्याच लेटरहेडवर लिहिलेली पत्रे नोटीस बोर्डावर लावलेली होती. त्याकरता नाममात्र फी तिथे घेतली जाते असे समजले. पुढे आम्ही दुकान बंद केले आणि ही योजनाही बंद पडली. मात्र, यात कोणताही आर्थिक लाभ नसल्याने त्याचे कुणी अनुकरण केले नाही.
घरोघरी जाऊन जुन्या कपडय़ांच्या बदल्यात भांडी देणाऱ्या बायका हा ‘गराज’ नसलेला फिरता बाजारच असतो. परंतु त्याला व जुने कपडे विकणाऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. दुसरा मुंबईचा चोर बाजार आणि पुण्याच्या शनिवारवाडय़ासमोरील पुलाखालचा जुना बाजार. पण तेथे चोरीचा वा भंगारात घेतलेला माल असतो, असा लोकांचा समज आहे. ज्यांना त्यांच्या कल्पनेतील नवीन वस्तू बनवण्याकरिता काही प्रयोग करावयाचा असतो, ते मात्र चोर बाजारांतून स्वस्तात वस्तू आणूनच संशोधन करीत असतात. पाश्चिमात्यांनी गराज सेलसारख्या सोयी करून या व्यवहाराला प्रतिष्ठा दिली आहे. त्यात वस्तू विकणाराची व घेणाराची अशी दोघांचीही सोय आहे. आपल्याकडेही शहरांमध्ये एखाद्या मैदानात विशिष्ट दिवशी आपल्याला नको असलेल्या वस्तू विकण्याची अशी सोय झाली तर बाजारात येणाऱ्या नवनव्या वस्तू खरेदी करण्याची हौस असलेल्यांची चांगली सोय होईल.
र. शं. गोखले