Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
गेला आठवडाभर मी माझ्या वार्षिक क्लीनअप मोहिमेवर होते. अनावश्यक गोष्टी काढून टाकणे, वस्तूचं वर्गीकरण करणे वगैरे.. माळ्यावर बांधून ठेवलेल्या काही वस्तू वापरायला काढणे, काही बांधून ठेवणे, असं बरंच काही.पूर्वी मला आवराआवरीच्या प्रकाराचा भयंकर कंटाळा होता आणि विशेष म्हणजे वस्तू टाकून द्यायला फार जीवावर यायचं. त्यामुळे घरात भाराभर वस्तू साठतच असायच्या. त्यात नव्याची भर पडत जायची. पण अमेरिकेतल्या आमच्या वास्तव्यात आम्ही बरीच शहरं,

 

घरं बदलली आणि दरवेळी नाइलाजाने का होईना, पण बरंच अनावश्यक सामान काढून टाकावं लागलं. हळूहळू त्या दृष्टीने विचार करायची सवय लागली. आणि मुख्य म्हणजे मुलगा मोठा व्हायला लागला, तशी त्यात वेगळी मजा यायला लागली. मुळातच मुलाला स्वच्छता, आवराआवर या गोष्टी काही फारशा प्रिय नव्हत्या. त्यामुळे तो काही आपणहून या सगळ्यात भाग घेईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण जुन्या-पुराण्या वस्तू बाहेर निघाल्या की, तो प्रचंड उत्साहाने त्यात सहभागी व्हायला लागला. अगदी जास्तीचे खिळे, नट-बोल्ट्सचा खोका, पुडीचे दोरे- सुंभ-सुतळीचा साठा, जुने फोटोग्राफ्स, दगडांचा, चित्रांचा संग्रह बाहेर निघाला की, तो त्यात तासन्तास रमायचा. खेळण्याच्या एका नव्या विश्वाची ओळख मला त्यातून झाली. मग आम्ही टाकून द्यायच्या वस्तूही आठवडाभर त्याच्या खेळण्यांच्या बरोबरीने ठेवायला लागलो. थोडे दिवस त्यांच्याशी खेळल्यावर तो आपणहून सांगायला लागला की, आता हे टाकता येईल किंवा कुणाला देऊन टाकता येईल.
माझ्या कामाच्या निमित्ताने माझा ज्या मुलांशी संबंध येतो, अशा अनेकांनीही या प्रकाराला खूप छान प्रतिसाद दिला आहे. कमी वापरातल्या, अडगळीच्या पण इंटरेस्टिंग वाटू शकतील अशा अनेक गोष्टी मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवते. येणारी मुलं थोडा वेळ त्या पाहतात, हाताळतात, त्यासंबंधी थोडं बोलणं होतं, मुलं स्वत:चा एखादा अनुभव सांगतात. आम्हाला खूप मजा येते. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे काही दगड आहेत. आम्ही ते पेपरवेट म्हणून वापरतो. बहुतेक मुलांना ते खूप आवडतात. मजा म्हणजे काही मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाहून खास प्रकारचे दगड मला भेट म्हणून आणले. आणि आमचा दगड कम् पेपरवेट संग्रह तयार झाला.
अडगळ, स्क्रॅप मालाची एक वेगळी मिती मला अमेरिकेत कळली. आमच्या शहरात ‘स्क्रॅपबॉक्स’ नावाचं एक दुकान होतं. इंजेक्शनच्या बाटल्यांची बुचं, कॅमेरा रोलच्या काळ्या डब्या, पॅकेजिंग इंडस्ट्रीच्या अनेक गोष्टी, फोम शीट्स, प्लास्टिकच्या नळ्या, प्लास्टिकचे अनेक रंगीबेरंगी कागद, मणी, एका बाजूने किंवा दोन्ही बाजूंनी चिकटणारी स्टिकी पॅड्स अशा असंख्य इंडस्ट्रिअल स्क्रॅप वस्तू (स्वच्छ आणि हाताळायला सुरक्षित अशा) तिथं मोठी पिंपं आणि खोकी भरून ठेवलेल्या असायच्या. एक डॉलर किंवा दोन डॉलरची ब्राऊन पेपर बॅग घेऊन हव्या त्या वस्तूंनी भरून घेऊन जायची, असा तिथला खाक्या होता. अनेक प्रकारच्या क्राफ्ट आणि डेकोरेशनच्या वस्तूंची तिथे डेमॉन्स्ट्रेशन्स असायची. तिथल्याच स्क्रॅपमधून बनविलेले मगर, कासव, ट्रॅक्टर असे अनेक भन्नाट प्रकार मांडून ठेवलेले असायचे. कल्पनाशक्तीला इथे प्रचंड वाव!
