Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
साधारणपणे जुलै-ऑगस्टच्या दरम्यान मला कोणी मराठी वाचक भेटले की हमखास  लेखनाची चौकशी सुरू होते. जे जरा सौम्य असतात ते म्हणतात, ‘सध्या तुमचे कामाचे दिवस असतील ना? दिवाळी अंकांसाठी लेखन सुरू असेल..’ जे इतके सौम्यबिम्य नसतात, खटय़ाळ असतात, ते म्हणतात- ‘मग काय? तुमची तळणी पडली की नाही गॅसवर? दिवाळी अंकांसाठी चकल्या-कडबोळी करायला सुरुवात झाली की नाही?’ काही कारणाने मोठय़ा वाचकसमूहापुढे जायची वेळ आली की, मूळ आणि मुख्य व्याख्यानानंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये एक प्रश्न अनेकदा येऊन टोचतो. ‘का हो, तुम्हा मराठी लेखकांना बरोबर दिवाळी आली की अचानक स्फूर्ती कशी येते हो? एरवी दहा महिने थंड पडलेली

 

तुमची प्रतिभा तेवढे दोन महिने कशी काय एकदम तावात येते?’ प्रश्न विचारणाऱ्यांना असं वाटत असतं की, आपण या ‘पोटार्थी’ लेखकांना कसं मस्तपैकी चिमटीत वगैरे पकडलं आहे! खरं तर अशा प्रश्नांतून त्यांची चलाखी दिसण्यापेक्षा वाङ्मय व्यवहार व कलाविश्वाबद्दल त्यांना असलेलं अज्ञानच जास्त प्रकट होत असतं.
साधी गोष्ट आहे. एखादी व्यक्ती का लिहिते?
तिला एखादा अनुभव, एखादं निरीक्षण, एखादा विचार सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहिते. जगताना, बघताना असे अनेक अनुभव, निरीक्षणं, विचार तिच्या मनामध्ये साचत साचत जातात. मनाची विहीर बाहेरच्या पावसानं तसंच आतून स्फुरणाऱ्या झऱ्यांनी सतत भरत असते. अधूनमधून लेखन होतं तेव्हा त्यातल्या काही पाण्याचा निचरा होतो. पण सगळी विहीर कायमची वाळून खडखडीत झालीय, असं प्रतिभावंतांचं सहसा होत नसतं. सारखं काहीतरी छोटं-मोठं, क्षुल्लक किंवा महत्त्वाचं असं विहिरीत जमा होत असतं. मनातल्या मनात लेखक ते टिपत असतो, मांडत असतो, खोडत असतो, त्याच्याशी संवाद करीत असतो. हे सदैव सुरू असतं. मनातलं प्रत्यक्ष कागदावर उतरवण्याच्या वेळा त्यामानाने कमीच येतात. कोणाकडून तरी मागणी आली, जास्त वाचक मिळण्याची शक्यता वाटली, आपल्याला हवा तो वाचकवर्ग डोळ्यापुढे दिसू लागला की लेखक कोरा कागद पुढय़ात ओढतो, एवढंच.
काहींना त्यासाठी महाराष्ट्रात दिवाळीचं निमित्त असतं. बंगालमध्ये त्यांचे दुर्गापूजेचे दिवस निमित्त पुरवितात. ज्या ज्या देशांमध्ये ख्रिश्चन धर्माचं प्राबल्य आहे तिथे ख्रिसमस- नाताळ ही निमित्तं ठरतात. (१९ व्या शतकाच्या सुरुवातीला विलायतेच्या बोटीतून इंग्रजी भाषेतला एक नाताळ विशेषांक मुंबई बंदराला लागला. तो बघून कै. काशिनाथ रघुनाथ आजगावकर ऊर्फ मित्र यांना मराठीतल्या पहिल्या दिवाळी अंकाची कल्पना सुचली, असं मराठी नियतकालिकांच्या इतिहासात नोंदवलेलं आहे.) सणावाराचा आनंद माणसं वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. कपडे, दागिने, मेवा-मिठाई यांचा आस्वाद त्यानिमित्ताने घेतात; तसाच उत्तम कलांचा, वाङ्मयाचा आस्वाद घ्यावा, उत्साही मन:स्थितीमध्ये सढळ हाताने त्यावर पैसा खर्च करावा, एवढीच कल्पना यामागे असणार.
