Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

रक्तचाचणीचा चुकीचा अहवाल; इस्पितळाकडून भरपाई
प्रतिनिधी

एका रुग्णाच्या रक्ताचा चुकीचा ‘सीकेएमबी’ चाचणी अहवाल देऊन या रुग्णाला नाहक मनस्ताप

 

देणे व आठवडाभर रुग्णालयात दाखल व्हायला लागणे याची भरपाई म्हणून गिरगावातील सर हरकिशनदास नरोत्तमदास इस्पितळाने या रुग्णास २० हजार रुपये द्यावेत, असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
श्रीमती अश्रतुल अमीनुद्दीन शेख यांनी केलेली तक्रार मंजूर करून आयोगाचे न्यायिक सदस्य पी. एन. कशाळकर व सदस्या श्रीमती एस. एन. लाळे यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. अर्जदार अश्रतुल यांचे पती वकील आहेत. पत्नीच्या इस्पितळात दाखल होण्याने त्यांची बुडालेली कमाई व संपूर्ण कुटुंबाला निष्कारण झालेला मन:स्ताप याबद्दल ५.२१ लाख रुपये भरपाई मिळावी , अशी अर्जदारांची मागणी होती. मात्र आयोगाने फक्त २०,२१६ रुपये मंजूर केले. यापैकी ३५० रुपये हरकिशनदास इस्पितळाने घेतलेल्या चाचणी शुल्काचा परतावा, १२,८९१ रुपये इस्पितळातील वास्तव्याचा व औषधोपचाराचा खर्च आणि पाच हजार रुपये मन:स्तापाबद्ल यांचा समावेश आहे.
जानेवारी २००२ मध्ये छातीत दुखू लागल्याने श्रीमती अश्रतुल यांना जे. जे. इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांची ‘सीकेएमबी’ रक्तचाचणी करून घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी हरकिशनदास इस्पितळात नेऊन देण्यात आले. निरोगी व्यक्तीच्या रक्तात ‘सीकेएमबी’चे प्रमाण ० ते २२ एवढे असते. अश्रतुल यांच्या चाचणीतून त्यांच्या रक्तात हे प्रमाण २,४९० एवढे वाढले असल्याचा अहवाल हरकिशनदास इस्पितळाने दिला. हा अहवाल पाहून जे. जे.
इस्पितळातील डॉक्टरही धास्तावले व त्यांनी अश्रतुल यांना तातडीने ‘आयसीयू’मध्ये दाखल करण्यास सांगितले. मात्र जे. जे.च्या ‘आयसीयू’मध्ये त्यावेळी जागा नसल्याने त्यांना भाटिया इस्पितळात दाखल केले गेले. भाटिया इस्पितळाने स्वत: अश्रतुल यांच्या रक्ताची ‘सीकेएमबी’ चाचणी केली व त्याचे ‘रीिडग’ सर्वसामान्य प्रमाणाहूनही कमी असल्याचे आढळून आले. आमचा पॅथॉलॉजी विभाग सुसज्ज आहे. उच्चविद्याविभूषित डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याचे काम चालते. अर्जदार महिलेच्या रक्ताची चाचणी प्रमाणित पद्धतीने संगणकाद्वारे केली गेली होती, असा हरकिशनदास इस्पितळाने बचाव केला. परंतु हरकिशनदास इस्पितळाने केलेल्या चाचणीनंतर जेमतेम तीन तासात भाटिया इस्पितळाने स्वत: केलेल्या ‘सीकेएमबी’चाचणीचे निष्कर्ष ‘नॉर्मल’ आले यावरूनच हरकिशनदास इस्पितळाने निष्काळजीपणाने चाचणी करून अहवाल दिला होता हे स्पष्ट होते, असे आयोगाने नमूद केले.