Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

नवनीत

एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले-
भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी,

 

काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटील प्रश्नांतून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खूहो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते. एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनात कलंदक-निवासात राहत होते. त्या वेळी भगवंतांविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ-संध्याकाळ पाचशे गाडय़ांतून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोशीत होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि साभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधाची वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, ‘‘राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये; जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ-संध्याकाळ पाचशे गाडय़ांत अन्नपात्रे भरून अन्न पुरवीत आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल.’’ ‘‘भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो. त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोशीत आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार; त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत.’’ ‘‘‘म्हणून, भिक्खूंनो, तुम्ही स्वत:ला हे शिकविले पाहिजे, की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षांव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू आणि त्यांचा वर्षांव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही. प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

प्रकाशाहून अधिक वेगाने प्रवास करणारे कण अस्तित्वात आहेत काय?
विशिष्ट सापेक्षतावादानुसार, एखाद्या कणाचा वेग वाढतो तसे त्याचे वस्तुमानही वाढू लागते, त्यामुळे प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या कणांचे वस्तुमान हे अनंत असेल. त्यामुळे जर एखाद्या कणाला प्रकाशाइतक्या वेगाने पाठवायचे असेल तर त्या कणाला अनंत प्रमाणात ऊर्जा पुरवावी लागेल. कोणतीही वस्तू प्रकाशापेक्षा अधिक वेगाने मात्र पाठवता येत नाही. तरीही प्रकाशाहून अधिक वेगाने प्रवास करणे शक्य आहे. प्रकाशाचा वेग हा निर्वात पोकळीव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमांतून प्रवास करताना कमी होतो. पाण्यातून प्रवास करताना हा वेग २५ टक्क्यांनी तर काचेतून प्रवास करताना सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी कमी झालेला असतो. पदार्थाचे कण हे या इतर माध्यमांतून प्रवास करताना त्या त्या माध्यमांतील प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकतात. अर्थात या इतर माध्यमांतसुद्धा, कोणत्याही परिस्थितीत त्यांचा वेग प्रकाशाच्या निर्वात पोकळीतील वेगापेक्षा जास्त असू शकत नाही. निर्वात पोकळीतील प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने कणांना पाठवणे हे जरी विशिष्ट सापेक्षतावादानुसार शक्य नसले तरी मुळातच ज्या कणांचा वेग हा प्रकाशापेक्षा अधिकआहे, अशा कणांची गणिती शक्यता १९६०-७० या दशकात शास्त्रज्ञांकडून वर्तविली गेली. ‘टॅकिऑन’ या नावे ओळखले जाणारे हे कण वैशिष्टय़पूर्ण असून त्यांचा वेग कमी करण्यासाठी (वाढविण्यासाठी नव्हे!) ऊर्जेची आवश्यकता भासेल. अजून शोधल्या न गेलेल्या या कणांची सर्वसाधारण पदार्थाबरोबर होणारी क्रिया ही अत्यंत क्षीण स्वरूपाची असावी. वैश्विक किरणांच्या वातावरणाशी होणाऱ्या क्रियेत असे कण निर्माण होत असल्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते. आपले विश्व हे ज्या अदृश्य पदार्थानी व्यापले आहे, त्या कृष्णपदार्थातही असे कण लक्षणीय प्रमाणात असू शकतील.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

भारताचा ब्रिटिशांच्या विरोधातला स्वातंत्र्यलढा ही जगाच्या इतिहासातील एक अद्भुत घटना मानली जाते. ढोबळ मानाने इंग्रजी सत्तेने सन १७५७च्या सुमारास प्लासी येथे बंगालच्या नवाबाचा पराभव करून इंग्रजी सत्तेचा पाया रोवला. सन १८५७च्या उठावापर्यंत भारतावर इंग्लंडच्या व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. १८५७च्या उठावानंतर खऱ्या अर्थाने इंग्लंडच्या राणीचे राज्य आपल्या देशावर आले. तेव्हापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांच्या विरोधात विविध मार्गानी स्वातंत्र्यलढा सुरू होता. सुरुवातीच्या काळात सनदशीर मार्ग मानणारे दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले यांसारखे मवाळ पुढारी होते. तर स्वातंत्र्य असे अर्ज, विनंती करून मिळणार नाही, त्यासाठी लोकजागृती करून संघर्ष करा, असे मानणारे लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल यांसारखे जहाल पुढारी होते. तर गोळीला उत्तर गोळीनेच असे मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद असे क्रांतिकारक प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्यासाठी झगडत होते, तर याउलट आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊ, त्याआधी सुधारणांचे काही हप्ते देऊन तुम्ही शहाणे झालात की आम्ही हा देश सोडून जाऊ, असे खुद्द इंग्रज म्हणत. अर्थात भारतीयांनी याला विरोध केला तो भाग निराळा! महात्मा गांधींचे राष्ट्रीय काँग्रेसमधील आगमन स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा देणारे ठरले. सत्याग्रहाच्या तंत्राने असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, चलेजाव चळवळ, या आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेचा पाया डळमळीत झाला. त्यात सुभाष बाबूंच्या आझाद हिंद फौजेच्या ‘चलो दिल्ली’च्या नाऱ्याने तर इंग्रजी सत्तेचे कंबरडेच मोडले. भारतीय आता जागे झाले होते. आता भारतावर राज्य करणे शक्य नाही, याची जाणीव झाल्यावर (१५ ऑगस्ट १९४७ ला) भारताला स्वातंत्र्य मिळाले व इंग्रज हा देश सोडून गेले.
संजय शा. वझरेकर

