Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्वाइन फ्लू’ची ‘घागर उताणी’ करून गोपाळांचा जल्लोष
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

पुण्यापाठोपाठ मुंबईमध्ये पसरत असलेल्या स्वाइन फ्लूच्या घबराटीवर आज दहिहंडीच्या जल्लोषाने

 

मात केली. स्वाइन फ्लू तसेच कोणत्याही राजकीय पक्षांच्या आवाहनाला गंभीरपणे न घेता मुंबापुरीसह ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी गोपाळकाला उत्सव प्रचंड उत्साहात साजरा केला. मोठय़ा रकमांच्या दहीहंडय़ा न बांधण्याचा निर्णय शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने घेतल्यानंतरही ठिकठिकाणच्या गोविंदा पथकांनी आर्थिक फटका सहन करून मोठय़ा उत्साहात उत्सव साजरा केला. मुंबई-ठाण्यामधील गल्लोगल्ली बांधलेल्या मानाच्या दहीहंडय़ा फोडण्यात गोविंदा पथके दिवसभर व्यस्त होती. गोपाळकाला उत्सव साजरा करतानाच गोविंदा पथकांनी सार्वजनिक आरोग्याचेही भान राखले होते. स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे शाळा, महाविद्यालये, मल्टिप्लेक्स बंद ठेवण्याची सूचना राज्य सरकारने केल्यानंतर मुंबईकरांवर साथीबाबत विचित्र दडपण होते. त्यातच गोपाळकाल्याचा उत्सव आल्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता विविध स्तरावर वर्तविण्यात येत होती. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी आणि काही निवडक गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विशेष काळजी घेण्याची सूचना केली होती. स्वाइन फ्लूच्या प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व दहीहंडय़ा रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या तीन मोठय़ा दहीहंडय़ा रद्द झाल्या. परिणामी मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन काल रात्री तातडीने दहीहंडी उत्सव समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर आणि गोविंदा पथकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी गोपाळकाला पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आपला उत्सव रद्द करण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये चलबिचल सुरू झाली. परंतु गोविंदा पथकांच्या आग्रहाखातर ‘संकल्प प्रतिष्ठान’तर्फे उत्सव साजरा करण्याचा निर्धार सचिन अहिर यांनी केला. मात्र रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दहीहंडी उत्सवही रद्द केल्याचे घोषित केले. त्यामुळे अहिर यांना आपला दहीहंडी उत्सव रद्द करावा लागला. समन्वय समितीमध्ये एकमत न झाल्यामुळे हा घोळ झाला असे स्पष्ट करून त्यांनी आज सकाळी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. स्वाइन फ्लूच्या भीतीने दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी माघार घेतली. त्यामुळे गोविंदा पथकेही संभ्रमित झाली होती. उद्या गोविंदा काढायचा की नाही असा प्रश्न गोविंदा पथकांना पडला होता. परंतु या संभ्रमावर मात करून गोविंदा पथकांचे गोविंदा आज सकाळी दहीहंडी फोडायला बाहेर पडले. बहुतांशी गोविंदा पथकांनी सार्वजनिक आरोग्याचे भान ठेवून स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी तोंडावर मास्क बांधून हा उत्सव साजरा केला. स्वाइन फ्लूची भीती असताना आणि दहीहंडी फोडून मोठी रक्कम मिळण्याची शक्यता नसतानाही गोविंदा पथकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.