Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

प्रतिसाद
जनरेशन ‘आर’ आणि ‘एल’
‘जनरेशन एल’ हा अपर्णा फडके यांचा लेख (४ जुलै) वाचून त्यांनी उल्लेख केलेल्या जनरेशन ‘आर’ पिढीतील माझ्या स्वत:च्या आणि माझ्या पिढीच्या (५५ +) मनात डोकावून पाहिल्यावर यासंबंधी लिहिलेच पाहिजे, या ऊर्मीने हा पत्रप्रपंच करते आहे. आमची बहुतांशी पिढी स्वत:ला जनरेशन ‘आर’ (rejected) मानत नाही.

 

आमच्या पिढीतील स्त्रियांनी अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीशी झगडत शिक्षण घेऊन घर-संसार आणि नोकरी ही तारेवरची कसरत केली. मुलांना वाढविताना घरातून, पाळणाघरातूनही सुसंस्कार करण्याची काळजी घेतली. मुलांना आवश्यक त्या सुविधा देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. अर्थात त्यांची क्षितिजे ज्ञानाच्या बाबतीत विस्तारली गेल्याने त्यांची प्रगती होत गेली. त्याबद्दल आम्ही समाधानी असून, आता आम्ही आमच्या विश्वात आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. लेखिका म्हणते, ‘जर मुलांना वाढविलेच ‘असे’ गेले तर तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवणार?’ हे ‘असे’ वाढविणे म्हणजे कसे? मुलांना शिस्तीत वाढविणे ही चूक आहे का? तुमचे संस्कार, आचार-विचारांचे संस्कार मुलांत का आले नाहीत? हा जनरेशन ‘आर’ पिढीवर दोषारोपण करण्याचा लेखिकेचा सूर निश्चितच खटकला. आमच्या पिढीने आई-वडिलांचे केले ते कर्तव्याबरोबर मानसिक समाधान व प्रेमापोटी केले. त्याचा उल्लेख करणे हा त्रास कसा काय? स्वत:च्या कष्टांबद्दल, त्यागाबद्दल, जिद्दीबद्दल मुलांशी बोलणे हा संस्कारांचाच भाग होत नाही का? त्याबद्दल मुलांवर प्रतिकूल परिणाम (लेखात म्हटल्याप्रमाणे) होत असेल तर अशा मुलांच्या बुद्धीची कींव येते. लेखिकेच्या जनरेशन ‘एल’मध्ये आई-वडील व दोन मुली असा चौकोन आहे. साधारणत: आई-वडिलांच्या बाबतीत मुली मुलांपेक्षा जास्त समजूतदार असतात. लेखिकेला भाऊ असता तर कदाचित वेगळा अनुभव येऊ शकला असता. संस्कार हे मुलांवर लादता येत नाहीत. प्रत्येकाच्या पिंडधर्माप्रमाणे ते अंगभूत असतात. ते धर्म, वंश, जात, धर्म, लिंग, तसेच देशातीत असतात. सर्वच आई-वडिलांना आपली मुलं संस्कारक्षम होऊन त्यांची प्रगती व्हावी असेच वाटते. कष्टाच्या फळांची अपेक्षा न करता त्यांच्या विश्वात त्यांना रमू देणे योग्य. हल्लीची बदललेली कुटुंबव्यवस्था, विस्तारलेल्या ज्ञानाच्या कक्षा, बदललेली जीवनपद्धती, जागतिकीकरण इत्यादी गोष्टी विचारात घेऊन ज्येष्ठांनी मुलांकडून स्वत:ला ‘रिजेक्टेड’ न समजता समर्थपणे ‘कालाय तस्मै नम:’ म्हणून ‘ठेविले अनंते, तैसेची राहावे। चित्ती असो द्यावे समाधान।’ या उक्तीप्रमाणे वागल्यास आयुष्याची संध्याकाळ निवांत होईल.
- विजया आजगांवकर, डोंबिवली

संवाद वाढायला हवा..
‘चतुरंग’ (२० जून) पुरवणी मनापासून आवडली. ‘तडफदार’ शीर्षकाखाली रश्मी करंदीकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा सुचिता देशपांडे यांचा लेख अतिशय भावला. आव्हानात्मक क्षेत्रातही आपल्या अंगभूत तडफेनं काम करणाऱ्या स्त्रियांचा जीवनपट वाचताना मनाला एक निराळाच उत्साह मिळतो. महिला म्हणून अभिमानही वाटतो. सक्षम महिलांचे असेच जीवनपट चतुरंगमधून वाचायला मिळावेत.
‘फादर्स डे’च्या निमित्ताने मिथिला दळवी यांनी लिहिलेला ‘मुलांमध्ये रमणारे बाबा’ हा लेख खूप काही शिकवून गेला. पालकांना एक नवी दृष्टी देतो. आई-बाबांनी आपणहून मुलांमध्ये रमल्याने पिढींमधलं अंतर नक्कीच कमी होईल. आज सर्व घरांमध्ये संवाद कमीच होताना दिसतो. पालकांच्या अशा जाणीवपूर्वक जोपासलेल्या वृत्तीने तो संवाद वाढेल, खुलेल, बहरेल. आणि घर म्हणजे निखळ आनंद मिळण्याचं एक ठिकाण, अशी सर्वाचीच खात्री होईल.
शांता सहस्रबुद्धे, दापोली.