Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

लोकमानस

फ्रॉईडच्या दृष्टिकोनातून क्लिओपात्रा
‘त्रिकालवेध’मध्ये अ‍ॅन्टनी आणि क्लिओपात्राची प्रेमकथा व त्यावरील शेक्सपिअरचे नाटक व पुढे

 

या कथेवर प्रकाशित झालेल्या चित्रपटांचा उल्लेख (८ ऑगस्ट) वाचताना सिग्मंड फ्रॉईड याच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. एकदा अमेरिकन सिनेनिर्माता सॅम्युअल गोल्डविन फ्रॉईडला भेटण्यासाठी आला होता. त्याची अपेक्षा होती की फ्रॉईडने अ‍ॅन्टनी व क्लिओपात्रा यांच्या प्रेमजीवनावर त्याच्या फिल्म कंपनीसाठी प्रेमप्रसंगाचे चित्रण करण्यासाठी लेखन करावे. कंपनी त्यासाठी फ्रॉईडला एक लक्ष डॉलर्स देण्यास तयार होती. अशा प्रकारचे व्यावसायिक काम करण्याची सूचना येईल, अशी कल्पना फ्रॉईडच्या कधी स्वप्नातही आली नव्हती. मनोविश्लेषणशास्त्र म्हणजे अशा प्रकारच्या प्रेमाच्या ‘भानगडी’चेच शास्त्र होय, अशी त्या सिनेनिर्मात्याची कल्पना झालेली पाहून फ्रॉईडला गंमत वाटली. मनोविश्लेषणशास्त्राचा असा ‘धंदेवाईक’ उपयोग करणे, त्याला पटण्यासारखे नव्हते. त्याने सॅम्युअल गोल्डविनची ऑफर फेटाळली. एवढेच नव्हे तर त्यापुढे भेटही नाकारली. फ्रॉईडचे मन वळविण्यास गोल्डविनला यश आले असते तर आज या दंतकथेला वेगळे मानसशास्त्रीय परिमाण प्राप्त झाले असते, हे नक्की!
अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन
arunjakhade@padmagandha.com

नसानसात देशभक्ती
१५ ऑगस्टला सर्वत्र वाजविण्यात येणारी देशभक्तीपर गीते सर्वसामान्य माणसाच्या मनात देशभक्तीची उदात्त भावना जागृत करतात. मनोजकुमार निर्मित ‘उपकार’ या चित्रपटातील गुलशन बावरा लिखित व महेंद्र कपूर यांनी स्वरबद्ध केलेले ‘मेरे देश की धरती’ हे गाणे त्या दिवशी ऐकायला आवर्जून मिळते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना दिलेल्या शब्दाखातर मनोजकुमारने ‘उपकार’ची निर्मिती केली. कामचलाऊ फिल्मी गीते लिहिणाऱ्या गुलशन बावराने ‘मेरे देश की धरती’ हे गीत लिहून मनोजकुमारच्या हातात ठेवले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, नेहरू, भगतसिंग व लालबहादूर शास्त्री यांची नावे गाण्यात अप्रतिमपणे गुंफण्यात आली होती. शास्त्रीजींच्या पत्नी ललिता देवी यांनी गुलशन बावरांवर मुलासारखे प्रेम केले. त्यांची दोन्ही मुले अनिल व सुनील त्यांच्या संपर्कात असत. ‘जंजीर’ चित्रपटातले ‘दिवाने है दिवानोंको न घर चाहिए’ हे गाणे खुद्द गुलशन बावरानेच पडद्यावर साकार केले. त्यांनी फार गाणी लिहिली नाहीत पण लिहिलेली गाजली.
संदेश झेंडे, शिवाजीनगर, पुणे