Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

जालना येथे ‘लोकसत्ता’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘गाथा ज्ञानाची’ स्पर्धेतील जालना जिल्ह्य़ातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक, आमदार अरविंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, नगरपालिका सदस्य विलास नाईक आणि जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक एम. डी. चोले यांची उपस्थिती होती.

‘लोकसत्ता’च्या सामाजिक जाणिवेचा विविध वक्त्यांकडून गौरव
जालना, १४ ऑगस्ट/वार्ताहर

‘सामाजिक जाणिवेचे भान ठेवत लिखाण करणारे आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांत विविध वक्तयांनी आज येथे ‘लोकसत्ता’चा गौरवपूर्ण उल्लेख केला. निमित्त होते ‘लोकसत्ता’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘गाथा ज्ञानाची’ स्पर्धेतील जालना जिल्ह्य़ातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्याच्या कार्यक्रमाचे!

न्यूमोनियाचे निदान झाल्याचा आरोग्य प्रशासनाचा दावा
औरंगाबादमध्ये ‘स्वाइन फ्लू’ च्या संशयित रुग्णाचा मृत्यू
औरंगाबाद, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लू झाल्याचा संशय असलेल्या एका रुग्णाचा येथील शासकीय रुग्णालयात सकाळी मृत्यू झाला. सुदाम माणिक काळे (वय ४०, रा. आष्टी, ता. परतूर, जिल्हा जालना) असे या रुग्णाचे नाव आहे. काळे यांना गुरुवारी रात्री शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया असल्याचे निदान झाले होते. स्वाइन फ्लूची लागण झाली किंवा नाही यासाठी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अहवाल प्रश्नप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण न्युमोनिया की स्वाईन फ्लू हे स्पष्ट होईल, असे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रवीड यांनी स्पष्ट केले.

जकात हटविण्यासाठी व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
औरंगाबाद, १४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

जकात हटाव या मागणीसाठी पुकारण्यात आलेला व्यापाऱ्यांचा बंद गेल्या आठवडय़ात तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. आठवडाभरात जकात रद्दचा निर्णय राज्य शासनाने घेतला नाही; त्यामुळे शुक्रवारपासून बेमुदत बंदचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. आज व्यापाऱ्यांच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद शहरातील सर्व रस्ते आज सुनसान होते.

परभणी जिल्ह्य़ात डाव्या व लोकशाही आघाडीचे ‘रास्ता रोको’आंदोलन
परभणी, १४ ऑगस्ट/वार्ताहर

परभणी जिल्ह्य़ात दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) डाव्या व लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्ह्य़ात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाने जिल्हाभर वाहतूक ठप्प झाली होती. तर पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडला. जिल्हाभर रास्ता रोको करणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर जामिनावर मुक्तता केली.

स्वाइन फ्लू संशयित रुग्णाला शासकीय रुग्णालयातून हलविण्याचा प्रयत्न
औरंगाबाद, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लू झाल्याच्या संशयावरून शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाला तिच्या नातेवाईकांनी गुपचूपपणे अन्यत्र हलविल्यामुळे खळबळ उडाली. हा प्रकार समजल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने पोलिसांना माहिती देऊन तक्रारीची नोंद करण्यापूर्वीच ती रुग्ण परतल्यामुळे पोलीस कारवाई करण्यात आली नाही. त्या रुग्णाला शहरातील एकाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही.

नांदेडमध्ये स्वाइन फ्लू चे दोन रुग्ण पॉझिटिव्ह
नांदेड, १४ ऑगस्ट/वार्ताहर

नांदेडच्या श्रीगुरू गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या दोन संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्य़ात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या संशयित २७ रुग्णांची तपासणी झाली. १४ रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.

काळ्या बाजारात जाणारा चार लाखांचा गहू व तांदूळ हिंगोलीत पकडला
हिंगोली, १४ ऑगस्ट/वार्ताहर
शहरापासून काही अंतरावर असलेल्या िलबाळा मक्ता परिसरात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू व तांदूळ पोलिसांनी जप्त केला असून एका आरोपीला अटक केली. फौजदार रामराव दराडे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपासाच्या कामाकडे सर्वाचे लक्ष आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (१३ ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास हिंगोलीतून औंढा नागनाथकडे स्वस्त धान्य दुकानाचा गहू व तांदूळ टेम्पो (क्र. एमएच २२- बी - ७८५१) मधून काळ्या बाजारात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लिंबाळा मक्ता येथे तो टेम्पो पकडला. या टेम्पोमध्ये सुमारे ९५ हजार ५५० रुपये किमतीचा स्वस्त धान्य दुकानाचा गहू व तांदूळ होता. पोलिसांनी टेम्पोसह चालक बबन रमेश गायकवाड याला ताब्यात घेतले.