वाङ्मयाबाबत हे घडतं तसंच इतर कलांबाबतही घडतं. गणपतीच्या काळात आरत्यांच्या कॅसेट्स, शिवजयंतीला शिवस्तुतीपर गीतं- पोवाडे यांनी बाजार भरून जातात. चॉकलेटवाले, कपडेवाले, मिठाईवाले स्वत:चे खास नवे नमुने सणावारासाठी राखून ठेवतात. साधा ३०-४० रुपयांचा कागदी कंदील बनवणाराही दिवाळीच्या मूडमध्ये हात धुऊन घेतो. आणि कोटय़वधीच्या बजेटचा चित्रपट बनविणाराही त्याच शुभमुहूर्तावर तो प्रदर्शित करायला धडपडतो. सारांश काय, तर आपापली कला, कसब, हुन्नर वगैरे वापरून चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न जो- तो ज्याच्या- त्याच्या पातळीवर करीत असतो. इतरांच्या सणामध्ये स्वत:चाही सण करायला बघतो. अगदी आदर्श स्थितीत कला चरितार्थासाठी राबविली जाऊ नये, हे खरंच आहे. कला कलेसाठी असावी, सृजनाच्या आनंदासाठी असावी, स्वान्त:सुखाय असावी, वगैरे वगैरे वगैरे! आपल्या संतांनीसुद्धा ‘पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये’ अशासारखे इशारे दिलेले आहेत. तरीही ते धाब्यावर बसवून सर्वसाधारण कलाकारांनी नेहमी आपल्या अंगच्या कलेचा चलाख वापर करून पोटं भरलेली आहेत. आधुनिक काळाने कलेला ‘उपयोजित कला’ किंवा ‘अप्लाइड आर्ट’ ही धाकटी पाती बहाल केली आहे आणि चरितार्थासाठी वाट मोकळी करून दिली आहे.
लेखक हा या अनेक कलाकारांपैकीच एक! तो काही कोण यक्ष-किन्नर नाही. देव-गंधर्व नाही. ज्या क्षणी त्याला सुचत, स्फुरत असेल तो क्षण त्याला अलौकिकाच्या पातळीवर नेणारा ठरू शकतो एक वेळ; पण एरवी त्याचं असणं- जगणं हे पूर्णपणे लौकिक बंधनांमध्ये जखडलेलं असतं. मग ती चमकदार कल्पना कागदावर उतरवण्याचा खटाटोप असेल, लिहिणं, प्रकाशनार्थ पाठवणं, संपादकीय संस्कार, छापणं, वाचलं जाणं, मोबदला मिळणं, टीका होणं किंवा बक्षिसं मिळणं- या सगळ्या चक्रामध्ये फिरणं असेल; हे सगळं कमालीच्या व्यावहारिक पातळीवर चालतं. आणि ते तसं होणं अपरिहार्य आहे. व्यवहाराला रोखठोक राहावं लागतं. सारखं तरल, धूसर, स्वप्नील वगैरे वातावरणात तरंगत राहून चालत नाही, हेही समजण्यासारखं आहे.
शहाणा लेखक हे सारं मनोमन ओळखून असतो. घरची चूल पेटती ठेवण्यासाठी आपण काय लिहितोय/ लिहिलंय, आणि रुक्ष व्यावहारिकतेच्या वर जाणारं आपण काय लिहितोय/ लिहिलंय, हे त्याला माहीत असतं. तो कधीच अलौकिकतेचा दावा करीत नाही. आणि तसा तो करीत नसेल, आपली पायरी ओळखून असेल, तर त्याचा कोणी उपहास करण्याचंही काही कारण नाही.
आता हयात नसलेले एक ज्येष्ठ लेखक मला एकदा म्हणाले होते, ‘एखाद्यानं मला ‘भिक्कार लिहिता’ म्हटलं तरी जेवढं वाईट वाटत नाही ना, तेवढं एखाद्यानं मला ‘पैशासाठी लिहिता’, असं म्हटलेलं लागतं. अगोदरच मराठी लेखनातून मिळून मिळून पैसे मिळणार तरी किती? आणि त्या क्षुल्लक मोबदल्यासाठी स्वत्व विकायला काढायची वेळ माझ्यावर आली आहे का? घरची चूल पेटती ठेवण्यासाठी केलेलं लेखन हे प्रसंगी त्याच चुलीत जळण-सरपण म्हणून घालण्याच्या लायकीचं असू शकतं,  एवढंही मला कळू नये का?’
हे त्यांचे उद्गार जसे माझ्या लक्षात राहिले आहेत, तसाच एका उर्दू शेरातला तुकडाही लक्षात आहे. त्यात शायर असं म्हणतो की, ‘कबूल आहे- प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नसतो. तरीही मोती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला प्रत्येक शिंपला प्रत्येक वेळी नाजूकपणेच हाताळावा लागतो. धसमुसळेपणा केला तर शिंपले तर जातीलच, पण काही मौल्यवान मौक्तिकंही बरबाद होतील!’ वेळी-अवेळी ‘चकल्या-कडबोळ्यां’चा उल्लेख करून लेखकांचा ‘कात्रज’ करायला जाणारे वाचक यातून काही बोध घेतील, अशी अपेक्षा करावी का?
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com