Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गावर एसएमएसचा उतारा!
संदीप देशपांडे, नागपूर, १४ ऑगस्ट

‘डुकरासारखे लोळा आणि घाण लोकांच्या घरी जाऊन झटका’, असे हसू पेरणारे एसएमएस आजच्या स्वाइन फ्लूच्या दहशतीच्या वातावरणावर उतारा ठरले आहेत.
स्वाइन फ्लूची व्याप्ती खरोखर मोठी आहेच परंतु, या आजारासंदर्भात पसरलेले समज-गैरसमज त्यापेक्षाही व्यापक आहेत. एकतर साधा सर्दी-ताप-खोकला आणि या आजाराचे लक्षण जुळत असल्याने नेमका स्वाइन फ्लूचा रुग्ण हेरणे कठीण होऊन बसले आहे. घरातला प्रसंग असो की, सार्वजनिक स्थळावरचा, कुणाला साधा ठसका लागला तरी लोक परस्परांकडे संशयाने बघू लागले आहेत.

कडेकोट बंदोबस्त
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

दहशतवाद्यांपासून सदोदित असलेला धोका लक्षात घेता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागपूर शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. महालमध्ये काही वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी पाईप बॉम्ब पेरले होते. संघ मुख्यालयावर लाल दिव्याच्या अॅम्बेसेडरमधून हल्ला करण्यास जात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा डाव सजग पोलिसांनी हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले होते. या घटनांमुळे नागपूर शहराला दहशतवाद्यांपासून सदोदित धोका असल्याचे उघड झाले. नक्षलवाद्यांपासूनही शहराला धोका आहेच. स्वातंत्र्य दिनी दहशतवादी किंवा नक्षलवादी देशात कुठेही हल्ला करू शकतात, असा इशारा केंद्रीय गुप्तचर खात्याने दिला असून पोलीस कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीत.

ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
राज्याच्या सांस्कृतिक सचिवांना नोटीस

नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयासह (अजब बंगला) ऐतिहासिक महत्त्वाच्या इतर वास्तूंकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करीत आहे, तसेच या विभागात आर्थिक गैरव्यवहार होत आहेत, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर आपली बाजू मांडावी, अशी दाखलपूर्व नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या सांस्कृतिक सचिवांसह इतर प्रतिवादींच्या नावे काढली आहे.

फाळणीच्या साक्षीदारांच्या डोळ्यात आजही तरळते पाणी!
चंद्रशेखर बोबडे, नागपूर, १४ ऑगस्ट

एकसंघ भारत पाहणाऱ्या आणि भारताचा स्वातंत्रदिन पाकमध्ये साजरा करणाऱ्या भारतीयांच्या मनात आजही फाळणीचे दु:ख आहे. देश एकसंघ असताना पाकिस्तानच्या सिंध प्रश्नतांचे रहिवासी असलेले पण, फाळणीमुळे जन्मभूमीला मुकलेले काही नागरिक नागपुरात आहेत. आजही फाळणीचा विषय निघताच ते डोळ्यात पाणी आणतात. ‘क्या हुवा, कैसा हुवा, क्यूं हुवा पता नही, लेकीन जो भी हुवा बुरा हुवा’ अशी प्रतिक्रिया ते देतात.

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसाठी बसेसची व्यवस्था
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

विदर्भात सर्वत्र दुष्काळ आणि स्वाइन फ्लूचे सावट असले तरी, ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. नागपूर जिल्ह्य़ातील मुख्य सोहोळा विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात उद्या, शनिवारी सकाळी होणार आहे. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण होईल.

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राकडे ११ हजार कोटींची मागणी -थोरात
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राकडून ११ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यात रोजगार हमी योजनेची कामे आणि पाणी पुरवठा व चारा टंचाईची व्यवस्था करण्यात येईल, असे राज्याचे कृषी मंत्री व नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या आठवडय़ात पाऊस आल्यास पिके वाचू शकतात, मात्र, सुमारे ३० टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

नानक रामटेके यांच्या ‘पुकारा’ चे प्रकाशन
नागपूर, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

अभिनव प्रयत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात सेवानिवृत्त महापालिका आयुक्त नानक रामटेके यांच्या ‘पुकारा’ लेख संग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे होते. गृहराज्य मंत्री डॉ. नितीन राऊत, वि.स. जोग, ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम आणि प्रकाशक चंद्रकांत लाखे व्यासपीठावर उपस्थित होते.

रेल्वे वाहतूक विस्कळीतच; दोन गाडय़ा रद्द
नागपूर, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी
आंध्रप्रदेशातील रामगुंडम रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या पाच वाघिणी घसरल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून दक्षिणेकडची विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक दुसऱ्याही दिवशी सुरळीत होऊ शकली नाही. आज दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर काही गाडय़ा उशिरा धावत आहेत.
आंध्रतील अपघाताचा फटका दक्षिणेकडे जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या गाडय़ांना बसला आहे. गुरुवारी काही गाडय़ांचे मार्ग बदलल्याने त्या आज उशिरा धावत होत्या, आज विशाखापट्टन्नम-हजरत निजामउद्दीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. ही गाडी उद्या, शनिवारी दुपारी ३ वाजता नागपूर येथे येणार होती. चेन्नई-नवीदिल्ली ही राजधानी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. ती सकाळी ८ वाजता नागपूर येथे येणार होती. सुधारित वेळापत्रकानुसार ती उद्या सकाळी ७.३० वाजता येणार आहे. हैदराबाद-निजामउद्दीन एक्स्प्रेस सात, तर सिंगदराबाद गोरखपूर एक्स्प्रेस ४ तास उशिरा धावत आहे. तामीळनाडू- नवीदिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेस तिच्या नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा धावत आहे.

