Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

प्रश्नमुख्याने व्हायोलिन वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नाना साठे यांनी चित्रपटसृष्टी - नाटकात अभिनय, नभोवाणीसाठी लेखन, संगीत दिग्दर्शन, श्रुतिका कलाकार, विनोदी लेखन, गीतलेखन असा विविध क्षेत्रांत पाच दशकांहून अधिक काळ वावर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही नानांनी व्हायोलिन धडे दिले होते. १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रकाश चान्दे यांनी त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा.
परवाच्या १० ऑगस्टला ज्यांची जन्मशताब्दी सुरू झाली, त्या नाना साठे यांचे खरे नाव वासुदेव साठे. पण काही माणसे त्यांच्या घरगुती नावांनी इतकी लोकप्रिय होतात की, त्यांचे खरे नावच लोक विसरतात. नानांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट घडली की ते व्हायोलिनवादक म्हणून दीर्घकाळ प्रसिद्ध पावले असले तरी नाटक, नभोवाणी येथे त्यांनी अभिनेता म्हणूनही दीर्घकाळ काम केले. त्यांनी कविता केल्या; गीतलेखन केले. (त्यांच्या गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या.) नभोवाणीवर श्रुतिका लिहिल्या; विनोदी लेखन केले. त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातही विनोदाचा प्रसन्न शिडकावा असे. विनोदी कविताही लिहिल्या. मात्र त्यांची सर्वसामान्य लोकांना ओळख राहिली ती व्हायोलिनवादक म्हणूनच.
त्यांचा जन्म पुण्यातला. नानांचे शालेय शिक्षण पुण्याला नू.म.वि.मध्ये झाले. शाळेत असतानाच

 

चित्रपट बघायचा नाद लागला. त्या वेळेस ते मूकपट असत. शाळेत असतानाच ते बाजाची पेटी वाजवावयास शिकले होते. त्या वेळेस मूकपटांना प्रसंगानुरूप पाश्र्वसंगीत पडद्याच्या मागे बसून वाजवले जात असे. त्या वेळेस या मूकपटांचे रोज दोन खेळ असत. एका खेळाला पाश्र्वसंगीत वाजवून त्या बदल्यात ते दुसरा खेळ बघत असत. चित्रपटसृष्टीतील खरं तर हेच त्यांचे पहिले पाऊल म्हणता येईल. त्याच वेळेस पुण्यात एक सुखलाल परदेशी म्हणून अवलिया होता तो बऱ्याच वेळा रात्री रस्त्यावर व्हायोलिन वाजवत फिरत असे. त्याचे हे वादन ऐकून नाना मंत्रमुग्ध होत. त्याच्याकडून व्हायोलिन वादनाची प्रेरणा घेऊन नाना व्हायोलिन वाजवू लागले. लवकरच ते त्यात पारंगत झाले.
त्याच काळात भालजी पेंढारकर ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘शामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी कोल्हापूरहून पुण्याला आले होते. या चित्रपटाचे सं. दि. बापूराव केतकर यांच्याशी नानांचा चांगला परिचय असल्यामुळे वादकांत नानांचाही समावेश झाला. यानंतर भालजी कोल्हापूरला परत गेले. तेथे चित्रपटाची जुळवाजुळव करत असताना व्हायोलिन वादक म्हणून त्यांनी नानांना बोलावले. नानांनी हे निमंत्रण स्वीकारले. १०/०१/१९३३ रोजी नाना कोल्हापुरात दाखल झाले. हे त्यांचे चित्रपटसृष्टीत झालेले पदार्पण.
तेथून नाना ‘कोल्हापूर सिनेटोन’ आणि नंतर ‘हंस पिक्चर्स’मध्ये गेले. ‘हंस’मध्ये त्यांचे चांगले बस्तानही बसले होते. मात्र एकदा मालक मंडळींबरोबर खटका उडाला. ध्यानीमनी नसताना त्याचे पर्यावसान नानांनी ‘हंस पिक्चर्स’ सोडण्यात झाले. तोपर्यंत नानांनी ‘शामसुंदर’, ‘आकाशवाणी’, ‘कालिया मर्दन’, ‘छाया’, ‘धर्मवीर’, ‘प्रेमवीर’, ‘ज्वाला’ अशा अनेक चित्रपटांसाठी बापूराव केतकर, गुंडोपंत वालावलकर, दादा चान्देकर (यांची भालजींकडे नानांनीच शिफारस केली होती.) अशा चांगल्या संगीत दिग्दर्शकांकडे भरपूर काम केले. नानांनी ‘हंस’ सोडली त्या वेळेस कोल्हापूरला एच.एम.