तुळजापूरात शिखर कलशारोहण सोहळा
तुळजापूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर

दीपक संघ व झुंजार हनुमान भजनी मंडळाच्या वतीने आयोजित शिखर कलशारोहण सोहळा तसेच कृष्णाष्टमी काल्याचा सोहळा शुक्रवारी झाला. गुरुवारी मध्यरात्री कृष्णजन्म सोहळ्यानंतर रात्रभर व त्यानंतर शुक्रवारी दिवसभर मान्यवर कीर्तनकार व भजनी मंडळींच्या कीर्तन, भजनाचा सोहळा झाला. दहीहंडीचा सोहळाही उत्साहात झाला.

अंबडमध्ये आरोग्य विभागाच्या बैठका
अंबड, १४ ऑगस्ट/वार्ताहर

स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर येथील आरोग्य विभागासह तहसील व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पूर्वदक्षता म्हणून खबरदारीच्या उपाययोजनांबाबत नगरपालिका कर्मचारी व आरोग्य विभागाच्या स्वतंत्र बैठका विभागप्रमुखांनी घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टेकाळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्वतंत्र बैठक घेऊन परिस्थिती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगितले. या रुग्णालयात याच पाश्र्वभूमीवर स्वतंत्र कक्ष निर्माण करून बाह्य़ रुग्ण नोंदणीच्या वेळा वाढविल्याचे सांगितले. या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी अधिक जागरुक असावे अशा सूचना केल्या. नगरपालिका प्रशासनानेही या साथीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या खबरदारीच्या व स्वच्छतेच्या सूचना केल्या.

युवकाच्या मृत्यूबाबत नातलगांमध्ये संशय
भोकर, १४ ऑगस्ट/वार्ताहर

भोकर येथे सासुरवाडी आलेल्या किनवटच्या युवकाचा नांदेड रोडवरील वागद शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने त्याने आत्महत्या केली की त्याचा खून करण्यात आला याबद्दल नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. किनवट येथील इस्लामपुरा भागात राहणारा हनिफ कुरेशी (वय ३५) याची भोकर ही सासुरवाडी असून तो ९ ऑगस्टला येथे आला होता. रविवारी सायंकाळपासून सासुरवाडीतून बेपत्ता असलेल्या हनिफचा मृतदेह १२ ऑगस्टला वागद शिवारातील रामजी वागदकर यांच्या शेतात आढळळा. याप्रकरणी भोकर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर त्याची ओळख झाल्याने तो किनवटचा रहिवासी असल्याचे सिद्ध झाले. पुढील तपास जमादार केशव जाधव करीत आहेत.

बालकाच्या मृत्यूने निलंगा तालुक्यात घबराट
निलंगा, १४ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील हाडगा येथे एका अडीच वर्षाच्या बालकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याच्या अफवेने शहरासह तालुक्यात एकच घबराट निर्माण झाली आहे. हाडगा, ता. निलंगा येथील अर्जुन श्रीनिवास वाघमारे या अडीच वर्षाच्या बालकाला १२ ऑगस्टला सर्दी व ताप आल्याने येथील खासगी दवाखान्यात उपचार करून घरी पाठवण्यात आले होते. मात्र गुरुवारी पुन्हा ताप वाढल्याने झटके येऊन त्याचा मृत्यू झाला. या बालकाचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला, अशी अफवा शहरासह तालुक्यात पसरली. त्यामुळे जनतेत घबराट पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार निंबाळकर यांनी गावास भेट देऊन मयत बालकाच्या कुटुंबाची भेट घेतली व त्यास झालेल्या आजाराची माहिती घेऊन चौकशी केली असता त्या बालकास जन्मापासूनच झटके येत असल्याचे समजले.

रामा धुतमल यांचे निधन
लोहा, १४ ऑगस्ट/वार्ताहर

नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामा धुतमल यांचे आज आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतीच्या काळापासून पाणीपुरवठा विभागात रामा धुतमल कामाला होते. नगरपालिकेत ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे आज निधन झाले.