वीज केंद्रात तरुणाचा मृत्यू
चंद्रपूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

महाऔष्णिक वीज केंद्रात शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांमधून कामगारांची निवड सुरू असताना ‘ट्रेड टेस्ट’दरम्यान सुनील भाऊजी भोयर (३२) याचा मृत्यू झाला. वीज अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या निवडीसाठी ही चाचणी आवश्यक केली आहे. ही चाचणी देताना उमेदवारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सुनीलला रक्तदाबाचा त्रास असतानाही तो ही चाचणी देण्यासाठी सहभागी झाला. अशातच त्याची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला.

आर्या बुराडेचा गुजरातमध्ये मृत्यू
भंडारा, १४ ऑगस्ट/ वार्ताहर

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माजी व्यवस्थापक संपतराव बुराडे यांची नात आर्या विनोद बुराडे हिचा वडोदरा (गुजरात) येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. आर्याचे वडील डॉ. विनोद बुराडे वडोदरा येथे एक खाजगी औषध कंपनीत नोकरीला आहेत.

तेली समाज संघातर्फे रविवारी शिष्यवृत्तीचे वाटप व सत्कार
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी
तेली समाज संघातर्फे रविवारी, १६ ऑगस्टला गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. शिवाय काही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात येईल. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष मारोतराव कुंभलकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून अमर सेवा मंडळाच्या अध्यक्ष सुहासिनी वंजारी, कांदे, बटाटे मार्केटचे अध्यक्ष ओंकार गुलवाडे आणि तैलिक शाहू समाजाचे कार्याध्यक्ष उमेश शाहू उपस्थित राहणार आहेत. सत्कारमूर्तीमध्ये खासदार विलास मुत्तेमवार, माजी स्थायी समिती अध्यक्ष कृष्णा खोपडे, आमदार दीनानाथ पडोळे, नगरसेवक यशवंत कुंभलकर, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त अनंत घारड, किशोर कन्हेरे आणि सुधाकर कोहळे यांचा समावेश आहे.

‘टय़ून्स ऑफ इंडिया’तर्फे मंगळवारी ‘रागरचना’
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

पारंपरिक भारतीय संगीत, नृत्य व कला याबद्दल सर्वसाधारण समाजामध्ये आवड व गोडी निर्माण व्हावी आणि त्या क्षेत्रातील मान्यवरांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘टय़ून्स ऑफ इंडिया’ (पूर्वाश्रमीची निषाद) या संस्थेच्या वतीने मंगळवारी, १८ ऑगस्टला ‘रागरचना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात रात्री ८ वाजता आयोजित हा कार्यक्रम संगीत क्षेत्रातील अभिनव व नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ‘रागरचना’मध्ये अभिजात शास्त्रीय संगीत ते सर्वमान्य जनसंगीत असा सांगितीक प्रवास सादर केला आहे. कार्यक्रम पूर्णपणे नि:शुल्क असून निमंत्रण पत्रिका कार्यक्रमस्थळी मिळणार आहेत. या कार्यक्रमात मुंबई, पुणे, रत्नागिरी, वडोदरा व महाराष्ट्रातील इतर भागातील कलाकार सहभागी होत असून काही स्थानिक कलाकारांचाही यात समावेश आहे. यात गिटार, सितार, बासरी, मोहनविणा वादन सादर करण्यात येईल, अशी माहिती ‘टय़ून्स ऑफ इंडिया’चे सतीश टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला भुषण जहागिरदार, सायली बर्वे उपस्थित होते.

‘टॅमी फ्लू’ त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्ल्यू’ आजारावरील प्रतिबंधात्मक उपचार होमिओपॅथीमध्ये उपलब्ध असून ‘टॅमी फ्लू’ हे औषध राज्य सरकारने त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. उमेश शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘स्वाईन फ्ल्यू’ ची चाचणी केवळ पुणे शहरात केली जाते आणि या चाचणीचा अहवाल येण्यासाठी सुमारे पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे नागपूर येथे चाचणी केंद्र उभारावे, अशी मागणीसुद्धा डॉ. शिंगणे यांनी केली.
भाजप वैद्यकीय आघाडीच्या वतीने या रोगाला प्रतिबंध करणारी औषधे शहरात दहा-बारा ठिकाणी वाटण्यात येणार असून याचा शुभारंभ १५ ऑगस्टला वाळके बाळकफ सेंटर, वर्धा रोड, लोकमत चौक येथे होईल, असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. अभय वाळके, डॉ. अरविंद हरणे, डॉ. आशिष हरणे, डॉ. शिल्पा पाझारे आदी उपस्थित होते.

