Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

राज्य

डिंगणी-फुणगूस पुलाच्या सौंदर्याला राजकीय कुरघोडीची नजर
संगमेश्वर, १४ ऑगस्ट/ वार्ताहर

संगमेश्वर तालुक्याचा खाडीपट्टा हा पूर्वी शापित समजला जात असे. या भागात एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची बदली झाली की ती शिक्षा समजली जायची, मात्र युती सरकारच्या काळात खाडीभागाचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला आणि डिंगणी-फुणगूस पुलाने तर खाडीभागाला पर्यटनस्थळाचा दर्जाही प्राप्त करून दिला. असे असताना पुलाच्या उद्घाटनाचे श्रेय शिवसेनेला मिळू न देण्याच्या प्रयत्नात आघाडीने जे राजकारण केले, त्या राजकीय कुरघोडीची नजर या परिसराच्या सौंदर्याला लागल्याची प्रतिक्रिया खाडीभागातून व्यक्त केली जात आहे.

म्युच्युअल फंडावरील अधिभार समान दराने वसूल करण्याचा सेबीचा निर्णय
सोपान बोंगाणे, ठाणे, १४ ऑगस्ट

म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम परत घेताना छोटय़ा गुंतवणूकदारांकडून अधिक आणि मोठय़ा गुंतवणूकदारांकडून कमी दराने अधिभार वसूल करणे अन्यायकारक असल्याचे मान्य करून देशातील म्युच्युअल फंडांवर नियंत्रण करणाऱ्या ‘सेबी’ने यापुढे सर्वांकडून समान पद्धतीने अधिभार वसूल करावा व त्यात लहान-मोठा भेदभाव करू नये असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच दिला आहे. त्यामुळे काही हजारांपासून एक कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या देशभरातील लक्षावधी गुंतवणूकदारांची मोठी बचत होणार आहे.

डॉ. भीमराव कुलकर्णी यांना वेदमूर्ती पुरस्कार
डोंबिवली, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

ऋग्वेदाची विज्ञानाशी सांगड घालून साध्यासोप्या मराठी भाषेत ‘ऋग्वेदाचा मराठी शास्त्रीय अनुवाद’ या ग्रंथाची निर्मिती करणारे डोंबिवलीचे रहिवासी डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांना राज्य शासनाचा ‘महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कारातील वेदमूर्ती’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनातर्फे दरवर्षी संस्कृत दिवस नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो.

वाहनचाचणीत आता ‘इलेक्ट्रॉनिक्स’ क्रांती
पुणे, १४ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

वाहनउद्योगातील चाचणीप्रक्रियेमध्ये आता ‘इलेक्ट्रॉनिक्स’ क्रांती होत असून अहमदनगर येथील लष्कराच्या ‘व्हेईकल रीसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ मध्ये (व्हीआरडीई) येत्या रविवारी जगातील सर्वात मोठी ‘ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक’ चाचणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, राज्यमंत्री अरुण यादव, संरक्षण खात्याचे राज्यमंत्री एम. एम. पालम राजू आदींच्या उपस्थितीत रविवारी या चाचणी यंत्रणेचा प्रारंभ होत आहे.

रोहा अष्टमी अर्बन बँक बुडाल्यामुळे अनेक पतसंस्था अडचणीत - खा़ अनंत गीते
खास प्रतिनिधी, नागोठणे, १४ ऑगस्ट

पतसंस्था म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी आर्थिक पत असते. जिल्ह्यातील अर्बन बँकेमध्ये पतसंस्थेच्या ठेवी होत्या़ रोहा अष्टमी अर्बन बँक बुडाल्यामुळे अनेक पतसंस्था आज अडचणीत आल्या आहेत़ त्यामुळे सामान्य ठेवीदार बुडालेला आह़े पतसंस्थांच्या ठेवी रोहा अष्टमी अर्बन बँकेतून कशा काढता येतील, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार अनंत गीते यांनी येथे केले. नागोठणे येथील जोगेश्वरी र्मचट सहकारी पतसंस्थेचा दशपूर्ती सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार गीते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होत़े

मनोरुग्णालयातील पाच वृद्ध रुग्णांचा मृत्यू
नागपूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

कोराडी मार्गावरील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी पाच वृद्ध रुग्णांचा गेल्या काही दिवसांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील एका मनोरुग्णाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे बोलले जात आहे.भीष्मा तुपे (७५), मारुती सातपुते (६३), अरविंद उपाध्याय (७१), रामदास कडस्कर (६१) आणि फकीरा कामडे (६०) अशी मृत्युमुखी पडलेल्या मनोरुग्णांची नावे आहेत. या रुग्णांवर गेल्या पंचेवीस वषार्ंपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.

केंद्रीय सहसचिव म्हणतात.. ‘मेक्सिको मॉडेल’ नको!
पुणे, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘मेक्सिको शहरातील त्यावेळची भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत पुण्यातील स्थिती वेगळी आहे. त्यामुळे पुण्यातील ‘स्वाइन फ्लू’ नियंत्रणासाठी ‘मेक्सिको मॉडेल’ची गरज नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सहसचिव विनीतकुमार चौधरी यांनी आज पुण्यात केले. ‘स्वाइन फ्लू’च्या स्थितीचा आणि येथील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी त्यांना पुण्यात पाठविले होते.

मालेगावमध्ये कॉलऱ्याची साथ
नाशिक, १४ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

आरोग्य खात्याकरवी कॉलरा रोग हद्दपार झाल्याचा दावा केला जात असला तरी मालेगावमध्ये या रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल १५ पैकी १२ रुग्णांना कॉलरा असल्याचे निष्पन्न झाले आहे. साथ अतिसाराची की कॉलराची याचा उलगडा यथावकाश होत असताना जिल्हा प्रशासन अन् स्थानिक आरोग्य यंत्रणा यांच्यातील समन्वयाच्या गोंधळामुळे बळींचा आकडा सात की नऊ असा संभ्रम निर्माण झाला आहे.

जकातचोरी: २७ लाखांची विक्रमी दंड वसुली
पुणे, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

विदेशी घडय़ाळे, उंची काचा आणि दागिने असा जकात चुकवलेला ७९ लाख रुपयांचा माल पकडून दंडापोटी २७ लाख रुपये वसूल करण्याचा विक्रम जकात विभागाच्या गस्ती पथकाने आज करून दाखवला. एकाच कारवाईत २७ लाखांचा दंड वसूल होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिली वेळ आहे. जकात विभागाचे प्रमुख, उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी आज ही माहिती दिली. शहरात ब्ल्यू डार्ट कुरिअर मार्फत आयात झालेली टायटन कंपनीची ५५ लाख रुपयांची विदेशी घडय़ाळे आणि उंची काचा असा माल गस्ती पथकाचे निरीक्षक उमेश घुले आणि महेश बेंद्रे यांनी पकडला. या मालाची व कागदपत्रांची सखोल तपासणी केली असता, कंपनीने विदेशी मालावरील सात टक्के जकात भरणे अपेक्षित असताना ती फक्त तीन टक्केच भरल्याचे उघड झाले. जकातीची रक्कम तीन लाख ८२ हजार एवढी होत होती, त्याऐवजी कंपनीने एक लाख ६४ हजार रुपये जकात भरली होती.

श्रीराम पुरोहित यांचे प्रवचन
कर्जत, १४ ऑगस्ट/ वार्ताहर

संस्कार भारतीच्या नेरळ शाखेच्या वतीने कर्जतमधील ज्येष्ठ पत्रकार आणि कीर्तनकार श्रीराम पुरोहित यांचे ‘कृष्ण वंदे जगद्गुरुम्’ या विषयावरील प्रवचन शनिवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता नेरळमध्ये आयोजित करण्यात आले आहे. संस्कार भारतीच्या नेरळ शाखेचे अध्यक्ष धनंजय जोशी यांनी ही माहिती दिली आहे. या प्रवचनाच्या माध्यमातून श्रीराम पुरोहित हे भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने नेरळमधील सहयोग सोसायटीतील जय अंबे माता सभागृहामध्ये शनिवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या प्रवचनास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन धनंजय जोशी यांनी केले आहे.

सोलापुरात डिजिटल फलकांविरुध्द मोहीम
सोलापूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

सोलापुरात सार्वजनिक रस्त्यांवर वर्दळीच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लावण्यात येणाऱ्या डिजिटल फलकांविरुध्द पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांनी संयुक्त कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बेकायदा डिजिटल फलक लावणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांनी दिला आहे. राज्यात अलीकडे धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई व अन्य ठिकाणी डिजिटल फलक लावण्याच्या किंवा त्यांची मोडतोड करण्यावरून दंगली उसळल्या. त्यामुळेच ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय व पालिका आयुक्त रणजितसिंह देओल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर डिजिटल फलकांची संख्या उदंड होण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर प्रतिबंध घालण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.