खूप खूप वर्षांपूर्वी सूर्य आणि पाणी दोघेही पृथ्वीवर राहायचे. दोघांची दाट मैत्री होती. सूर्य अनेकदा पाण्याच्या घरी यायचा. दोघे जिवाभावाचे मित्र तासन्तास गप्पा मारत बसायचे. पाणी सूर्याच्या घरी कधी आले नव्हते. एके दिवशी सूर्य म्हणाला की, तू आणि तुझे कुटुंबीय माझ्या घरी या ना! तुमचा पाहुणचार करायला मला आणि माझ्या बायकोला फार आवडेल.’ पाणी हसले, म्हणाले, ‘माफ कर हं. खरंच मी आजपर्यंत तुझ्या घरी आलो नाही, पण मित्रा खरं सांगू, तुझं घर फार लहान आहे. मी आणि माझी माणसं जर तुझ्याकडे आलो तर तुम्हा दोघांनाही घराबाहेर पडावं लागेल.’ ‘अरे बाबा, मी आता चांगलं मोठं कुंपण करतोय घराला. ते एवढं मोठं आहे की तुझ्या लोकांसह तू माझ्या अंगणात नक्की मावशील.’ सूर्य पाण्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत म्हणाला, ‘कसं सांगू तुला? मी आणि माझा परिवार यायचा झाला तर तुझं कुंपण फार म्हणजे फार मोठ्ठं पाहिजे. नाहीतर तुझी मालमत्ता धोक्यात येईल.’ सूर्य आणि चंद्रिका (सूर्याची पत्नी) दोघे कामाला लागले. मित्र मदतीला आले. हा हा म्हणता भव्य कुंपण उभे राहिले. ‘माझ्या आवडत्या मित्रा, आता तरी तुझ्या परिवाराला घेऊन माझ्या घराची पायधूळ झाड.’ सूर्य आग्रह करत म्हणाला. अजूनही पाणी जावं का नको अशा संभ्रमातच होते, पण सूर्याची आर्जवे पाहून पाणी वाहात कुंपणात शिरले. त्याच्याबरोबर असंख्य मासे, बेडूक, खेकडे, शिंपले, शंख, पाणवनस्पती, पाणसापही आले. गुडघाभर पाणी घराभोवती झाले. पाण्याने विचारले, ‘मी परतू का? अजूनही मी तुझ्या घरी यावे, असे तुला वाटतेय का?’ आता नाही म्हणणे सूर्याला अवघड झाले. तो ओरडला, ‘होऽऽ या ना! तुम्ही सारे माझ्या घरी या.’ पाणी वाहात राहिले. त्याची उंची वाढायला लागली. घर बुडू लागले, तसे सूर्य-चंद्र छपरावर चढले. तरी पाणी वाढत होते. ते दोघे घरापासच्या झाडावर चढले. तरीही पाण्याची पातळी चढत राहिली. ‘बघ मित्रा, अजूनही मी यावं वाटतंय, की जाऊ माघारी?’ पाण्याने विचारले. आपला शब्द मागे घ्यायला सूर्य तयार नव्हता. तो झाडावरून म्हणाला, ‘या, या, तुम्ही सगळेजण या.’ पाणी आणखी वाढले. मग मात्र सूर्य-चंद्रांना आकाशातच जावे लागले आणि अजून ते तिथेच आहेत. मित्र आपल्या भल्यासाठीच सल्ला देतात. तो नाकारण्याचा अट्टहास करू नये.
आजचा संकल्प- मित्रांचा सल्ला विचार न करताच नाकारणार नाही.
(. . . नायजेरियन लोककथा) ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com