Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

‘स्वाइन फ्लू’ची ‘घागर उताणी’ करून गोपाळांचा जल्लोष
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

पुण्यापाठोपाठ मुंबईमध्ये पसरत असलेल्या स्वाइन फ्लूच्या घबराटीवर आज दहिहंडीच्या जल्लोषाने मात केली. स्वाइन फ्लू तसेच कोणत्याही राजकीय पक्षांच्या आवाहनाला गंभीरपणे न घेता मुंबापुरीसह ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी गोपाळकाला उत्सव प्रचंड उत्साहात साजरा केला. मोठय़ा रकमांच्या दहीहंडय़ा न बांधण्याचा निर्णय शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने घेतल्यानंतरही ठिकठिकाणच्या गोविंदा पथकांनी आर्थिक फटका सहन करून मोठय़ा उत्साहात उत्सव साजरा केला. मुंबई-ठाण्यामधील गल्लोगल्ली बांधलेल्या मानाच्या दहीहंडय़ा फोडण्यात गोविंदा पथके दिवसभर व्यस्त होती. गोपाळकाला उत्सव साजरा करतानाच गोविंदा पथकांनी सार्वजनिक आरोग्याचेही भान राखले होते. स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे शाळा, महाविद्यालये, मल्टिप्लेक्स बंद ठेवण्याची सूचना राज्य सरकारने केल्यानंतर मुंबईकरांवर साथीबाबत विचित्र दडपण होते. त्यातच गोपाळकाल्याचा उत्सव आल्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता विविध स्तरावर वर्तविण्यात येत होती. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी आणि काही निवडक गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विशेष काळजी घेण्याची सूचना केली होती. स्वाइन फ्लूच्या प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व दहीहंडय़ा रद्द करण्याची घोषणा केली.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी कंबर कसा
राष्ट्रपतींचे देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी ठरला आहे. त्याचा परिणाम कृषी उत्पादन आणि पाण्याच्या उपलब्धतेवर होणार असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी देशाने कंबर कसावी, असे आवाहन आज ६३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राच्या नावाने दिलेल्या संदेशात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले आहे. भारताच्या एकतृतीयांश भागावर ओढवलेल्या दुष्काळाच्या संकटाचा उल्लेख करताना याबाबत केंद्र सरकार पावले उचलत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. भारतासह जगभरात फैलावलेल्या स्वाइन फ्लूवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावले उचलत असल्याची ग्वाही राष्ट्रपतींनी दिली आहे. दुष्काळ आणि स्वाइन फ्लूचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये तसेच देशाच्या विकास प्रक्रियेत सहकार्य देण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री चव्हाण व राणे यांच्यात शीतयुद्ध सुरू !
मुंबई, १४ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी दोन हात करणारे उद्योगमंत्री नारायण राणे हे आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फारसे समाधानी नसल्याची चर्चा मंत्रालयाच्या वर्तुळात आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बरोबरीने राणे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल हल्ला चढविल्याने त्याला पुष्टीच मिळते.
विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी राणे सोडत नसत. देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात काँग्रेसमध्येच मंत्र्यांचा एक गट त्यांच्या विरोधात गेला होता. त्याचे नेतृत्व अर्थातच राणे यांच्याकडे होते. तेव्हा राणे व अशोक चव्हाण हे बरोबरीने होते. व्हिडिओकॉन कंपनीला जमीन देण्याच्या निर्णयावरून राणे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला होता. तेव्हा अशोक चव्हाण यांनीच राणे यांची समजूत काढण्याकरिता पुढाकार घेतला होता.

‘मेजर ब्लॉक’पेक्षा समन्वयाचा अभाव करणार प्रवाशांचे हाल!
मस्जिद स्थानकातील पाडकाम सुरू
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मस्जिद स्थानकातील जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याच्या कामाला आज रात्रीपासून सुरुवात झाली. तब्बल ४८ तास चालणाऱ्या या कामासाठी करण्यात येणाऱ्या ‘मेजर ब्लॉक’च्या निमित्ताने रेल्वे आणि रस्ते वाहतूक एजन्सी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षांने समोर आले आहे. त्यामुळे मेजर ब्लॉकपेक्षा या एजन्सीमधील समन्वयाचा अभाव प्रवाशांचे अधिक हाल होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. मस्जिद स्थानकातील या पाडकामासाठी मध्य रेल्वेने जवळपास महिन्याभरापासून या ब्लॉकचे नियोजन केले होते. या ब्लॉकदरम्यान सीएसटी-भायखळा आणि सीएसटी-वडाळादरम्यानची उपनगरी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. याखेरीज ब्लॉकच्या काळात प्रवाशांना चर्चगेट-वांद्रे दरम्यान पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी अधिकाधिक प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेचा वापर होणार आहे. तरीदेखील पश्चिम रेल्वेने १६ ऑगस्ट रोजी मरीन लाईन्स ते माहीमदरम्यान जम्बो ब्लॉक करण्याची घोषणा केली होती. मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे आधीच हाल सोसणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेवरील या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या हालात आणखीनच भर पडेल, ही बाब पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा हा ब्लॉक रद्द केला.

