Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

अस्वस्थ गलबल्यात मी!
मिळतील त्या संधी घेत घेत आज मुली नव्या वाटांवरून चालत आहेत. तरी त्या स्वस्थ, सुरक्षित जीवन जगू शकतात, असं ठामपणे म्हणता येत नाही. काहींना कुटुंबानं व्यक्तिगत जीवनात साथ दिली आहे, काहींनी ती प्रयत्नपूर्वक मिळवली आहे. पण कुटुंबापलीकडच्या समाज नावाच्या मोठय़ा कुटुंबात काय दिसतं? काय अनुभवायला येतं? आपण काय जगतो आहोत आणि सभोवती काय घडतं आहे? स्वातंत्र्य मिळूनही कुरतडणारी अस्वस्थता व असमाधान का सोबत करतंय? ..अस्वस्थ करणाऱ्या या गलबल्यातून मार्ग कसा काढायचा?
सन १९८५ च्या जुलै महिन्यात नैरोबीला एक जागतिक परिषद झाली. आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्ष १९७५ साली जाहीर झालं.

 

नैरोबीची परिषद या दशकपूर्तीसाठीची परिषद होती. परिषदेतल्या एका चर्चासत्रात स्त्रियांच्या स्वातंत्र्याची चर्चा सुरू होती. भारतातील चळवळींशी फारसा संबंध नसलेल्या काही भारतीय स्त्रिया भारतातील स्त्री कशी स्वतंत्र आहे, असं अभिमानाने सांगत होत्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिका स्वतंत्र राज्य नव्हतं. तिथली एक स्त्री मध्येच उभी राहून म्हणाली, ‘तुम्ही स्वतंत्र देशातल्या स्त्रिया स्त्रीस्वातंत्र्याविषयी बोलत आहात. आमचा देशच परतंत्र असताना आम्ही कोणत्या तोंडानं स्त्रीस्वातंत्र्याविषयी बोलणार?’ त्यावेळी मी केलेल्या विधानाची आज मला पुन्हा आठवण होते आहे. भारताच्या वतीने चर्चेत मत व्यक्त करणाऱ्या त्या बाईंशी माझा मतभेद होताच. मी म्हटलं, ‘देश स्वतंत्र झाला म्हणजे देशातले स्त्री-पुरुष स्वतंत्र झाले, असं म्हणणं बरोबर नाही. भारतासारख्या देशात स्त्री आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे, असं मला वाटत नाही.’ १९८५ मध्ये मी केलेलं हे विधान आजही योग्यच आहे, असं मला स्वाभाविकपणे वाटतं.
आज भारतात काही स्त्रिया अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम करीत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी, भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील, लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा नीला सत्यनारायण, कितीतरी मोठय़ा कॉर्पोरेट संस्थांच्या संचालकपदांवर असलेल्या स्त्रिया- अशी ही नावांची रांग मोठी होऊ शकते आणि त्याचा योग्य तो आनंद व अभिमान मलाही वाटतो. परीक्षांच्या निकालांकडे बघितलं तरी मुलींचे क्रमांक बहुसंख्येनं वादातीत वरचे असतात. आज मुली मोठय़ा संख्येनं शिकत आहेत, नोकऱ्या आणि करीअर करताहेत. हे चित्र निश्चितच उजवं आणि उजळ आहे. ही संधी ज्यांना मिळाली, ज्यांनी घेतली, त्यांना अर्थातच नवी वाट सापडल्याचा आनंद झाला असणार.
