Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईत आकाराला आले बच्चेकंपनीसाठी पार्क
प्रतिनिधी

लहान बाळांपासून ते १० वर्षावरील मुलांच्या आवडी व गरजा लक्षात घेऊन पाच झोनमध्ये

 

विभागलेली समुद्रकिनाऱ्यावरची बाग, मासे व मुलांचे खास आकर्षण असलेल्या जंगली प्रश्नण्यांचे भव्य पुतळे आणि खास डेन्मार्कहून लहान मुलांसाठी मागविलेली खेळणी असे एक सुंदर पार्क मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावर उभे राहणार आहे. राज श्रॉफ यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेले हे पार्क बच्चेकंपनीसाठी नक्कीच आकर्षण ठरेल. शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या मुलांकरीता एक खास विभाग या पार्कमध्ये राखून ठेवण्यात आला आहे. व्हीलचेअर अथवा कुबडय़ा वापरणाऱ्या मुलांना खेळता येईल अशा रचनांची साधनेही बागेत ठेवण्यात आली आहेत.
या पार्कच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावर्षी हे पार्क मुलांना खेळण्यासाठी लवकरच खुले होणार आहे. एका वर्षात हे पार्क पूर्ण करून राज श्रॉफ यांनी मुंबईला एक अनोखी भेट दिली आहे. सध्या मुंबईत मुलांना खेळायला मोकळी मैदाने नाहीत. त्यामुळे पालक आपल्या मुलांना मॉलमध्ये घेऊन जातात. तिथे व्हिडिओ गेम खेळण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय मुलांसमोर नसतो. यामुळे त्यांच्यातील नैसर्गिक ऊर्जेला वाट मिळत नाही. उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना क्लबमध्ये घेऊन जातात. पण सगळेच पालक आपल्या मुलांना क्लबमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत. मुलांची ही गरज ओळखूनच त्यांना मोकळ्या हवेत स्वच्छंदपणे बागडता यावे यादृष्टीनेच आपण या पार्कची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, असे श्रॉफ यांनी सांगितले. लँडस्केप डिझायर स्वाती भिसे यांनी या पार्कची रचना केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पार्क लवकरच मुंबईकरांसाठी खुली होणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात हे पार्क सर्वासाठी खुले राहील. याचबरोबर २६/११ च्या हल्ल्यात बळी पडलेले १६ पोलीस व एनएसजीचे दोन कमांडो यांच्या घरी पुढच्या पाच वर्षापर्यंत दर महिन्याला ३३ हजार रुपये पोहोचविण्याचा संकल्प राज श्रॉफ यांनी सोडला आहे. राज श्रॉफ यांच्या ट्रस्टतर्फे सदर पोलीस आणि एनएसजी कमांडोंच्या कुटुंबियांना पोस्टडेटेड चेक देण्यात आले आहेत.