Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईच्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी, १४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

गणपतीच्या घरगुती सजावटीसाठी येथे मुंबईहून आलेल्या ११ जणांपैकी दोघांचा आज समुद्रात

 

बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सध्या मुंबईत स्थायिक झालेल्या संतोष प्रभाकर कोरेकर (२६, रा. मानखुर्द) याचे येथे वडिलोपार्जित घर आहे. तेथे बसविण्यात येणाऱ्या घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी तो आपल्या दहा मित्रांसह आज सकाळी रेल्वेने येथे आला. त्यानंतर थेट घरी जाण्याऐवजी कोणीतरी समुद्रावर आंघोळ करून जाण्याची टूम काढली. त्यानुसार सर्वजण भाटय़े येथील समुद्रकिनारी गेले. तेथे पाण्यात उतरल्यानंतर थोडय़ाच वेळात मोठी लाट आली. त्यामुळे चौघेजण गटांगळ्या खाऊ लागले. दोघांनी कसाबसा किनारा गाठला, पण महेश कांबळे (२४, रा. मानखुर्द) आणि संतोष कोरेकर पाण्यामध्ये बेपत्ता झाले. त्यापैकी महेशचा मृतदेह थोडय़ा वेळाने किनाऱ्यावर सापडला, पण संतोष संध्याकाळपर्यंत बेपत्ताच होता. या दोघांबरोबर आलेले अन्य नऊ युवक घटनास्थळी विषण्णपणे त्याचा शोध घेत होते. साधारणपणे एकाच वयोगटातील हे सर्वजण सलग तीन दिवसांच्या सुट्टीची संधी साधून येथे आले होते. संतोष कोरेकरच्या घरी मुक्काम करून त्याच्या घरगुती गणपतीची सजावट करण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी त्यांनी मुंबईहून सजावटीचे साहित्यही आणले होते, पण या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आणि दु:खाची छाया पसरली.