हे सगळं तसं छान छान वाटत असतानाच दुसरंही एक गडद वास्तव आपल्याला विसरता येण्यासारखं नाही. मुली शिकल्यासवरल्या, मिळवत्या, करीअरवाल्या झाल्या तरी त्या स्वस्थ, सुरक्षित जीवन जगू शकतात? अलीकडे एका विवाहित स्त्री अभियंत्याचा नोकरीवरून घरी परतत असताना पुण्यात खून झाला. पती-पत्नीत वैवाहिक जीवनात बेबनाव होता. त्याच्यातून हे घडलं असावं, असं म्हणतात. दुसरी अविवाहित तरुण आय.टी. इंजिनिअर. तिच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यानं तिचा खून केला. त्याच्या प्रेमाच्या हाकांना ती प्रतिसाद देत नव्हती, कारण तिला ते नको होतं, अशा आशयाचा मजकूर बातमीत आहे. खैरलांजीच्या हत्याकांडात, दलित कुटुंबातली प्रियांका भोतमांगे शिकून, नव्या जीवनाची स्वप्नं बघत, धडपड करीत होती. तिच्यासारख्या लहान गावातल्या, दलित कुटुंबातल्या मुलींचं हे स्वप्न बघण्याचं धाडस दलितेतरांना रुचलं नाही. तिची, तिच्या आईची, भावाची साऱ्यांची बेइज्जत करून हत्या करण्यात आली. जातीबाहेर लग्न करणाऱ्या मुला-मुलींना ‘कुटुंबाची, जातीची, धर्माची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’ या आरोपाखाली प्राणाला मुकावं लागल्याची उदाहरणं आजही वृत्तपत्रांतून कधीकधी पुढे येतात. नुकतीच ‘खाप’ नावाच्या हरियाणातील झज्जार जिल्ह्य़ातल्या एका पंचायतीची बातमी वाचनात आली. सगोत्र विवाहाला पंचायतीच्या रुढीनुसार बंदी आहे. तसा विवाह करणाऱ्या रविंदर नावाच्या मुलाच्या कुटुंबाला, आज पोलीस संरक्षणात जीवन जगावं लागत आहे. मध्यंतरी वेद पाल नावाच्या २३ वर्षांच्या तरुणाला याच प्रकारच्या लग्नाच्या ‘गुन्ह्य़ाखाली’ गावानं क्रूरपणे ठार केलं. या घटनेची दहशत झज्जार जिल्ह्य़ातल्या घ्राना गावाचं गेहलवत कुटुंब विसरू शकत नाही.
ठिकाण शहरातलं असो, खेडय़ातलं असो; महाराष्ट्रातलं असो की इतर कोणत्याही राज्यातलं असो, एकूणच माणसं सुरक्षित नाहीत. आणि मुख्यत: त्या साऱ्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बळी स्त्रिया होतात. म्हणूनच परिस्थिती बदलली, नवे कायदे आले, शिक्षणाची-मिळवतेपणाची संधी आली, नव्यानं काही दारं-दालनं खुली झाली, वाटा खुणावू लागल्या, तरी ‘अब्रू’ नावाचं मनावरचं, शेकडो वर्षांपासूनच गारुड प्रभावी ठरतं. धर्म/जातींच्या परंपरा, संस्कार, रुढी यांचा एवढा जबरदस्त वज्रलेप बायांच्या मनावर इतका दाब ठेवून असतो, की बस्स!
या साऱ्यांतून विचाराच्या आधारानं खंबीर होत, काहीजणी चौकटी, उंबरे, भिंती ओलांडून जाण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्या हिमतीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण ही हिंमत अनेकदा खूप मोठी किंमत मागते. कधीकधी थोडय़ा संघर्षांवर भागतं, तर कधी जिवावरही बेततं तिच्या! तरीसुद्धा जगाची अर्धी संख्या व्यापून राहणाऱ्या स्त्रियांनी आगेकूच करीत राहण्याला पर्याय नाहीच. केवळ त्यांच्याचसाठी पर्याय नाही असं नाही, जगालाही ते परवडणारं नाही! अल्वा मिर्दाल आणि व्हायोला क्लेन या नोबेल विजेत्या जागतिक कीर्तीच्या समाजशास्त्रज्ञ जे म्हणतात, ते आपणच नव्हे सर्वच स्त्री-पुरुषांनी ऐकून त्याचं मनन करायला हवं. ‘जगभरातल्या ५० टक्के लोकसंख्येचा, म्हणजे स्त्रिया नावाच्या मानवी ऊर्जास्रोताचा विसर पडणं सर्वानाच अतिशय महाग पडणार आहे.’
हे सारं समजल्यामुळे किंवा आपल्याच आंतरिक सामर्थ्यांच्या ओढीनं काहीजणी आपापल्या पातळीवर, स्वत:चा, कुटुंबाचा विकास करताहेत. त्यांच्या आजी-पणजीच्या तुलनेत खूपच अर्थपूर्ण आयुष्य जगताहेत आणि तरी क्षणाक्षणाला, पावलापावलाला अडथळे उभे राहताहेत किंवा उभे केले जाताहेत. काहींना कुटुंबानं व्यक्तिगत जीवनात साथ दिली आहे, काहींनी ती प्रयत्नपूर्वक मिळवली आहे. पण कुटुंबापलीकडच्या समाज नावाच्या मोठय़ा कुटुंबात काय दिसतं? काय अनुभवायला येतं? आपण काय जगतो आहोत आणि सभोवती काय घडतं आहे? एकेकदा तर आपण तरी किती आणि कुठवर झगडत राहायचं, असाही प्रश्न पुन:पुन्हा पुढय़ात उभा राहिला तर आश्चर्य नको वाटायला!