भिडे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी बांधल्या वृक्षांना राख्या
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

भिडे गर्ल्स हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या हरितसेनेच्या विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्याबांधून रक्षाबंधन साजरा केला. यानिमित्ता परिमल इको क्लबच्या विद्यार्थिनींनी पानाफुलांपासून अतिशय आकर्षक राख्या तयार केल्या होत्या. शाळेच्या परिसरातील नेताजी मार्केट हिंदी प्रश्नथमिक शाळेच्या आवारातील वृक्षांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. याप्रसंगी हरितसेनेच्या डॉ. मंगला गावंडे यांनी प्रश्नस्ताविक केले. हरितसेनेच्या विद्यार्थिनी तायडे, रोंघे, नंदेश्वर यांनी वृक्षाचे संरक्षण, पर्यावरणातील वृक्षांचे महत्त्व सांगितले. भिडे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापक डॉ. पल्लवी देशपांडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना वृक्ष संगोपनाबद्दल शपथ दिली. याप्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापक सहस्त्रबुद्धे, पर्यवेक्षक पंडित, प्रश्नथमिक शाळेच्या मुख्याध्यापक कावळे आदी उपस्थित होते.

एमबीए, बीएड्साठी इग्नूची रविवारी प्रवेश चाचणी
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे एमबीए आणि बीएड्साठी प्रवेश चाचणी रविवारी, १६ ऑगस्टला घेण्यात येणार आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश चाचणी सकाळी १० ते १ यावेळेत, तर बीएड्ची दुपारी २ ते ४ या वेळेत होणार आहे. यासाठी हॉल तिकीट विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले असून ते मिळाले नसल्यास इग्नूच्या वेबसाईटवर (\६६६.्रॠल्ल४.ूं.ूे) उपलब्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास ते ०७१२- २०२२००० या क्रमांकावर संपर्क साधावा.

सावनेर, हिंगण्यासाठी उद्यापासून मोरभवनातून गाडय़ा सुटणार
नागपूर, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्य़ातील सावनेर, हिंगणा या गावांसाठी सुटणाऱ्या बसेस रविवारी, १६ ऑगस्टपासून मोरभवन बसस्थानकातून सुटणार आहे, पूर्वी या बसेस गणेशपेठ येथील मुख्य बसस्थानकाहून सोडण्यात येत होत्या. मोरभवन बसस्थानकावरून सावनेपर्यंत जाणाऱ्या गाडय़ाच फ क्त सुटतील. सावनेरपुढे जाणाऱ्या गाडय़ा गणेशपेठ स्थानावरूनच सुटतील, त्यात नागपूर ते पचमढी, छिंदवाडा, रामाकोणा, मोहगाव, पिपळा आदी बसेसचा समावेश आहे. हिंगणा ते नागपूर याच गाडय़ा मोरभवन येथून सुटणार असून हिगण्यापुढे जाणाऱ्या गाडय़ांसाठी प्रवाशांना गणेशपेठ स्थानकावरच जावे लागणार असल्याचे एस.टी.च्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राणी अवंतीबाई लोधी जन्मोत्सव रविवारी
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी
लोधी क्षत्रिय समाजतर्फे रविवारी, १६ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता गांधीसागरजवळील चाचा नेहरू सभागृहात वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा १९७ वा जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उमपमहापौर किशोर कुमेरिया यांच्या अध्यक्षतेखाली आमदार देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहायक आयुक्त लोकेश लिल्हारे उपस्थित राहणार आहेत. प्रवीण कान्होले, यशवंत कुमेरिया, संजय करमरकर, मोरेश्वर कुमेरिया, कांचन बल्लाखेडे, खेमराज दमाहे, देवेंद्र बघेले, लालसिंग ठाकूर, मनोहर अटराहे, पद्माकर मुरोडिया आदी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला लोधी क्षत्रिय समाजातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रघुनाथसिंग लोधी यांनी केले आहे.

भारतीय विचार मंचतर्फे रविवारी मुक्त चर्चा
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

भारतीय विचार मंचतर्फे नागरिकांसाठी मुक्त चर्चा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी, १६ ऑगस्टला महर्षी कर्वे शिक्षण संस्था परिसर, नरगुंदकर ले-आऊट येथे सायंकाळी ४.३० ते ६ यावेळेत ‘घरातील संस्कारांची आवश्यकता’ हा विषयावर ही मुक्त चर्चा होणार आहे. मुक्त चर्चेच्यावेळी एका सेवाभावी सामाजिक संस्थेच्या कामाचा परिचय करून दिला जाईल.

महादुला बिगर शेती पतसंस्थेची आमसभा
कोराडी, १४ ऑगस्ट / वार्ताहर

महादुला बिगर शेती पतसंस्थेची आमसभा संस्थेच्या सभागृहात नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी भाऊराव भालेराव होते. याप्रसंगी ठाकरे, राऊत, रामजी इंगोले, भुदेव वांढे, सूर्यभान काटकर, भुजंग ढेगरे, मनोहर इंगळे, विनोद राजुरकर, अशोक ठाकरे आदी उपस्थित होते.