Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘कृष्णा : हिस्ट्री ऑर मिथ’
शोध भगवान श्रीकृष्णांच्या अस्तित्वाचा
प्रतिनिधी

कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभर सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येतो. तरीसुद्धा भगवान

 

श्रीकृष्ण खरेच होते की नाही, द्वारका अस्तित्वात होती की नाही याविषयी अनेकदा चर्चा केली जाते. दंतकथा म्हणूनही याकडे पाहिले जाते. म्हणूनच अनिवासी भारतीय डॉ. मनीष पंडित यांनी ‘कृष्णा : हिस्ट्री ऑर मिथ’ या नावाचा लघुपट बनवला आहे. महाभारत घडले की ते एक कल्पित महाकाव्य होते, याविषयीच्या चर्चेला उत्तर देण्याचा प्रयत्न डॉ. मनीष पंडित यांनी या लघुपटाद्वारे केला आहे. अजिबात कुठेही प्रचारकी थाट न आणता अतिशय संयत पद्धतीने खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्राचे पुरावे देत भगवान श्रीकृष्णाच्या अस्तित्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
जुहू येथील सुप्रसिद्ध ‘हरे राम हरे कृष्ण’ मंदिरातील ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस’मधील काही कृष्णभक्तांशी चर्चा करून ते कृष्णभक्तीकडे कसे वळले हे सांगण्याचा प्रयत्न या लघुपटात केला आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय ख्रिश्चन तरुण, पूर्वी पाद्री असलेले व मूळ इंग्लंडचे नागरिक असलेले जुळे भाऊ असे परदेशी लोक कृष्णभक्तीकडे का आणि कसे वळले यावरही लघुपटात प्रकाशझोत टाकला आहे. यातून एका धर्मावर श्रद्धा असलेला माणूस कृष्णभक्ती करू लागतो, इतका बदल त्याच्यात कसा घडतो यावर पुरेसे भाष्य या लघुपटातून केले आहे.
‘महाभारता’ची सत्यता पडताळण्यासाठी खगोलशास्त्रीय पुरावे देण्यात आले आहेत. उत्तर भारतातील उत्खननविषयक तज्ज्ञ राजेश पुरोहित, आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे (एएसआय) माजी महासंचालक डॉ. बी. बी. लाल, द्वराका उत्खननावर पर्यवेक्षण करणारे एएसआयमधील डॉ. राव यांच्यासारख्या नामवंतांनी दिलेल्या मुलाखतींमधील माहितीमुळे लघुपटाला एक दर्जा प्रश्नप्त झाला आहे. व्यवसायाने डॉ. मनीष पंडित हे न्यूक्लिअर मेडिसीन फिजीशियन असून ‘कम्पॅरेटिव्ह रिलीजन’ या विषयातील तज्ज्ञ आहेत. भगवान श्रीकृष्ण इतिहासात होऊन गेलेला महापुरुष होता. तसेच ‘महाभारता’चे युद्ध घडले ते ठिकाण म्हणजे कुरूक्षेत्र येथे जाऊन तेथील पुरातत्वविषयक पुरावे, उत्खननात सापडलेल्या चीजवस्तू या लघुपटात दाखविण्यात आल्या आहेत. द्वारका उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरूनही द्वारकानगरी होती असे यात दाखविण्यात आले आहे. सश्रद्ध भावनेतून, पण तरीही सत्यशोधनाचा डॉ. मनीष पंडित यांनी शास्त्राच्या आधारे प्रयत्न केला आहे.