आम्ही सगळेच जण स्क्रॅपबॉक्समध्ये जायच्या दिवसाची वाट पाहत असायचो. आमचे तासन्तास तिथे जायचे. एकदा बबल रॅपची पाच मीटरची शीट मिळाली, तेव्हा तर मी दिवसभर हवेतच तरंगत होते. एकदा प्लास्टिकच्या २५-३० बॉबिन्स घेऊन आलो, त्याची चाकं बनवून आम्ही अनेक गोष्टींना चालायला लावलं. मी ज्या प्री-स्कूलसाठी काम करत होते, त्या अख्ख्या शाळेसाठी क्राफ्ट मटेरियल आणायचं कामही मी आपणहून अंगावर घेतलं होतं. तिथल्या पिंपांमधून धुंडाळून मी वस्तू घेऊन यायचे. आमच्या मुलांनी त्यातून काही वेगळं बनवलं की, दिवसभर मस्त वाटायचं. शिवाय किंमतही अगदीच माफक असल्यामुळे मुलांना भरपूर प्रमाणात देताही यायचं. आमच्या घरी भारतातून आलेले अनेक ज्येष्ठ नागरिकही या खेळांमधले रमले. दुकानात गेलं की, हे निवडू की ते असं त्यांनाही व्हायचं. दोन डॉलरची एकच बॅग आणि वस्तूंचे प्रकार म्हणाल तर किती! काय काय घेऊ आणि पिशवीत किती मावेल याची वेगळी मजाही काही औरच होती. त्यातल्या काही जणांनी तर या तथाकथित स्क्रॅपमधल्या काही अचाट गोष्टी आठवण म्हणून भारतातही आणल्या.
अरविंद गुप्तांची वैज्ञानिक खेळणी हा अर्थातच यानंतरचा आमचा स्वाभाविकपणे मोठा थांबा होता. अनेक टाकाऊ वस्तूंमधून विज्ञानाची सोपी तत्त्व सांगणाऱ्या खेळण्यांचा जादूचा पेटारा त्यांनी आपल्याला खुला करून दिला आहे. (‘लोकसत्ता’च्या  लोकरंग पुरवणीतील ‘बालरंग’मध्ये त्यांचे विज्ञानखेळ वेळोवेळी दिले जातात. मराठी विज्ञान परिषदेतही वैज्ञानिक खेळणी बनवायला शिकवली जातात.) मी, माझा मुलगा, आमची अनेक छोटी मित्रमंडळी अक्षरश: या खेळण्यांवर पोसलो आहोत. या खेळण्यांमधून विज्ञानाची तत्त्वं तर कळतातच, पण ही खेळणी बनवताना मुलं हाताने काम करतात आणि आपल्याला आजूबाजूच्या अनेक क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींकडे पाहायची एक वेगळी दृष्टी त्यांच्याकडे तयार होते. हा भाग मला खूप महत्त्वाचा वाटतो. आजकाल मुलांबरोबर वावरताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते की, खेळण्याच्या खोक्यावर लिहिलेल्या सूचना वाचून अनेक मुलं सांगितल्याबरहुकूम तो खेळ खेळतात, पण त्याच गोष्टींमधून आणखी नवीन काय, असा प्रश्न आला की चेहरा अगदी कोरा होतो. आजकालची साहित्य-साधनांची मुबलकता आणि सततच्या स्ट्रक्चर्ड- आखीव-रेखीव अ‍ॅक्टिव्हिटीज यातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळायची संधीच कुठे उरते? त्यासाठी जुन्या निरुपयोगी आणि टाकाऊ गोष्टींमधून कल्पनाशक्ती लढवून, काहीतरी बनवण्यातली गंमत आपणच मुलांना दाखवायची आहे. तुलनेने कमी चकचकीत, ओबडधोबड दिसणारी ही खेळणी आपल्या सहभागाने मुलांसाठी खूप मौल्यवान बनून जातात.
मिथिला दळवी
mithila.dalvi@gmail.com