Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

‘एटीकेटीबाबत सरकार ठाम’
मंगळवारी न्यायालयात म्हणे मांडणार- विखे
श्रीरामपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

दहावी व बारावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीची सवलत देण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असल्याचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश उठवावा म्हणून मंगळवारी म्हणणे मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विखे म्हणाले की, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सुटला असून, अद्यापि दीड लाख जागा रिक्त आहेत. एटीकेटीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सव्वा लाख आहे. त्यामुळे प्रवेशाचा प्रश्न एटीकेटीमुळे गंभीर बनणार नाही.

नौकानयन अधिकृत करण्याचा प्रस्ताव
नगर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

पिंपळगाव माळवी तलावातील अनधिकृत नौकानयन थोडय़ाच दिवसांत अधिकृत होईल. ते कायदेशीर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत (दि. २१) प्रशासकीय टिप्पणीसह ठेवण्यात आला आहे. सुमारे सहा महिन्यांपासून अधिक काळ बेकायदेशीर सुरू असलेले हे नौकानयन अलीकडेच राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उबेद शेख व शहराध्यक्ष संजय झिंजे यांनी आयुक्तांच्या दालनात आंदोलन करून बंद पाडले. मनपात राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी आंदोलन केले हे विशेष! या आंदोलनानंतर फक्त दोन ते तीन आठवडय़ांतच प्रशासनाने हा विषय अधिकृतपणे सर्वसाधारण सभेसमोर आणला आहे.

कुकडीत उपयुक्त पाणीसाठी केवळ साडेअकरा टीएमसी!
पाऊस लांबल्याने शेतकरी हतबल
श्रीगोंदे, १४ ऑगस्ट/वार्ताहर

दरवर्षी शेतीतून कोटय़वधींची कमाई करणारा शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात भीषण दुष्काळी परिस्थिती असून, तालुक्यात पावसाने पाठ फिरविली असतानाच कुकडी व घोडच्या सहा धरणांत ३६ टीएमसीपैकी केवळ ११.५ टीएमसीच उपयुक्त पाणीसाठा आहे. पाच वर्षांतील १५ ऑगस्टपर्यंतचा हा सर्वात कमी पाणीसाठा आहे.

उमेदवार बदलाचे वारे;शिवसेनेतही चलबिचल
नगर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार बदलाचा विचार करू शकते तर शिवसेना का नाही, या मुद्दय़ावरून शिवसेनेच्या नगर शहर विधानसभा मतदारसंघात चलबिचल सुरू झाली असल्याचे समजते. सेनेत परतलेल्या अंबादास पंधाडे यांच्यासह अन्य काही निष्ठावंतांनी गंभीरपणे प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती मिळाली. गेली सलग २० वर्षे या मतदारसंघात सेनेचे वर्चस्व असून, सुनील राठोड हेच विजयी होत आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणूनही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर हेच होते.

लिपिक, टंकलेखक, तलाठी भरतीची लेखी परीक्षा स्थगित
नगर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ मुळे दि. १९ ला होणारी जिल्हाधिकारी आस्थापनेतील लिपिक, टंकलेखक व तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठीची लेखी परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी दिली. लिपिक व तलाठी पदांसाठी ४० हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. ‘स्वाइन फ्लू’ च्या पाश्र्वभूमीवर इतक्या मोठय़ा संख्येने उमेदवार एकत्र आल्यास हा आजार जिल्ह्य़ात पसरण्याचा धोका असल्याने लेखी परीक्षा स्थगित करण्यात आली. परीक्षेची पुढील तारीख वृत्तपत्रांत व जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस प्रशासनानेही भरती प्रक्रिया स्थगित केली आहे. ‘स्वाइन फ्लू’ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्या नगरचा भुईकोट किल्ला व रणगाडा संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

कोठारी प्रतिष्ठानतर्फे पाच हजार मास्कचे वाटप
जामखेड, १४ ऑगस्ट / वार्ताहर

येथील कोठारी प्रतिष्ठानतर्फे शाळकरी मुलांसह रिक्षाचालक, हमाल, वाहनचालक तसेच नागरिकांना ५ हजार मास्कचे वाटप करण्यात आले. जामखेडसह शहरात अद्याप तरी स्वाइन फ्यूचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून कोठारी प्रतिष्ठानतर्फे पाच हजार मास्क वाटण्यात आले. त्यामध्ये पाणपोई, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना वह्य़ावाटप आदी उपक्रम प्रतिष्ठान राबवते, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी सांगितले. या वेळी कोठारी म्हणाले की, स्वाइन फ्लू नियंत्रणात आणताना प्रशासनही कमी पडत आहे. त्यामुळेच मास्कचे वाटप करून स्वाइन फ्लूला प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. बी. झगडे म्हणाले की, सर्दी, खोकला व ताप आला म्हणजे स्वाइन फ्लू झाला असे समजून घाबरून जाऊ नये, तर ग्रामीण रुग्णालयात येऊन तपासणी करावी.