मुंबईच्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी, १४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

गणपतीच्या घरगुती सजावटीसाठी येथे मुंबईहून आलेल्या ११ जणांपैकी दोघांचा आज समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या मुंबईत स्थायिक झालेल्या संतोष प्रभाकर कोरेकर (२६, रा. मानखुर्द) याचे येथे वडिलोपार्जित घर आहे. तेथे बसविण्यात येणाऱ्या घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी तो आपल्या दहा मित्रांसह आज सकाळी रेल्वेने येथे आला. त्यानंतर थेट घरी जाण्याऐवजी कोणीतरी समुद्रावर आंघोळ करून जाण्याची टूम काढली. त्यानुसार सर्वजण भाटय़े येथील समुद्रकिनारी गेले. तेथे पाण्यात उतरल्यानंतर थोडय़ाच वेळात मोठी लाट आली. त्यामुळे चौघेजण गटांगळ्या खाऊ लागले.

निर्मला देशपांडे यांचा पाकिस्तानकडून मरणोत्तर सन्मान
इस्लामाबाद, १४ ऑगस्ट/पी.टी.आय.

ज्येष्ठ गांधीवादी नेत्या दिवंगत निर्मला देशपांडे यांना पाकिस्तानकडून ‘सितारा-ए-इम्तियाज’ या मरणोत्तर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. विनोबांच्या भूदान चळवळीतील कार्यकर्त्यां तसेच अहिंसावादी सत्याग्रही असलेल्या निर्मला देशपांडे यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न केले होते.

पुण्यात पंधरा नव्हे; बारा जणांचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू
पुणे, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरातील ‘स्वाइन फ्लू’ने बळी घेतलेल्या मृतांपैकी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून काही मृतांच्या आलेल्या अहवालात तीन जण हे ‘निगेटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाल्याने मृतांची संख्या ही पंधरा नव्हे तर बारा असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आज दिले. शहरात तीन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या अकरा दिवसांमध्ये पंधरा जणांचा ‘स्वाइन फ्लू’ ने बळी गेल्याची नोंद करण्यात आली होती. संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जाहीर करताना त्यांचा राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून (एनआयव्ही) आलेला अहवाल हा ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या मृतांच्या संख्येत वाढ होत गेली. गेल्या दोन दिवसांत नऊ जणांचा बळी गेला. त्यापैकी काही मृतांचे अहवाल येणे बाकी होते. यासंदर्भात कुटुंब कल्याणचे अतिरिक्त संचालक डॉ. अशोक लड्डा म्हणाले, ‘‘ तीन जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. न्यूमोनिया तसेच श्वसनाचा विकार बळावल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा विकार हा स्वाइन फ्लूच्या लक्षणाचाच एक भाग आहे. मात्र चाचणीमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण हे स्वाइन फ्लू असे स्पष्ट झाले नाही.’’

प्रेमनगर मित्रमंडळाने फोडली २५ लाखांची हंडी!
घाटकोपर (पश्चिम) येथील श्रेयस चित्रपटगृहाजवळ राम कदम मित्रमंडळातर्फे उभारण्यात आलेली २५ लाख रुपयांची दहीहंडी चुनाभट्टी येथील प्रेमनगर मित्र मंडळाच्या गोविंदांनी फोडली.ही हंडी फोडण्याचा प्रयत्न सुमारे ६५ गोविंद पथकांनी केला. यात काही महिला पथकांचाही समावेश होता. अखेर प्रेमनगर मित्र मंडळाच्या गोविंदांनी ही हंडी सायंकाळी फोडली असल्याचे समजते. नवतरुण मित्रमंडळाचा प्रवीण भुवड (२२) हा तरुण दहीहंडी फोडतांना पाचव्या थरावरुन पडून गंभीर जखमी झाला. त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात परळ येथील नरेपार्क येथील दहीहंडी उत्सवात घडला.

बस अपघातात १४ ठार
ढाका, १४ ऑगस्ट/पी.टी.आय.

वेगाने जाणारी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात किमान १४ प्रवासी जागीच ठार झाले तर १० जण गंभीर जखमी झाले. ही घटना येझून जवळच असलेल्या फेनी शहरानजीक घडली. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळून नंतर ती एका नाल्यात पडली. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी