Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

रखडलेल्या उड्डाणपुलांच्या कंत्राटदारांना वाढीव दरवाढीचे बक्षीस!
मुंबई १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नागरी पायाभूत सुविद्या प्रकल्पाअंर्तगत बांधण्यात येणाऱ्या १२ उड्डाणपुलांपैकी अनेक महिने बांधकाम रखडलेल्या पुलांच्या कंत्राटदारांना सुधारित वाढीव दर देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय वसई-विरार येथील काही रस्त्यांची कामे व पुलाच्या कामाला या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

सफाई कामगारांचा मोठा विजय; अखेर किमान वेतन मिळाले
मुंबई, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महापालिकेतील सफाई कामगारांना अखेर किमान वेतन लागू करण्यात आले आहे. कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या अथक परिश्रमाला मिळालेले हे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया सफाई कामगारांनी व्यक्त केली. सफाई कामगारांना केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे किमान वेतन १८० रुपये देण्यात यावे, अशी मागणी कचरा वाहतूक श्रमिक संघाने केली होती. पालिका आयुक्त जयराज फाटक, महापौर शुभा राऊळ, स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी ही मागणी मान्य केली.ोता १५ ऑगस्टपासून सफाई कामगारांना हे वेतन मिळणार आहे, अशी माहिती संघाचे नेते मिलिंद रानडे यांनी दिली.

‘अर्थपूर्ण’ फाइलींचा प्रवास रखडवल्यानेच मंत्र्यांची ओरड !
खास प्रतिनिधी
मुंबई, १४ ऑगस्ट

निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपली कामे मार्गी लागावीत, अशी प्रत्येकालाच घाई झाली आहे. मग मंत्रीही त्याला अपवाद कसे ठरतील. भूखंड वाटप, खासगीकरण, नव्या मंजुऱ्या या जमीन व्यवहाराशी संबंधित ‘अर्थपूर्ण’ फाईलींचा प्रवास रखडल्यानेच काही मंत्र्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मंत्र्यांच्या या असंतोषाला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाट करून दिली.

उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेसाठीची राष्ट्रपती शौर्यपदके जाहीर
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस. पी. एस. यादव, रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासह ४० हून जास्त पोलिसांना उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल दिली जाणारी राष्ट्रपती पदके आज घोषित करण्यात आहेत. याशिवाय श्रीनिवास दांडिकवार आणि पगार भास्कर यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर करण्यात झाली आहेत.

दहशतवाद्यांकडे सापडलेल्या नोकिया मोबाईलची माहिती भारतामध्येही उपलब्ध होऊ शकली असती!
कंपनी प्रतिनिधीची साक्ष
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे सापडलेले ‘नोकिया’ कंपनीचे पाच मोबाईल जून २००८ मध्ये पाकिस्तानमधील ‘पाकिस्तान प्रा. लि’. आणि ‘युनायटेड मोबाईल’ या दोन कंपन्यांकडून खरेदी करण्यात आले होते. त्याबाबतच्या सर्व व्यवहाराची माहिती भारतातील कंपनीच्या मुख्य कार्यालयातूनही उपलब्ध झाली असती, अशी साक्ष नोकिया कंपनीच्या अमेरिकेतील प्रतिनिधीने आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर दिली.

मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याबद्दल काँग्रेस भुजबळांवर नाराज
मुंबई, १४ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चा जाहीर केल्याबद्दल प्रदेश काँग्रेसने उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करतानाच नाराजीही व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, अशी अपेक्षाही काँग्रेसने व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभेद असल्यास उभयतांनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा, असे संकेत अथवा परंपरा आहे.

निरीक्षक, एसीपी यांच्या बदल्या पोलीस आयुक्त करू शकत नाहीत
मुंबई, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या हुद्दय़ांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आयुक्त त्यांच्या अखत्यारीतील आयुक्तालयाच्या क्षेत्रातही एका पदावरून दुसऱ्या पदावर करू शकत नाहीत, हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) व उच्च न्यायालयात अलीकडेच झालेल्या दोन प्रकरणांच्या निकालांवरून अधोरेखित झाले आहे. हे पोलीस अधिकारी ‘अ’ वर्गात मोडतात व त्यांची वेतनश्रेणी रु. १०,६५०- रु.१५,८५० हून कमी आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी राज्य सरकारने केलेल्या कायद्यानुसार या प्रवर्गात मोडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार खात्याच्या सचिवांच्या सल्ल्याने गृहमंत्र्यांना दिलेला आहे.

ज्ञानेश महाराव यांना अत्रे पुरस्कार प्रदान
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणारा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे पुरस्कार पत्रकार ज्ञानेश महाराव यांना नुकताच ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात पत्रकार संघाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे उद्घाटन आणि ‘पत्रकार दर्पण’च्या दत्तू बांदेकर विशेषांकाचे प्रकाशनही रायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना रायकर म्हणाले की, वृत्तपत्र क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना खूप संधी उपलब्ध असून त्यासाठी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पत्रकारिता हा धर्म म्हणून स्वीकारावा. तर महाराव म्हणाले की, आयुष्यात आपण नेहमीच जास्तीतजास्त लोकाभिमुख पत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी रायकर यांचे स्वागत केले. कार्यवाह विजयकुमार बांदल यांनी महाराव यांचा परिचय करुन दिला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या हस्ते महाराव यांना संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेचा पहिला अंक भेट देण्यात आला.

चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ ‘एमएमआरडीए’ बांधणार उड्डाणपूल
मुंबई १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

चेंबूर परिसरात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अमर महल येथे उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या उड्डाणपुलावर ४९ कोटी रुपये खर्च होणार असून या कामांबरोबरच पांजरपोळ ते मानखुर्द फाटयापर्यतच्या रस्ते बांधणीचे १६८ कोटी रुपये खर्चाचे कामही गुरुवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. नवीन बसगाडय़ा खरेदी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला २० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

रेल्वेमार्गावरील बेकायदा केबलविरुद्ध पश्चिम रेल्वेची कारवाई
मुंबई , १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

गेल्या महिन्यात मरीन लाईन्स रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर टीव्हीची केबल पडल्याने पश्चिम रेल्वेची चारही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमार्गावरून बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या केबल पश्चिम रेल्वेकडून काढून टाकण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. चर्चगेट-विरारदरम्यान रेल्वेमार्गावरून सुमारे १०५ केबल बेकायदेशीरपणे टाकण्यात आल्या आहेत. त्या टाकणाऱ्या जवळपास ८० जणांविरुद्ध आजवर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून या केबलही काढून टाकण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाची कायदेशीर परवानगी घेऊन रेल्वेमार्गाखालून अथवा रेल्वे पुलांवरून केबल टाकण्याची सुविधा पश्चिम रेल्वे उपलब्ध करून देणार आहे. मात्र त्यासाठी अवघ्या ९ जणांनी अर्ज केले असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.