मटका बुकीवर छापा,दोघांना अटक
मानवत, १४ ऑगस्ट/वार्ताहर

येथील दोन मटका बुकीवर धाड टाकून पोलिसांनी कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल केला. पालिका कार्यालयासमोर एका टपरीमध्ये आरोपी अशोक रंगनाथ पवार यास कल्याण नावाचा मटका (जुगार) खेळताना रंगेहात पकडले. त्याच्याजवळील २५० रुपये नगदी व जुगारांचे साहित्य जप्त करण्यात आले. तर आठवडी बाजारामध्ये आरोपी राजू यमाजी कांबळे यालादेखील जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्याच्या जवळील रोकड तीनशे रुपये आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. परभणीच्या गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मेहबूबखान पठाण यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन गटात हाणामारी, चार जणांवर गुन्हे
अंबड, १४ ऑगस्ट/वार्ताहर

सार्वजनिक समाज मंदिरावर अतिक्रमण केल्याच्या वादावरून दाढेगाव, ता. अंबड येथे दोन गटांत झालेल्या मारामारीत भारत साहेबराव लांडगे हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गोंदी पोलिसांनी भारत लांडगे यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या गटातील चारजणांवर गुन्हे नोंद केले आहेत. आरोपींना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलीस सूत्रांनुसार, दाढेगाव येथील दलित वस्तीतील सार्वजनिक समाज मंदिराच्या जागेवरून दलितांतील लांडगे कुटुंबाच्या दोन गटांत वाद उद्भवून याचे रूपांतर शनिवारी जबर हाणामारीत झाले. शेषराव लांडगे यांच्यासह त्यांच्या गटातील साथीदारांनी साहेबराव लांडगे, भारत लांडगे, कांता लांडगे यांना काठय़ा, सळईने जबर मारहाण केली. यात भारत लांडगे याच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच शेषराव लांडगे यांनी साहेबराव लांडगे यांच्या मालकीचा कडब्याच्या गंजीला आग लावून जाळून टाकली. यात भारत लांडगे यांच्या तक्रारीवरून शेषराव लांडगे, संदीप लांडगे, सुधाकर लांडगे, सचिन ऊर्फ पिन्या लांडगे अशा चारजणांवर गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी अद्यापि अटक केलेली नाही.

मोटारसायकलचोरास अटक; सहा गाडय़ा जप्त
परभणी, १४ ऑगस्ट/वार्ताहर

शहरातून गाडय़ांची चोरी करणारा मोटारसायकल चोरांच्या टोळीचा म्होरक्या नानलपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईत सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून चोरून विकलेल्या आणखी मोटारसायकल मिळण्याची शक्यता पोलीस निरीक्षक व्यंकट साळुंके यांनी व्यक्त केली.या प्रकरणात अजीम यास नानलपेठ पोलिसांनी अटक केली आहे. जप्त केलेल्या सर्व गाडय़ांचे नंबर बदलण्यात आल्याचे आरोपीने कबूल केले.

जिल्हा बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेणार - पाटील
उमरगा, १४ ऑगस्ट/वार्ताहर

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण व कटू निर्णय घेऊ, असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन अध्यक्ष बापुराव (काका) पाटील यांनी केले. तालुक्यातील सुंदरवाडी गावकऱ्यांच्या वतीने श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रभाकर पाटील होते. पंचायत समितीचे उपसभापती गोविंद पाटील, विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, पंचायत समिती सदस्य माणिक जाधव, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज पाटील (कोथळीकर), मुरूमचे नगराध्यक्ष शिवाजी चेंडके, सरपंच गोदावरी कठारे आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, बँकेवरील आर्थिक निर्बंध दूर करण्यासाठी राज्य सरकारकडे ११० कोटींचे अनुदान मागणार आहे. शेतकऱ्यांना आगामी काळात बँकेमार्फत त्यांना मदत करण्यात येईल.

काँग्रेस भवनात आज ध्वजारोहण
लातूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर
स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या (शनिवारी) सकाळी साडेसात वाजता काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, नरेश पंडय़ा, कृष्णा बेल्लाळे, सनीता आरळीकर यांनी केले आहे.

वीरशैव मराठी साहित्य संमेलन स्थगित
तुळजापूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर
महाराष्ट्र वीरशैव मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि.१६) येथे आयोजित केले होते. स्वाइन फ्लूच्या सावटामुळे ते रद्द करण्यात आल्याचे आयोजक, निमंत्रक नागनाथ गिरवलकर, गुरुनाथ बडुरे, मन्मथप्पा तोडकरी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. संमेलनाची पूर्वतयारी गेल्या दीड महिन्यांपासून सुरू होती.

स्वाइन फ्लूमुळे तुळजापूरमध्ये भाविकांच्या संख्येत घट
तुळजापूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर

स्वाइन फ्लू साथीच्या भीतीने भाविकांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र शुक्रवारी यात्रेचा ओघ सुरू झाल्याने ओस पडलेल्या बाजार पेठेत वर्दळ वाढल्याचे दिसून आले. पण परिवहन मंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. बसस्थानकावरही वर्दळ नाही. खासगी वाहनधारकही प्रवाशी नसल्याने चिंताग्रस्त आहेत.

विद्यार्थ्यांना मास्कचे वितरण
स्वाइन प्लू साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा हेतू बाळगून तुळजापूर शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मास्क तसेच निलगिरीच्या कुप्या वितरित करण्याचा अभिनव उपक्रम कै. किसनलाल अग्रवाल ट्रस्टने हाती घेतला आहे. सहा हजार विद्यार्थ्यांना मास्क तसेच निलगिरी कुप्या देत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष देवीचंद्र अग्रवाल यांनी गुरुवारी दिली.

मुदखेडचे माजी नगराध्यक्ष चौधरींचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर
नांदेड, १४ ऑगस्ट/वार्ताहर
मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांचा काँग्रेस पक्ष प्रदेशाचा सोहळा लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुदखेड तालुक्यात काही ठिकाणी भेट दिली. त्यांच्या याच दौऱ्यात श्री. चौधरी यांच्या काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम व्हावयाचा होता. तसेच श्री. चौधरी व त्यांचे समर्थक शामियाना टाकून सज्जही होते; पण मुख्यमंत्री मंगळवारच्या दौऱ्यात त्यांच्या कार्यस्थळी गेलेच नाहीत, असे सांगण्यात आले. या संदर्भात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता असे समजले की, काँग्रेस पक्षात जाण्यासाठी श्री. चौधरी यांनी ‘जी. टी. चॅनल’ निवडल्यामुळे दुसऱ्या काही ‘चॅनल्स’मधून बरीच ‘खरखर’ झाली आणि मग तांत्रिक कारण देत नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

पालकमंत्री दिलीप देशमुख दोन दिवस लातूर दौऱ्यावर
लातूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर
पालकमंत्री दिलीपराव देशमुख हे १५ व १६ ऑगस्ट असे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. १५ ऑगस्टला सकाळी ९.०५ वा. जिल्हा क्रीडासंकुल येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, ९.४० वा. मांजरा सहकारी साखर कारखान्याकडे प्रयाण, सकाळी १० वा. मांजरा साखर कारखान्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ११.३० वा. मांजरा आयुर्वेद महाविद्यालय लातूर येथील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिरास उपस्थिती, सायं. ५.३० वा. चिन्मयानंद स्वामी मठ, दर्जी बोरगाव तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमास उपस्थिती. १६ ऑगस्टला सकाळी ९.३० वा. आशियाना निवासस्थान येथे राखीव. दुपारी ३ वा. शिरूर अनंतपाळकडे प्रयाण. ४ वा. विविध विकासकामांचा शुभारंभ. सायं. ६ वा. निलंगा दर्गा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन. सायं. ६.३० वा. मोटारीने लातूरकडे प्रयाण. रात्री २.३० वा. लातूर एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण.

स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या ठिकाणी वस्तू आणण्यास बंदी
औरंगाबाद, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी
स्वातंत्रदिनाला उद्या (शनिवारी) सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्यासाठी येताना नागरिकांनी छत्री आणि मोबाईल वगळता इतर कोणतीही वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयातील मैदानावर होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमासाठी अर्धा तास आधी स्थानापन्न व्हावे आणि सद्यस्थिती लक्षात घेता भावनेचा व प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केले आहे.

हुतात्मा स्तंभ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
सोयगाव, १४ ऑगस्ट/वार्ताहर

स्वातंत्र्यलढय़ासाठी ज्यांनी बलिदान केले अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेला हुतात्मा स्तंभ दोन वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. स्वातंत्र्यलढय़ात प्रश्नणाची बाजी लावून ज्यांनी योगदान दिले अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पंचायत समितीच्या मैदानात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला होता. मात्र काळाच्या ओघात या स्मारकाचे बांधकाम खिळखिळे झाले. त्यामुळे हुतात्मा स्मारकाचा स्तंभ काढून गटविकास अधिकाऱ्याच्या घरात ठेवण्यात आला. या गोष्टीला दोन वर्षं उलटली. मात्र हुतात्मा स्मारकाची किरकोळ दुरुस्ती होऊ शकली नाही.