जगदंबा कारखाना प्रश्नावर कृती समिती आवाज उठवणार
राशीन, १४ ऑगस्ट/वार्ताहर

जगदंबा साखर कारखान्याच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी पुन्हा एकदा जगदंबा बचाव कृती समितीच्या वतीने लढा उभारणार असल्याचे कृती समितीचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी जाहीर केले. जगदंबा कारखाना कर्जत तालुक्याची कामधेनू आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून कारखान्याचे समभाग (शेअर्स) घेतले. तालुक्यातील राजकीय मंडळींनी कारखान्याचा स्वत:च्या स्वार्थासाठी उपयोग केला. आता ही संस्था अडचणीत आहे; परंतु सर्वच पुढाऱ्यांना आगामी विधानसभेत आमदारकीचे डोहाळे लागले आहेत, असा टोला त्यांनी प्रसिद्धिपत्रकात लगावला आहे. ‘नॅचरल शुगर’ने जगदंबाचा भाडेपट्टा अध्र्यावरच सोडला. सहकारमंत्र्यांचा आदेश जुमानायला ते तयार नाहीत. शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. करार एकतर्फी संपुष्टात आणला तरीही सरकार त्यांच्याबाबत बोटचेपे धोरण घेत आहे. शेतकरी व कामगारांच्या हितासाठी सरकारनेच हा कारखाना चालवण्यास घ्यावा. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व सहकारमंत्र्यांना कृती समिती साकडे घालणार आहे. साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता मिळवून द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक केल्यावरून संबंधितांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.

राहुरीच्या कृषी विद्यापीठास चार तारांकनाचा दर्जा
राहुरी, १३ ऑगस्ट/वार्ताहर

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेस कृषी मंत्रालय व राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने पाचपैकी चार तारांकनाचा दर्जा बहाल केला आहे. यासाठीच्या समितीमध्ये माजी कुलगुरु डॉ. जगमोहनसिंग, बडगे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. एस. जी. सोमकुवर, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे पी. के. सिंग, सहायक संचालक डॉ. धर्मसिंग यांचा समावेश होता. या रोपवाटिकेअंतर्गत राहुरी कृषी विद्यापीठ फलोत्पादनांना अनुवांशिक स्तरावर शुद्ध, जातिवंत, विषाणूमुक्त रोपे, कलमे मोठय़ा प्रमाणावर निर्माण करुन पुरवठा करते. कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील रोपवाटिकेत गेल्या तीन वर्षांत ४ लाख ५० हजार रोपांची निर्मिती करुन शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आला. यात डाळिंब, आंबा, चिक्कू, पेरु, अंजीर या रोपांचा प्रामुख्याने समावेश होता. संशोधन संचालक डॉ. सुभाष मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मारुती मांजरे, डॉ. भीमराव गोंधळी, डॉ. सुधाकर वराडे, प्रा. एच. के. शिरसाठ यांचा या कामी मोलाचा वाटा आहे.

नाशिकच्या चित्रपट महोत्सवात नगरच्या लघुपटांना ५ पुरस्कार
नगर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्य सरकार व नाशिक फिल्म सोसायटी आयोजित दुसऱ्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात न्यू आर्ट्स महाविद्यालयातील संज्ञापन विभागाच्या लघुपटांना विक्रमी पाच पुरस्कार मिळाले. नागराज मंजुळे यांना ‘पिस्तुल्या’ लघुपटासाठी सवरेत्कृष्ट युवा दिग्दर्शक व भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट बालकलाकार असे दोन पुरस्कार मिळाले. भाऊराव कऱ्हाडे यांना ‘वंचित’ लघुपटासाठी उत्तेजनार्थ युवा दिग्दर्शक व उत्कृष्ट बालकलाकार व सुधीर कुलकर्णी यांना ‘नान’ लघुपटासाठी युवा दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. पोलंड, इग्लंड, फ्रान्स, इराण आदी देशांमधून महोत्सवासाठी प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून २७ लघुपटांची निवड करण्यात आली. त्यात हे लघुपट होते. न्यू आर्ट्सच्या या विभागातील या पहिल्याच तुकडीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटांना आतापर्यंत एकूण १७ पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेचे सचिव जी. डी. खानदेसे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे व विभागप्रमुख मिथुनचंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

‘एएमटी’ तातडीने सुरू न झाल्यास मंत्री, सचिवांविरुद्ध जनहित याचिका’
नगर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

शहरात तातडीने एएमटी सुरू न झाल्यास नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ, या विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे अशा तिघांविरुद्ध न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करण्याचा इशारा लोककार्य आणि लोकक्रांती दलाचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी दिला आहे. संबंधितांना त्यांनी तशी नोटीसही पाठविली आहे. महापालिकेने खासगीकरणातून काही काळ चालवलेली शहर बस वाहतूक एएमटी पुढे बंद पडली. ढगे यांनी वरील तिघांनाच त्यासाठी जबाबदार धरले आहे. या व्यवस्थेतील अडचणी दूर करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची होती. मात्र त्यासाठी वरील तिघांचेही सहकार्य आवश्यक होते. ते न मिळाल्याने विविध कारणांनी ही सेवा बंद पडली. ती येत्या दि. २० पर्यंत सुरू करावी, अन्यथा वरील तिघांविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचा इशारा ढगे यांनी दिला आहे. महापालिकेचे आयुक्त महापौर यांनाही ही नोटीशीची प्रत पाठविण्यात आली आहे.