व्ही. कंपनीचे मालक रमाकांत रुपजी आपल्या ताफ्यासह आलेले होते. नानांचा आणि त्यांचा परिचय असल्यामुळे रुपजींनी एच.एम.व्ही.त येण्याचा देकार नानांना दिला; त्याचा स्वीकार करून नानांनी कोल्हापूरला रामराम ठोकला. नाना मुंबईला आले आणि कं.त रुजू झाले. ध्वनिमुद्रिकांच्या या मोठय़ा कंपनीत अनिल विश्वास, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, स्नेहल भाटकर असे तरुण आणि उदयोन्मुख संगीतकार होते. मात्र तोपर्यंत संगीत, वादन यातील ज्या गोष्टी नानांना अजिबात ठाऊक नव्हत्या त्या येथे भरपूर प्रमाणात शिकावयास मिळाल्या. ‘रवीन्द्र संगीत’ भरपूर ऐकावयास मिळाले. या सर्व गोष्टींचा चपखल आणि समर्पक उपयोग नानांनी नंतर आकाशवाणीवर संगीत दिग्दर्शन करताना केला. एच.एम.व्ही.मध्ये नाना रुळले असतानाच मा. विनायकांनी मुंबईत चित्र-निर्मिती सुरू केली; आणि नाना रुपजींच्या सांगण्याप्रमाणे परत एकदा मा. विनायकांकडे गेले. मात्र चित्रपट अर्धवट असतानाच स्वातंत्र्यप्रश्नप्तीनंतर केवळ चार दिवसांनीच (१९.०८.१९४७) मा. विनायकांचे निधन झाले. नंतर नानांच्या आयुष्यात असे एक वळण आले; आणि नाना आकाशवाणीमध्ये दाखल झाले. १९४८ ते १९५२ या चार वर्षाच्या छोटय़ा कारकीर्दीत नानांनी तेथे जी विविध कामे केली ती बघून मन थक्क होते! तेथे ते ग्रामीण विभागासाठी प्रश्नमुख्याने काम करत. त्या कामांत श्रुतिका लिहिणे, कवी म्हणून गीते लिहिणे, त्यांना चाली लावणे, त्या गायकांकडून बसवून गाऊन घेणे. या गोष्टी तर होत्याच; पण आकाशवाणीसाठी नवेनवे कलाकार शोधून त्यांना करारपत्रे पाठवून आकाशवाणीवर आणणे हेही काम असे. या करारपत्रांवर आकाशवाणीतर्फे नानांचीच सही असे. नंतर प्रथितयश कलाकार म्हणून गाजलेल्यांपैकी अनेकजण त्यावेळेस नवोदित होते. त्यांना सुरुवातीची संधी नानांनीच दिली आहे. नंतर नामवंत झालेल्यांत मा. दत्ताराम आणि दीनानाथ टाकळकर हेही होते. आवश्यकता भासल्यास नाना बदली कलाकार म्हणून अनेकवेळा उभे राहिले आहेत. मात्र यात कळस झाला तो एकदा कार्यक्रमात गायची लावणीच तयार नसण्याचा. मग काय, त्या चालीवर नानांनी ‘आला मुंबईच्या हवेने थकवा, मला माहेरी मुलखाला घालवा’ ही लावणी तिथल्या तिथेच लिहून दिली!
ही लावणी इतकी लोकप्रिय झाली की, अनेकजण तिला स्वत:ची चाल लावून ती विविध कार्यक्रमांत गात असत. अलीकडेच आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या गायक-सं. दि. कमलाकर भागवत यांनी तिला लावलेली चाल नानांना खूपच आवडत असे. ‘आकाशवाणी’ चित्रपटाच्या गीतांना व्हायोलिनची साथ करताना नानांना कुठे ठाऊक होते की, सुमारे १२-१५ वर्षानंतर खऱ्या आकाशवाणीशी आपला घनिष्ठ संबंध येणार आहे!
नानांच्या आयुष्याचे एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे आयुष्य एकमार्गी, एकसुरी नव्हते. त्यात वेळोवेळी वळणे आली. नानांनी ती वळणे स्वीकारली आणि त्यात ते यशस्वीही झाले. असेच एक महत्त्वाचे वळण नानांच्या आयुष्यात आले; ते म्हणजे रंगभूमी. जरी १९५० नंतर नाटय़सृष्टीला अवकळा प्रश्नप्त झाली होती, तरी प्रथितयश गायक-गायिकांना घेऊन ठेकेदार संगीत नाटकांचे प्रयोग लावत असत. त्या प्रयोगांतून ठेकेदारांना चांगले उत्पन्न मिळत असे. एच. एम. व्ही.तून बाहेर पडल्यावर नाना अशा प्रयोगांना व्हायोलिनची साथ करावयास जात असत. तोपर्यंत नानांनी ‘साष्टांग नमस्कार’ आणि ‘अंमलदार’ नाटकांत हौसेखातर भूमिकाही केल्या होत्या. त्यामुळे ‘तो मी नव्हेच!’ हे नाटक ‘अत्रे थिएटर्स’ करू लागल्यावर त्यात एखादी भूमिका मिळावी म्हणून नानांनी प्रयत्न केले. प्रथम अगदी नगण्य भूमिका मिळाली; पण यथावकाश नाटय़मय रीतीने सुधीर दाते ही महत्त्वपूर्ण भूमिका नानांकडे चालत आली आणि विश्वास बसणार नाही; तब्बल पंधराशेहून अधिक सलग प्रयोगांत ही भूमिका त्यांनी साकारली. या दोन तपांच्या काळात महाराष्ट्रात मोठय़ा शहरांपासून छोटय़ा छोटय़ा गावांपर्यंत अनेक ठिकाणी प्रयोग झाले. संस्मरणीय अनेक प्रसंग घडले, अपघात घडले, अचानक संकटेही आली. पण दरवेळेस सर्वजण सुखरूप सुटले. नानांनी स्वत:च्या विनोदी स्वभावाला अनुसरून अनेक उत्स्फूर्त विनोद केले. ‘नीचे देखा करो’, चन्नाक्का लखोबाचे नाव विनोदी उखाण्यात घेते, पुतणीने हौसेपायी केलेला नाटय़दौरा आणि फिटलेली हौस, अशा विनोदी प्रसंगांची तर गणती करणेच कठीण आहे. अत्र्यांच्याच ‘डॉक्टर’ (मूळ नाव ‘डॉ. लागू’) आणि ‘लग्नाची बेडी’ या नाटकांच्या काही प्रयोगांतही नानांनी भूमिका केल्या. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या हस्ते नानांचा ‘सुधीर दाते’ ही भूमिका हजारापेक्षा जास्त प्रयोगांतून केल्याबद्दल सत्कार झाला. त्याची त्यांना धन्यता वाटे. याच काळात (साधारण १९४५) भावगीत गायक गजानन वाटवे यांच्या भावगीतांनी उभ्या-आडव्या महाराष्ट्राला (त्यावेळचा मुंबई इलाखा) वेड लावले होते. गणेशोत्सव, शारदोत्सव या दिवसांत तर त्यांचे सर्वच दिवस ‘बुक्ड’ असायचे; पण एरवीही शनि., रवि. पुणे-मुंबई वा तत्सम शहरांतून त्यांचे कार्यक्रम जोरदार व्हायचे. या सर्व कार्यक्रमांना नाना आणि त्यांचे धाकटे बंधू बाळ साठे यांची व्हायोलिनची साथ असे. या दोघांची साथ हे नंतर कार्यक्रमाचे आकर्षण झाले. नानांचे बंधू बाळ हे लक्ष्मणाप्रमाणे नानांबरोबर जवळजवळ सात दशके वावरले. बाळ साठे कार्यक्रमांच्या मध्यांतरांत व्हायोलिनवर विविध आवाज काढून दाखवत. ते आवाज इतके लोकप्रिय झाले की, बाळ केवळ त्या आवाजांचाच एक स्वतंत्र कार्यक्रम करू लागले आणि त्याही कार्यक्रमाला तुफान लोकप्रियता लाभली. (‘नका मारू खडा’ या गाण्याला व्हायोलिनवर टिचकी मारून ते खडा मारल्याचा आभास निर्माण करत!) आज वयाच्या ९५ व्या वर्षीही बाळ अजून व्हायोलिनवर करामती करून दाखवतात.
नाना कायम आणि भरपूर मोठय़ा माणसांना भेटत राहिले. लहानपणी ते राहात असत त्या वाडय़ात आ. अत्रे, बिस्किटवाले साठे राहात असत. नंतर भालजी, बाबुराव, मा. विनायक, दादा चांदेकर, चित्रपट क्षेत्रांतील अन्य मोठय़ा व्यक्ती ‘हंस’मध्ये असताना लता आणि मंगेशकर भावंडे तेथेच होती. कोल्हापूरला शेजारी लेखक प्रश्न. ना. सी. फडके राहावयाचे. नंतर एच. एम. व्ही. रेडिओवरची नामवंत माणसे, नाटय़ क्षेत्रांतील महनीय व्यक्ती, पु. ल. देशपांडे, पी. सावळाराम, दशरथ पुजारी, प्रमोदिनी देसाई (या दोघांमुळे नानांची दोन गीते ध्वनिमुद्रित झाली). मात्र या सर्वात नानांना कायम अभिमान आणि आदर वाटावा असा एक महामानव भेटला. त्याने नानांकडून व्हायोलिनचे धडेही घेतले. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांना व्हायोलिन शिकायची इच्छा झाली. मग ग्रंथपाल शां. शं. रेगे यांनी साठे बंधूंची या कामावर नियुक्ती केली. तो आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभव होता. तो नानांकडूनच ऐकण्यात मजा होती. नानांचे भोरच्या सान्यांच्या मुलीशी लग्न झाले. त्यांना मुले झाली. नाना आणि लीला यांनी हेवा वाटावा असा तब्बल ७० वर्षे संसार केला. त्यांनी परस्परांना आणि अन्य कुटुंबीयांना व्यवस्थित सांभाळले. त्यांचा मुलगा सुराज आज मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीचा अ‍ॅकॉर्डियन वादक आहे. दुसरा मुलगा शशिकांत याला व्हायोलिनमध्ये चांगली गती आहे. त्याला साहित्याची चांगली जाण आहे. सर्व मुली आपापल्या संसारात दंग आहेत. जुलै २००६ मध्ये वयाच्या ९६ व्या वर्षी नानांचे निधन झाले.
prakashchande2004@yahoo.com