Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

येवा कोकण आपलाच आसा!
कोकणातील टुमदार घरे, वळणावळणांचे रस्ते, पायवाटा, सर्वत्र परसलेली हिरवाई, हिरवाईचीही अनंत रुपे ही कोकणची विविध रूपे आपल्या चित्रांमध्ये साकारणारे प्रसिद्ध चित्रकार शशिकांत पाताडे यांचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात सुरु आहे. शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ग्रामीण भागातील चार शांत क्षण सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. शशिकांत पाताडे यांनी शहरी माणसाची हीच इच्छा आपल्या चित्रांमधून पूर्ण केली आहे. पाताडे यांनी आजवर १० एकल तर अनेक गटप्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. हे प्रदर्शन १७ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले आहे.
दीपा वेदपाठक
दीपा वेदपाठक यांचे चित्रप्रदर्शन १७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत जहांगीर कलादालनात येथे आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते दीपा यांच्या ‘कलर कॉन्सर्ट’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कॅम्लिनतर्फे देण्यात येणारे २००३ सालचे अखिल भारतीय कला शिक्षकाचा पुरस्कार दीपा वेदपाठक यांना मिळाला आहे.
प्रतिनिधी

मेंदूतील न्यूरॉन्सही घेतात छोटासा ब्रेक
रोज रात्रीची शांत झोप ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. या विश्रांतीच्या काळातच शरीराची झीज भरून निघते. झोपेचा आतापर्यंत अनेकांनी अभ्यास केलेला आहे, पण त्यातील सगळे कळले आहे अशातला भाग नाही. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा माणसाच्या मेंदूत नेमक्या काय क्रिया होत असतात की, झोपेतही मेंदू जागाच असतो अशी अनेक कोडी आहेत. अगदी गाढ झोपेत असतानाही मेंदूचे काम चालू असते. मेंदूच्या पेशी काम करीत असतात. न्यूरॉन्स या मेंदूतील पेशी हलकासा विद्युतप्रवाह झोपेतही वाहून नेतात व शरीर विश्रांती घेत असले तरी मेंदू त्याचे काम चालूच ठेवतो.अलीकडेच वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, मेंदूच्या पेशी म्हणजे न्यूरॉन्स आपण गाढ झोपेत असताना विशिष्ट कालांतराने त्यांचे काम थांबवत असतात, ज्याला आपण अल्पविराम असे म्हणू. काही लोकांना झोपेत असताना कुणी ओरडले किंवा चक्क हाताने धरून हलवले तरी चटकन जाग येत नाही असे आपण काहीवेळा पाहतो, ते खरे असते. कारण त्यांच्या गाढ झोपेच्या अवस्थेत त्यांच्या मेंदूतील न्यूरॉन्सही विराम अवस्थेत असतात, त्यांचे काम विशिष्ट काळ थांबलेले असते. बोस्टनमधील हार्वर्ड मेडिकल स्कूल व मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलचे मेंदूरोगतज्ज्ञ सिडनी कॅश व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. मेंदू झोपेतही कसा चालतो याचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रोएनसेफलोग्रॅमची (ईईजी) मदत घेतली जाते. जसे इलेक्ट्रोकार्डिओग्राम हृदयाच्या स्पंदनांचे स्वरूप कागदावरील रेघांच्या मदतीने दाखवतो तसेच मेंदूचा इलेक्ट्रोएनसेफलोग्रॅम काढला जातो. तो विद्युतलहरींचा एक आलेख असतो. या आलेखातील चढउतार पाहून मेंदूचे काम कसे चालले आहे हे समजते. कॅश व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेंदूचा जो इलेक्ट्रोएनसेफलोग्रॅम काढला आहे त्याला के कॉम्प्लेक्स असे नाव दिले आहे. सामान्य माणसांसाठी त्याचे स्वरूप हे वेडय़ावाकडय़ा रेषांच्या पलीकडे नाही पण तज्ज्ञांसाठी या रेषा बरेच काही सांगणाऱ्या असतात. मेंदूतील विद्युत लहरींच्या हालचाली त्यात दिसतात. गाढ झोपलेला माणूस व ज्याची झोप सहज चाळवली जाते असा माणूस यांच्या के कॉम्प्लेक्स आलेखात काही फरक दिसून आले आहेत. असे असले तरी मेंदूतील सर्वच हालचाली या इलेक्ट्रोएनसेफलोग्रॅममध्ये टिपल्या जातात असे नाही, ज्या हालचाली टिपल्या जातात त्याही फार वरच्या भागातील असतात. आतापर्यंत ज्या लोकांना फेफरे येते त्यांचाही बराच अभ्यास झाला असून हा रोग न्यूरॉन अतिकार्यरत असल्यामुळे होतो असे सांगितले जाते. अशा रूग्णांच्या मेंदूत छोटेसे इलेक्ट्रोड बसवून नेमके कशामुळे फेफरे येते याचा अभ्यासही केला जात आहे. कॅश यांच्या मते हे जे इलेक्ट्रोड आहेत ते मेंदूच्या आणखी आतल्या भागात बसवले तर आपल्याला खोलवरच्या हालचालींची माहिती मिळेल. इलेक्ट्रोएनसेफलोग्रॅमच्या मदतीने बाह्य़ भागातील हालचाली कळतील त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर गाढ झोपेच्या अवस्थेत नेमके काय घडते हे समजू शकेल. त्यांनी आता केलेले संशोधन याच पद्धतीने केले असू्न त्यांच्या मते गाढ झोपेच्या अवस्थेत मेंदूतील सर्व नाही तरी काही न्यूरॉन्स हे विशिष्ट कालावधीत विश्रांती घेतात. मेंदूतील जैविक सर्किट्स कशी काम करतात हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे त्यातून अनेक रोगांवर उपचार शक्य होणार आहेत. न्यूरॉन्सचे वर्तन नेमके कुठल्या काळात कसे असते, ते कधी विश्रांती घेतात यावर बरेच काही अवलंबून असते. कदाचित मेंदू ताजातवाना ठेवण्यासाठी निसर्गानेच तशी व्यवस्था केली असावी.
राजेंद्र येवलेकर