Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘मेजर ब्लॉक’पेक्षा समन्वयाचा अभाव करणार प्रवाशांचे हाल!
मस्जिद स्थानकातील पाडकाम सुरू
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मस्जिद स्थानकातील जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याच्या कामाला आज रात्रीपासून सुरुवात झाली. तब्बल ४८ तास चालणाऱ्या या कामासाठी करण्यात येणाऱ्या ‘मेजर ब्लॉक’च्या निमित्ताने

 

रेल्वे आणि रस्ते वाहतूक एजन्सी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षांने समोर आले आहे. त्यामुळे मेजर ब्लॉकपेक्षा या एजन्सीमधील समन्वयाचा अभाव प्रवाशांचे अधिक हाल होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
मस्जिद स्थानकातील या पाडकामासाठी मध्य रेल्वेने जवळपास महिन्याभरापासून या ब्लॉकचे नियोजन केले होते. या ब्लॉकदरम्यान सीएसटी-भायखळा आणि सीएसटी-वडाळादरम्यानची उपनगरी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. याखेरीज ब्लॉकच्या काळात प्रवाशांना चर्चगेट-वांद्रे दरम्यान पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी अधिकाधिक प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेचा वापर होणार आहे. तरीदेखील पश्चिम रेल्वेने १६ ऑगस्ट रोजी मरीन लाईन्स ते माहीमदरम्यान जम्बो ब्लॉक करण्याची घोषणा केली होती.
मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे आधीच हाल सोसणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेवरील या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या हालात आणखीनच भर पडेल, ही बाब पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा हा ब्लॉक रद्द केला. मात्र मध्य रेल्वेने मेजर ब्लॉकची पूर्व कल्पना पश्चिम रेल्वेस दिली नव्हती का? ती दिली असल्यास मागील काही आठवडय़ांत रात्रीचे ब्लॉक घेणाऱ्या पश्चिम रेल्वेने रविवारी दिवसाच्या ब्लॉकचे नियोजन का केले? हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत.
मेजर ब्लॉकच्या या काळात भायखळा स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून दर २० मिनिटांनी आणि दादर स्थानकातील फलाट दोन व तीनवरून दर १० मिनिटांनी कल्याणपर्यंत विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. याखेरीज दादर स्थानकातील पाच ते आठ क्रमांकाच्या फलाटांवरून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणार आहेत.
हार्बर मार्गावरही वडाळ्याहून दर १० मिनिटांनी वांद्रे आणि पनवेलकरिता दर दहा मिनिटांनी विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. कल्याणच्या पुढील सर्व उपनगरी लोकल नियमित वेळापत्रकानुसार सोडण्यात येतील असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
एरव्ही दिवसरात्र प्रवाशांच्या गर्दीने ओसांडून वाहणारे सीएसटी स्थानक मेजर ब्लॉकच्या निमित्ताने सुनेसुने होणार आहे. ब्लॉकच्या काळात एकही लोकल सीएसटीला पोहोचणार नसल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-सीएसटी, वडाळा-सीएसटी आणि सीएसटी-कुलाबादरम्यान ‘बेस्ट’तर्फे ३७ विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बेस्टतर्फे केवळ १५ गाडय़ा चालविण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र सीएसटीकडे येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहता, ही संख्या पुरेशी नसल्याचा अंदाज आहे.