विचार करताना मला वाटतं की, देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या प्रयत्नांना एक निश्चित टोक आहे, सीमा आहे, शेवट आहे. त्या ओलांडल्यानंतर तो देश स्वतंत्र होतो. त्या तुलनेत स्त्रीस्वातंत्र्याचा लढा जातिअंताच्या लढय़ासारखा अतिशय व्यापक आणि व्यामिश्र आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात कोणावर विजय मिळवायचा, कोणाशी लढायचं हे निश्चित आणि नेमकं असतं. स्त्रीस्वातंत्र्यासाठी लढत असताना आई-वडील, कुटुंब, जातीजमाती, समाज, रुढीपरंपरा यात एखाद्या अदृश्य, पण प्रभावी स्वरूपात पुरुषसत्ताकता नावाचा व्हायरस हाडीमाशी रुतून बसलेला दिसतो. माणसं वाईट नसतात, पण त्यांनी विचारच केलेला नसतो. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि प्रेम या सार्वत्रिक अमूल्य अशा मूल्यांची किंमत त्यांना कळलेली नसते. ही मूल्यं जोपासत जगण्यातला आनंद आणि समाधान त्यांनी अनुभवलेलं नसतं. या मूल्यांसोबत जगणं म्हणजे परोपकार नाही, तो स्वत:च्या अर्थपूर्ण जगण्याचा अविभाज्य भाग आहे, हे त्यांना समजलेलं नसतं. यामध्ये स्त्रिया आणि पुरुष अशा पुरुषसत्ताक विषमतेचा कमीअधिक बळी असणाऱ्या सर्वाचाच भाग आहे.
विषमतेच्या या व्हायरसशी जसे आपल्याकडे फुले, आंबेडकर, गांधींपासून अनेक विचारवंत लढले आहेत, तसे जगभर अनेकांनी लढे दिले आहेत.. अजूनही देत आहेत. म. जोतिबांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, म. कव्र्यानी शैक्षणिक संस्था सुरू केल्या, डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा संदेश दिला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून समतेसाठी शिक्षण या उद्दिष्टांसाठी अनेकांनी आयुष्यभर काम केलं. आज भारत स्वतंत्र झाल्याला साठ वर्षे उलटून गेली आहेत. माणसं माणुसकी शोधताहेत आणि माणसाला माणूस भेटत नाहीये. प्रत्येकानं माणूस म्हणून जन्माला आल्यावर विचाराची कास स्वत: घट्ट धरून ठेवायला हवीच, पण जोवर त्यासाठी स्वत:पलीकडे, सर्वांपर्यंत पोहोचण्याची आस लागत नाही, तोवर स्वातंत्र्य मिळूनही कुरतडणारी अस्वस्थता व असमाधान सोबत करणारच!
स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याबाबत विचार करीत असताना, मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, माणसाच्या विकासासाठीच्या सर्व संधी स्त्रीला मिळाल्या पाहिजेत. त्यांचं सोनं करीत तिनं आपलं आयुष्य समृद्ध केलं तर तिच्यापुरती ती स्वतंत्र झाली असं म्हणता येईल का? याला माझं उत्तर ‘नाही’ असं आहे. कारण ‘स्वातंत्र्य’ ही एकटय़ासाठीची संकल्पना नाहीच. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी! स्वत:ची इतरांबरोबरची, इतरांसाठीची जबाबदारी! म्हणून व्यक्तिगत जीवनाची समृद्धी अर्थपूर्ण करण्यासाठी भोवतीच्यांकडे जाणिवेनं बघायलाच हवं. हे बघण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याचा आणि समृद्धीचा विनियोग, शक्य होईल तेवढा तरी इतरांसाठी करण्याचं भान ठेवलं तर मला वाटतं, अस्वस्थ गलबल्यातही आपलं मन उमेद आणि स्वास्थ्य अनुभवू शकतं.
विद्या बाळ