Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

मॅग्ना सीटिंग आणि कृष्ण ग्रुप यांचा भारतीय बाजारपेठेत संयुक्त उपक्रम
व्यापार प्रतिनिधी: मॅग्ना इंटरनॅशनल इंकॉर्पोरेशन कंपनीचा घटक असलेली मॅग्ना सीटिंग कंपनी

 

आणि कृष्णा ग्रुप यांच्यात आज ५० टक्के भागीदारी तत्त्वावर संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भारतात पुणे क्षेत्रातील वाहन निर्मिती उद्योगाला वाहन आसने (सीटिंग सिस्टीम) व सीट यंत्रणा पुरवण्याच्या उद्देशाने हा संयुक्त उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
नव्या संयुक्त उपक्रम कंपनीला ‘एमएसकेएच सीटिंग सिस्टीम्स’ असे नाव देण्यात आले असून ही कंपनी चाकण (पुणे) येथून कारभार करणार आहे. आगामी १२ महिन्यांत उत्पादनास सुरुवात करण्याची कंपनीची योजना आहे.
या करारामुळे ऑटोमोटिव्ह सीटिंग क्षेत्रातील दोन दिग्गज एकत्र येणार आहेत. मॅग्ना सीटिंग ही जागतिक दर्जाची कंपनी असून या कंपनीचे तंत्रज्ञान व प्रक्रिया जगात वाखाणली जाते. तसेच कृष्णा ग्रुप हा भारतातील सर्वात मोठा सीट (वाहनातील आसने) पुरवणारा समूह आहे. या कंपनीकडे उत्पादन व वितरणाचा गाढा अनुभव आहे. संयुक्त उपक्रमासाठी लागणारे खास तंत्रज्ञान मॅग्ना सीटिंग पुरवणार आहे.
मॅग्ना सीटिंगचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष दीपक नागराजा म्हणाले की, कृष्णा समूहासोबत सहकार्य केल्यामुळे आम्हाला पुणे भागातील वाहन उद्योगाशी एका सक्षम भागीदारासोबत कार्य करण्याची संधी मिळणार आहे. ही भारतात मोठय़ा प्रमाणात सीट निर्मिती करणारी एक कंपनी आहे. आम्ही नवा उपक्रम लाभदायक ठरेल, अशी आशा बाळगून आहोत.
त्याचप्रमाणे कृष्णा समूहाचे अध्यक्ष अशोक कपूर म्हणाले, ‘‘जागतिक दर्जाची नावीन्यतापूर्ण उत्पादने विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅग्ना सीटिंगसोबत भागीदारी करताना आम्ही फारच उत्साही झालो असून भारतीय बाजारपेठेला आम्ही आता उत्तम दर्जाचा व आधुनिक माल पुरवणार आहोत. या संयुक्त उपक्रमामुळे पुण्यातील वाहन उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्पर्धात्मक किमतीत वाहन आसने उपलब्ध होणार आहेत.’’
या संयुक्त उपक्रमामुळे मॅग्ना सीटिंग कंपनीच्या भारतातील व्यवसायाचा विस्तार करण्यास हातभार लागणार आहे.