Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

काळ्या-पिवळ्या टॅक्सींत ‘एसी’
प्रवाशांची लूट करण्याचा खुला परवाना?
कैलास कोरडे

एकाच हॅण्डसेटमध्ये जीएसएम आणि सीडीएमए नेटवर्क असलेल्या मोबाइलप्रमाणे काळ्या-

 

पिवळ्या टॅक्सी साध्या व वातानुकूलित म्हणून वापरण्यास परवानगी देण्याविषयी चाचपणी करण्याची सूचना राज्य शासनाने मुंबईतील आरटीला केली आहे. मात्र अशा प्रकारची परवानगी देणे म्हणजे टॅक्सीचालकांना प्रवाशांची लूट करण्याचा खुला परवाना देण्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया वाहतूक क्षेत्रातून उमटत आहे.
मुंबईतील प्रश्नदेशिक परिवहन कार्यालयास पत्र लिहून परिवहन विभागाने या संबंधी कायदेशीर बाबी तपासण्यास सांगितले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सींमध्ये ‘एसी’ बसविणे, प्रवाशांच्या मर्जीनुसार टॅक्सींचा वातानुकूलित अथवा विना वातानुकूलित म्हणून वापर करणे, एका मीटरच्या सहाय्याने प्रवाशांकडून भाडेवसुली करणे आदी गोष्टींची चाचपणी करण्याची सूचना केली आहे.
राज्य परिवहन प्रश्नधिकरणाच्या (एसटीए) आदेशानुसार शहरातील २५ वर्षावरील हजारो जुन्या टॅक्सी भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्याऐवजी व्ॉगन-आर, सॅण्ट्रो, इंडिका, एस्टीम यांसारख्या ‘एसी’ गाडय़ा टॅक्सी म्हणून रस्त्यावर आल्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सींना वातानुकूलीत यंत्रणेसह नोंदणी करता येत नाही. तरीही बहुतांश ‘एसी’ वाहने टॅक्सी म्हणून परवान्यावर चढविण्यात आली आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘टॅक्सी-ऑटो रिक्षा वेलफेअर संघ’ या टॅक्सी उद्योगात फारशा कोणालाही ज्ञात नसलेल्या संघटनेच्या मागणीच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गृह विभागातील कक्ष अधिकारी शहाजहान मुलाणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्रात ‘शक्य असल्यास परवानगी देताना टॅक्सींच्या आतील व बाहेरील बाजूस प्रवाशांना स्पष्टपणे दिसतील अशा पद्धतीने वातानुकूलित व विना वातानुकूलित भाडेदर लिहिण्यात यावेत’, अशी सूचनाही केली आहे. मात्र प्रश्नदेशिक परिवहन प्रश्नधिकरणाच्या (आरटीए) कक्षेत येणाऱ्या या विषयावरील सूचना मंत्रालयातून देण्यात येत असल्याबद्दल आरटीओ वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
परिवहन विभागाने पाठविलेले उपरोक्त पत्र प्रमाण मानून सध्या आरटीओ कार्यालयात सर्व ‘एसी’ वाहनांची सर्रासपणे टॅक्सी म्हणून नोंदणी सुरू आहे. अशा प्रकारे बेकायदा ‘एसी’ बसविलेल्या अनेक काळ्या-पिवळ्या टॅक्सी केवळ पंचतारांकीत हॉटेल आणि बडय़ा कंपन्यांबाहेर मनमानी भाडे आकारून प्रवाशांना लूट करीत आहेत.
काळ्या-पिवळ्या टॅक्सींना वातानुकूलित व विना वातानुकूलित म्हणून परवानगी देण्याची बाब वरवर आकर्षक वाटत असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अवघड आहे. या टॅक्सींतील भाडे आकारणीवर नियंत्रण कसे ठेवणार? असे प्रश्न उपस्थित करून प्रवाशांना यामुळे फायदा होण्याऐवजी त्यांची लुबाडणूक होईल, असे मत आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.
फ्लीट टॅक्सी आल्यापासून मुंबईतील सुमारे साडेतीन हजार वातानुकूलित कूल कॅबचा धंदा बसला आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सींनाही ‘एसी’ बसविण्याची परवानगी दिल्यास ‘कूल कॅब’धारकांवर टॅक्सी विकण्याची वेळ येईल, अशी भीती मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष ए. एल. क्वॉड्रोज यांनी व्यक्त केली आहे. तसेच या टॅक्सींचे भाडे कसे निश्चित करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.