Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बँकांचे बोगस संकेतस्थळ बनवून खातेदारांना लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक
प्रतिनिधी

देशी-विदेशी बँकांचे बोगस संकेतस्थळ बनवून खातेदारांना लुबाडणाऱ्या दोन नायजेरियन

 

नागरिकांसह चारजणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नुकतेच गजाआड केले. या टोळीची सूत्रे नायजेरियातून चालवली जात असून भारतात ही टोळी मोठय़ा प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गणेश अग्रवाल, इरफान शेख, ख्रिस फिडिलिस्ट ओकेचुकुवू आणि केविन ख्रिचन अशी अटक केलेल्या चौघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी विविध देशांतील चलन आणि बँकांची कागदपत्रे जप्त केली. आयसीआयसीआय बँकेतील अंतर्गत चौकशीदरम्यान, मालाड (प.) आणि गोरेगाव (प.) येथील बँकेच्या शाखांमधून २९ जुलै रोजी एकच दिवसात इंटरनेटद्वारे दोन वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा केले गेले आणि लगेचच ते काढूनही घेण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत अधिक चौकशी केल्यावर इंटरनेट बँकिंगद्वारे खातेदारांना मोठय़ा प्रमाणात लुटल्याचे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खात्यांमध्ये हैदराबाद येथील एका खातेदाराच्या खात्यांतून पैसे वर्ग करण्यात आले होते. त्या खातेदाराने तशी तक्रारही तेथील बँक व्यवस्थापनाकडे केली होती. दरम्यान, हैदराबादस्थित बँकेच्या कालसेंटरवर एक निनावी दूरध्वनी येऊन दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली की, बँकेच्या वेबसाईटचे कोणीतरी हुबेहुब संकेतस्थळ तयार केले असून एक टोळी इंटरनेट बँकिंगद्वारे लूट करते.
टोळीच्या प्रक्रियेविषयी पोलिसांना माहिती देताना एका निनावी व्यक्तीने सांगितले की, ही टोळी एकाचवेळी १५ हजार खातेदारांना बँकेच्या वेबसाईटवर (बोगस) जाऊन आपल्या खात्यांसंबंधी माहिती देण्यास सांगते. तसेच ही माहिती नाही दिली तर त्यांच्या खात्यातील पैसे बुडतील, असाही इशारा देते. या इशाऱ्यामुळे जेवढे खातेदार वेबसाईटवर जाऊन खातेसंबंधी माहिती देतात त्याच्याआधारे त्यांच्या खात्याचा ‘पासवर्ड’ काढून ही टोळी त्यांच्या खात्यातून रक्कम काढते.
या निनावी व्यक्तीने टोळीचे पर्दाफाश करण्यासोबत त्यातील आरोपींची वर्णने आणि मुंबईतील त्यांच्या ठावठिकाणांचीही माहिती दिली. त्यानुसार सायबर सेलने कार्टर रोड आणि चेंबूर येथून आरोपींना अटक केली.
टोळी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असल्याचे पुढे आल्यावर पोलीस प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे.