Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

स्वाइन फ्लूच्या नावे अशी ही ‘दुकानदारी’ !
प्रतिनिधी / नाशिक

स्वाइन फ्लूच्या धसक्याने सध्या नाशकात मास्क हा परवलीचा शब्द बनला असताना अगदी साध्या हात रूमालापासून ते निलगिरी तेलापर्यंत आणि जंतुनाशके, फळे आणि आयुर्वेदीक म्हणून गणल्या जाणाऱ्या जिनसा अशा अनेक साधनांना अभूतपूर्व मागणी आल्याचे पाहून व्यावसायिकांनी चढय़ा भावाने त्यांच्या विक्रीचा धडाका लावत आपली चांदी करून घेतल्याचे दिसून येते. स्वाइन फ्लूने धास्तावलेल्या नागरिकांनी खबरदारीच्या उपाय करण्यास सुरूवात केली अन् रातोरात बाजारातील या वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या. महत्वाची बाब म्हणजे, अशा बिकट प्रसंगात या ‘व्यापारी प्रवृत्ती’चा अनुभव सर्वसामान्यांना नवीन नसला तरी यंदा एरवी आदर्श म्हणून मिरवणाऱ्या पेशातील काही मंडळीही या दुकानदारीत सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या बेफिकिरीवर शिक्कामोर्तब
प्रतिनिधी / नाशिक

स्वाइन फ्लूच्या संशयितास रुग्णालयातून प्रथम घरी सोडून त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर पुन्हा त्याच्यासह संपूर्ण कुटुंबियांना तपासणीसाठी आणण्याचा प्रकार, सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर थेट ‘स्वाइन फ्लू’चा रूग्ण समजून सुरू केलेले उपचार, या आजाराचा जिल्ह्य़ातील पहिला बळी ठरलेल्या डॉक्टरच्या अहवालात नाव बदलण्याचा केलेला घोळ.. स्वाइन फ्लूसारख्या आजाराचा सामना करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अशा कार्यशैलीमुळे जिल्हा रुग्णालयातील कारभाराचे अक्षरश वाभाडे निघत आहेत.

स्वाइन फ्लूचा नाटय़गृहातील उपस्थितीवर परिणाम
प्रतिनिधी / नाशिक

शहरात बहुतेकांनी स्वाइन फ्लूचा धसका घेतल्याचे चित्र दिसत असतांना सांस्कृतिक क्षेत्रही त्यास अपवाद राहिले नसल्याचे दिसून येत आहे. नाटकांच्या उपस्थितीवर कमालीचा परिणाम झाला असताना मल्टिप्लेक्समध्ये मास्क लावून का होईना प्रेक्षक चित्रपटांचा आनंद घेताना दिसत आहे.

आयुर्वेद व्यासपीठचा दावा
‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधासाठी आयुर्वेद परिणामकारक
प्रतिनिधी / नाशिक

स्वाइन फ्लू हा संक्रामक रोग असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी आयुर्वेद शास्त्राचा उपयोग होऊ शकेल, असे मत शंकराचार्य न्यास आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्यातर्फे गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले. वायुशुद्धी, महासुदर्शन काढा, गोमूत्र अर्क आदींच्या माध्यमातून या आजारावर मात करता येईल, असा दावाही यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे साथींचा प्रसार रोखण्यासाठी आयुर्वेदीय संशोधनास सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

वीज चोरटय़ास सक्तमजुरी
नाशिक / प्रतिनिधी

मुख्य वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या मालेगाव येथील अनीस अहमद महंमद अयूब यास मालेगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या सहा महिन्यात मालेगाव तालुक्यातील चार प्रकरणांत वीज चोरांना दोन वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ऑगस्ट २००५ मध्ये रविवार वॉर्डात वीज चोरी होत असल्याच्या माहितीवरून सहायक अभियंता सियाराम यादव यांनी आपले सहकारी, पोलिसांसह अयूब यांच्या घराची तपासणी केली. यात अधिकृत वीज जोडणी नसताना तब्बल ८२,७८३ रुपयाच्या १२,६५८ युनिटस्ची वीज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्वाइन फ्लूमुळे हरिहर भेट वारी रद्द
नाशिक / प्रतिनिधी
स्वाईन फ्लूमुळे येत्या सोमवारी आयोजित काळाराम मंदिर ते त्र्यंबकेश्वर हा हरिहर भेटीचा पायी वारीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्टतर्फे नुकताच घेण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्टचे पोपट कडोळ, ह.भ.प दामोदर गावले, नारायण काकड, पुंडलिक थेटे, बाळा नागरे, खंडु चव्हाणके, किशोर ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. वारकऱ्यांनी कार्यक्रम रद्द झाल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिम्बायोसिस व बॉश अंतर्गत अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रांचे वितरण
नाशिक / प्रतिनिधी

येथील सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटचा बॉश लिमिटेड या कंपनीसाठीच्या ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रश्नेग्रॅम’ अंतर्गत वर्षभर राबविण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच येथे झाला. बॉशचे महाव्यवस्थापक गोपीकुमार, तांत्रिक विभागाचे उपाध्यक्ष रवींद्रन व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. वंदना सोनवणे व बॉश लिमीटेडच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. अभ्यासक्रमात बॉशचे २० अधिकारी सहभागी झाले होते. त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षणसेवकांचे मानधन वाढविण्याची मनसे शिक्षक संघटनेची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने शिक्षणसेवकांचे मानधन वाढविण्याची मागणी मनसे शिक्षक संघटनेने केली आहे.
२००० मध्ये शिक्षणसेवक योजना राज्यात सुरू झाली. त्यावेळी तीन हजार रुपये मानधनाचे तत्व अंगिकारण्यात आले. आता नऊ वर्षानंतरही त्यात कोणताच बदल झालेला नाही. शाळेत एकच काम करणाऱ्या शिक्षणसेवक व शिक्षक यांच्या मानधनात मोठी तफावत आहे. घरखर्च, दवाखाना, कपडे, मुलांचे शिक्षण, भाजीपाला, किराणा या महागाईच्या वाढलेल्या काळात तीन हजार रुपये मानधन कसे पुरणार, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. शिक्षणसेवकांचा हा गंभीर आर्थिक प्रश्न सोडविण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस वसंत गीते, शिक्षक नेते बबन चव्हाण, जि. प. सदस्य हेमंत गोडसे, मनोज जाधव, संदेश रोकडे आदींनी केली आहे.