Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

‘मनसेच्या रिक्षांवर नागरिकांचा विश्वास’
पनवेल/प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिन्ह अथवा राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेल्या रिक्षांमध्ये प्रवासी नि:शंक मनाने बसतात. मनसेने अल्पावधीत मिळविलेल्या विश्वासाचे हे द्योतक आहे, असे प्रतिपादन मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी येथे गुरुवारी केले. मनसेचे नवीन पनवेल शहर अध्यक्ष सुरेश सावंत यांनी स्थापन केलेल्या २१ रिक्षा नाक्यांच्या, तसेच राज सहकारी पतपेढीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोवर्धन पोलसानी, अतुल चव्हाण, चरणजीतसिंग चहल, प्रकाश मोरे, अनिल गजरे आदी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाचे विटंबन रोखण्यास सरसावल्या संघटना
बेलापूर/वार्ताहर

१५ ऑगस्टनिमित्त सकाळी सकाळी राष्ट्राभिमाने ऊर भरून आलेले छातीवर राष्ट्रध्वज लावून स्वातंत्र्य दिवस साजरा करतात, मात्र सायंकाळी वा दुसऱ्या दिवशी रस्त्यारस्त्यांवर प्लास्टिक वा कागदाचे राष्ट्रध्वज पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा हा अपमान थांबविण्यासाठी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, हुतात्मा नमन समिती यांनी पुढाकार घेतला आहे.

‘तुम्ही वाघ आहात हे बाळासाहेबांनी सांगितले’
पनवेल/प्रतिनिधी

युवाशक्तीमध्ये प्रचंड ताकद असते हे ओळखल्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेनंतर भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या या संघटनेने अनेक नेते घडविले. तुम्ही वाघाप्रमाणे शूर आहात, हा विश्वास बाळासाहेबांनीच महाराष्ट्रातील तरुणांना दिला, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माधव भिडे यांनी गुरुवारी येथे केले. भारतीय विद्यार्थी सेनेच्या पनवेल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख बबन पाटील, शहरप्रमुख सुनील ठक्कर, शिरीष बुटाला, रामदास पाटील, कैलास पाटील, लीलाधर भोईर आदी नेते, तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आजारपणास कंटाळून वृद्धाची आत्महत्या
बेलापूर/वार्ताहर

आजारपणास कंटाळून एका वृद्धाने घरातील पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. ब्रिजकुमार खंडेलवाल (७७, रा. वाशी) सेक्टर-२९ असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. खंडेलवाल हे सततच्या आजाराने कंटाळले होते. गुरुवारी रात्री त्यांनी गळफास लावून घेतला.

पुनर्वसनासाठी झोपडपट्टीवासीयांचे उपोषण
बेलापूर/वार्ताहर
नेरुळ अमराईनगर येथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी ५० झोपडपट्टीधारक शुक्रवारी पालिका मुख्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. सेक्टर-९ येथे अमराई उद्यानालगत काही जणांनी झोपडय़ा बांधून बस्तान बसविले होते. २००५ च्या अगोदर एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीने यामध्ये विशेष मेहनत घेतली होती, मात्र पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पालिकेला या झोपडय़ा अनधिकृत असल्याचा साक्षात्कार झाला. नंतर पालिकेने या ५० झोपडय़ा जमीनदोस्त केल्या, मात्र येथील रहिवाशांनी बाजूच्या पाण्याच्या टाकीजवळील पदपथावर संसार थाटला तो आजतागायत तेथे कायम आहे. २००० सालानंतर या झोपडय़ा झाल्या होत्या, असे पालिकेचे म्हणणे आहे, तर आमच्याकडे १९९५ पूर्वीचा पुरावा असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी या झोपडपट्टीवासीयांनी उपोषण सुरू केले आहे.

स्वाइन फ्लूबाबत जनजागृती कार्यक्रम
उरण/वार्ताहर

उरणमध्ये स्वाइन फ्लू रोगाच्या प्रसारासंदर्भात माहिती देण्यासाठी परिसरातील शाळा व संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्वाइन फ्लूच्या वाढत्या धोक्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पाश्र्वभूमीवर शाळा बंद ठेवाव्यात की ठेवू नयेत आणि प्रश्नध्यापक, मुख्याधिकाऱ्यांना स्वाइन फ्लूची माहिती करून देण्यासाठी तहसीलदारांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या विशेष बैठकीसाठी तहसीलदार सुषमा परब, ग्रामीण विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण सोनावणे, उरण गटशिक्षण अधिकारी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी एल.झेड. घोटेकर, जेएनपीटी हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत केळकर, विविध शाळांचे मुध्याधिकारी, प्रश्नध्यापक इत्यादी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रशांत केळकर यांनी स्वाइन फ्लूची लक्षणे, घ्यावयाची काळजी व औषधोपचारांची माहिती ‘स्लाइड शो’द्वारे दिली. शाळा बंद की सुरू ठेवाव्यात, याबाबत वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय घेता येईल, अशी माहिती उच्च गटशिक्षण अधिकाऱ्यांनी बैठकीप्रसंगी दिली. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार परब यांनी शाळा, महाविद्यालये, आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन दिले.