Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुख्यमंत्री चव्हाण व राणे यांच्यात शीतयुद्ध सुरू !
मुंबई, १४ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी दोन हात करणारे उद्योगमंत्री नारायण राणे हे आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फारसे समाधानी नसल्याची चर्चा

 

मंत्रालयाच्या वर्तुळात आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बरोबरीने राणे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल हल्ला चढविल्याने त्याला पुष्टीच मिळते.
विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी राणे सोडत नसत. देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात काँग्रेसमध्येच मंत्र्यांचा एक गट त्यांच्या विरोधात गेला होता. त्याचे नेतृत्व अर्थातच राणे यांच्याकडे होते. तेव्हा राणे व अशोक चव्हाण हे बरोबरीने होते. व्हिडिओकॉन कंपनीला जमीन देण्याच्या निर्णयावरून राणे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला होता. तेव्हा अशोक चव्हाण यांनीच राणे यांची समजूत काढण्याकरिता पुढाकार घेतला होता. नेतृत्वाबदलानंतर राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला होता. तरीही मुख्यमंत्र्यांनी राणे यांनी काँग्रेस सोडू नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले. राणे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी चव्हाण यांनीच नवी दिल्लीत प्रयत्न केले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री व राणे यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध राहिलेले नसल्याचे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जात आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल राणे यांचा आक्षेप आहे. निवडणुका जवळ आल्याने पटापट निर्णय घेतले जावेत, अशी राणे यांची अपेक्षा होती. मात्र निर्णय घेण्यात मुख्यमंत्री विलंब लावतात, असा राणे यांचा आक्षेप आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील त्रुटींची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या राम प्रधान समितीचा अहवाल जाहीर न करता फक्त कृती अहवाल सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरही राणे यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती. प्रकरण संवेदनशील असताना हे योग्यपणे हाताळले गेले नाही, अशी राणे यांची भावना होती. गेले काही दिवस राणे हे खासगीत आपल्या विरोधात बोलतात, असा मुख्यमंत्र्यांचा समज झाला आहे. त्यातच विलासराव आणि राणे यांच्यात झालेल्या भेटीत उभयतांनी मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केल्याचे मुख्यमत्र्यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. यामुळे अशोकराव अधिकच अस्वस्थ झाले आहेत.