Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

पुन्हा एकदा मालेगावला रोगांची ‘साथ’
मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीयदृष्टय़ा संवेदनशील विषयांचा पाठपुरावा करणे हे सर्वच राजकीय मंडळींच्या सोयीचे असते. त्यांची ही सोयच जनतेसाठी गैरसोय बनत असल्याचा अनुभव मालेगाव शहर गेल्या कित्येक वर्षापासून घेत आहे. मालेगाव जिल्हा करावा, असा टाहो आजपर्यंत या भागातील जवळपास सर्वच नेत्यांनी फोडला असला तरी केवळ जिल्हा निर्मितीने मालेगावच्या सर्व समस्या दूर होणार आहेत का, या प्रश्नाचे उत्तर एकाही नेत्याकडे नाही. दरवर्षी मालेगावला ग्रासणाऱ्या कोणत्या ना कोणत्या रोगांच्या साथीवर त्यामुळे नियंत्रण येणार आहे का ? मुळात मालेगावच्या समस्या या इतर शहरांपेक्षा अगदीच वेगळ्या आहेत.

एका गुरूचा अमृत महोत्सव
अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने मराठीमध्ये पुस्तक लिहिणे, यात विशेष काही नाही. परंतु इंग्रजीमध्ये पुस्तके लिहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या पुस्तकांची विक्री होत असेल तर ते नक्कीच विशेष म्हणावे लागेल. जळगाव येथील आय.पी. अत्तरदे यांच्या आतापर्यंतच्या यशाची ही कथा. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आय. पी. अत्तरदे हे मुळचे धरणगाव तालुक्याचील साळवे या गावचे. १९५४ मध्ये ५८ टक्के गुण मिळवून ते मॅट्रीक उत्तीर्ण झाले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना इंग्रजीचा व्यासंग होता.

काळाबाजार विरोधात लोकसेनेचा मोर्चा
वार्ताहर / धुळे

रॉकेल, गहू, गॅस, तांदूळ आणि साखरेचा काळा बाजार करणाऱ्यांसह शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणून दहशत निर्माण करणाऱ्यांविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत तसेच आदिवासी आणि अन्य जंगल जमीन खेडुतांच्या मागण्यांसाठी लोकसेनेतर्फे शुक्रवारी येथे मोर्चा काढण्यात आला. बारा पत्थर परिसरातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व लोकसेनेचे संस्थापक अध्यक्ष वाल्मिक दामोदर यांनी केले. कॉ. डोंगर बागूल यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचेही कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यावर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

व्यापाऱ्यांच्या बंदचा सर्वसामान्यांना फटका
वार्ताहर / जळगाव

जकात कराच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या बंदचा शहरातील सर्वसामान्यांना फटका बसायला लागला असून विशिष्ट ठिकाणी साखर ३६ रुपये किलोने विकली जात असल्याने गरीबांचा चहा सुद्धा कडू झाला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या बंदमुळे रोजच्या रोज कमवून पोटाची खळगी भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

स्पॉट दारणा
..आणि प्रश्नथमिक शाळेच्या दुरूस्तीस सुरूवात
प्रकाश उबाळे / भगूर
इतिहासाची साक्ष देणारी येथील लहवित रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धुळाक्षरे गिरविलेल्या शाळेच्या परिसरातील अस्वच्छतेविषयी ‘नाशिक वृत्तान्त’ने आवाज उठविल्यानंतर पालिकेने कर्मचाऱ्यांचा संप मिटताच याठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

लासलगावच्या प्रकाश होळकर यांनी घेतली चित्रपटसृष्टीत भरारी
लासलगाव / वार्ताहर

लासलगाव येथील कवी प्रकाश होळकर यांचे नाव आता चित्रपट गीतकार म्हणून प्रसिध्द होऊ लागले आहे. ‘सर्जा-राजा, ‘टिंग्या’ या चित्रपटानंतर नुकताच प्रदर्शित झालेल्या नागेश भोसले दिग्दर्शित ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटासाठीही होळकर यांनी गीतलेखन केले आहे. त्यांच्या एकंदर वाटचालीविषयी थोडसं.

कळवणमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष
कळवण / वार्ताहर

स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना येथे ठिकठिकाणी गटारींची बिकट अवस्था झाली असून गाळ, घाण, कचरा न काढल्याने गटारी तुंबल्या आहेत. स्वच्छतेकडे प्रशासन डोळेझाक करीत असून नागरिकांच्या आरोग्याची त्यांना काळजी वाटत नसल्याचे दिसत आहे. गटारी तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर येत असून दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. डास, मच्छरांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मेनरोड व शिवाजीनगर परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे ग्राम पालिका प्रशासनाकडे केली आहे. विक्रेते भाजी विकल्यानंतर उर्वरित भाजीपाला जागेवरच पडू देतात. त्यामुळे तो सडतो व दरुगधीचे साम्राज्य निर्माण होते. शिवाजीनगर परिसरात मुलींची शाळा असून त्यांना या दरुगधीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

मद्यधुंद पित्याकडून मुलाची हत्या
मनमाड / वार्ताहर

येथून जवळच नवसारी येथे आपल्या रडणाऱ्या मुलाला वडिलांनीच जमिनीवर आपटून ठार मारल्याची दुर्देवी घटना घडली. आकाश पवार (३) असे या मुलाचे नाव असून शहर पोलिसांनी याप्रकरणी निंबा जंगलू पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ताई पवार (२४) यांनी याबाबत मनमाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निंबा पवार हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने आपल्या पत्नीस मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहून त्यांचा तीन वर्षाचा मुलगा आकाश रडू लागल्याने निंबाने त्याचे दोन्ही पाय धरून त्यास जमिनीवर आपटले, त्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.