उपेक्षितांच्या न्यायासाठी संघर्षाचा इशारा
लोहा, १४ ऑगस्ट/वार्ताहर

भटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी केंद्र सरकारने तिसरी सूची जाहीर करावी व राज्यातील भटक्या-विमुक्तांना घटनात्मक आरक्षण जाहीर करावे, भटक्यांच्या विकासासासाठी सरकारने कृती कार्यक्रम हाती घ्यावा, उपेक्षितांच्या न्यायासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे, असा इशारा राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जमाती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रश्न. संजय बालाघाटे यांनी केले. माळेगाव येथे भटक्या-विमुक्तांच्या मेळाव्यात प्रश्न. बालाघाटे बोलत होते. अध्यक्षपदी बाजार समितीचे सभापती रुस्तूम धुळगंडे होते. प्रमुख पाहुणे मारुती पंदलवाड, साहेबराव हरगावकर, माधव ससाळे होते.

‘बंजारा युवकांनी समाजाला पुढे न्यावे’
उमरगा, १४ ऑगस्ट/वार्ताहर

जन्मजात गुन्हेगारी जात म्हणून जो ठपका बंजारा समाजावर बसला आहे तो पुसून काढायचा असेल तर बंजारा समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला प्रगतीकडे न्यावे, असे प्रतिपादन लोहारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिश्चंद्र राठोड यांनी केले. तालुक्यातील मनोहर नाईक तांडा (होळी) येथे बंजारा परिवर्तन संघटनेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबुराव राठोड होते. या वेळी श्रीमंत चव्हाण, उत्तम राठोड, दत्ता चव्हाण, बबिता राठोड आदी उपस्थित होते.

रितेश पिलाजी यांना पुरस्कार
धारूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर

संगणक अभियंता रितेश सुधीरराव पिलाजी यांना अमेरिकेमध्ये कॉग्निझंट कंपनीने ‘आबाऊ अ‍ॅड बीअर’ हे पारितोषिक देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. येथील पिलाजी हे कॉग्निझंट कंपनीमध्ये प्रश्नेग्राम अ‍ॅनालिस या पदावर आहे. जुलै २००८ मध्ये पुणे येथे स्टार ऑफ क्वाटर्स हे पारितोषिक देऊन अमेरिकेतील शिकागो येथे कंपनीने त्यांची नियुक्ती एक वर्षापूर्वी केली होती.

बैलगाडीसह ‘छावा’ चा मोर्चा
लोहा, १४ ऑगस्ट/वार्ताहर

तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, मराठा समाजास आरक्षण द्या या प्रमुख मागण्यांसाठी छावाच्या वतीने लोहा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दगडगावकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.छावाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे, संयोजक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील दगडगावकर आदी यात सहभागी झाले होते.

घरफोडय़ा करणारी टोळी गजाआड
औरंगाबाद, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

अल्पवयीन बालकांच्या मदतीने घरफोडय़ा करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या टोळीत एका सोनाराचाही समावेश आहे. मनोज रतन हिवरकर (वय १९, रा. इंदिरानगर, मुकुंदवाडी) आणि प्रशांत अशोक विसपुते (२२, रा. सिडको, एन-२) अशी अटक करण्यात आलेल्या दोन प्रमुख आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सात अल्पवयीन बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. मेहेत्रे यांच्या पथकाने मनोज याला ताब्यात घेतले. त्याने घरफोडी केल्याची कबुली देत प्रशांत आणि अन्य सात अल्पवयीन मुलांची मदत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वाना अटक केली. या नऊ जणांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा घरफोडय़ा केल्याची कबुली दिली.

शोधग्रंथाचा उद्या लोकार्पण सोहळा
लातूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर
‘डॉ. चंद्रभानू सोनवणे का हिंदी भाषा तथा साहित्य का योगदान’ या शोधग्रंथाचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.१६) डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. हिंदी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक प्रश्न. डॉ. चंद्रभानू सोनवणे यांच्या जीवनावर व त्यांच्या समग्र साहित्यावर डॉ. शोभा हणवते यांनी प्रश्न. डॉ. अंबादास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची हिंदी पीएच.डी. मिळविली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी हिंदी विभागाध्यक्ष आणि प्रसिद्ध समीक्षक प्रश्न. डॉ. रामजी तिवारी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार राहणार आहेत.

जैन मुनींच्या उपवासाची सांगता
औरंगाबाद, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

चार्तुमासानिमित्त मुनिराज रत्नतिलकविजयजी म. सा. आणि दिग्रत्नाश्रीजी यांच्या ३० दिवसांच्या उपवासाची सांगता झाली. यानिमित्त प्रवचन, संस्कार बीजारोपण, आर्य संस्कार शिबिर आदी विविध कार्यक्रम झाले.