Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

क्रीडा

गड कायम राखण्याचा अजित वाडेकर पॅनलला विश्वास
शिवाजी पार्क जिमखाना निवडणूक
मुंबई, १४ ऑगस्ट/क्री.प्र.

शिवाजी पार्क जिमखान्याची त्रवार्षिक निवडणूक १५ व १६ ऑगस्ट रोजी होत असून विद्यमान अध्यक्ष अजित वाडेकर यांच्या गेल्या सहा वर्षांतील वर्चस्वाला हेगडे-खानोलकर यांच्या पॅनलने आव्हान दिले आहे. आपल्या कारकिर्दीत आपण स्वच्छ व्यवस्थापन केले असून जिमखान्याच्या सर्वागीण विकास केला आहे. सर्व स्तरावरील प्रगतीचा दाखला देत गड कायम राखू, असा विश्वास अजित वाडेकर यांच्या पॅनेलने व्यक्त केला आहे.

अव्वल मानांकित चोंग व मेई यांना पराभवाचा धक्का
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा
हैदराबाद १४ ऑगस्ट/ पीटीआय

अव्वल मानांकित चोंग ली (पुरुष) आणि मेई झुओ (महिला) यांना आज जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. त्यांना अनुक्रमे सोनी कुंकोरो व झेई झिंगकांग यांच्याविरुध्द अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. सहाव्या मानांकित कुंकोरो (इंडोनेशिया) याने मलेशियन खेळाडू चोंग याच्यावर २१-१६, १४-२१, २१-१२ असा सनसनाटी विजय नोंदवित उपांत्य फेरी गाठली. त्याने चतुरस्र खेळ करताना ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला.

भारतीय संघातून खेळायचे आहे- नेहरा
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट/वृत्तसंस्था

गेली तीन वर्षे बाजूला पडलेल्या आशिष नेहराने झहीर खानच्या अनुपस्थितीत भारतीय संघातून खेळण्याची इच्छा बोलून दाखविली आहे.दुखापतीमुळे झहीर खान या वर्षांअखेपर्यंत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. झहीरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची मदार त्याच्या अनुभवाच्या तुलनेत नवख्या असलेल्या गोलंदाजांवर असणार आहे. या पाश्र्वभूमीवर नेहरा याने भारतीय संघात संधी मिळण्याची इच्छा बोलून दाखविली आहे.तो म्हणाला की, झहीर खानच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा वाहण्यास आपण तयार आहोत.

सायना नेहवाल पराभूत
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा
हैदराबाद १४ ऑगस्ट/ पीटीआय

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला असून तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सायनावर उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित ली वांगने २१-१६, २१-१९ असा विजय मिळविला.अव्वल मानांकित चोंग ली (पुरुष) आणि मेई झुओ (महिला) यांना आज जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. त्यांना अनुक्रमे सोनी कुंकोरो व झेई झिंगकांग यांच्याविरुध्द अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला.

नेहरू स्टेडियम फक्त खेळासाठीच वापरण्याचा आदेश
मुंबई, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

चौदा एकर क्षेत्रावर बांधलेल्या नेहरू स्टेडियमचा वापर यापुढे खेळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी केला जाऊ नये, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज पुणे महानगरपालिकेस दिला. स्टेडियमच्या एकूण जागेपैकी नऊ एकर जमीन पालिकेस भाडेपट्टय़ाने दिलेल्या ‘दि क्लब ऑफ महाराष्ट्र लि.’चे अध्यक्ष बाळासाहेब थोरवे यांनी केलेल्या रिट याचिकेवर न्या. एस. बी. म्हसे व न्या. राजेंद्र सावंत यांनी हा आदेश दिला.

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाच्या रडारवर आयसीएलमधील खेळाडू- गांगुली
कोलकाता, १४ ऑगस्ट/ पीटीआय

इंडियन क्रिकेट लीगमधील (आयसीएल) क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्याची परावानगी दिली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील सत्रासाठी आयसीएमधील क्रिकेटपटू संघाच्या रडारावर आहेत, असे मत कोलकाता नाइट रायडर्स संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. येथील ईडन गार्डन मैदानावर सराव संपल्यानंतर गांगुली म्हणाला की, आयसीएलमधील क्रिकेटपटू हे गुणवान आहेत. त्यामुळे त्यांना संघात घेण्यासाठी सर्वच संघ आतूर असतील. पण आम्ही काही गुणवान खेळाडूंना हेरले असून त्यांना संघात घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर आयसीएलमधील बंगालच्या खेळाडूंवरही आमची नजर असेल.

नोकरीत कायम होईन -अन्सारी
इंडियन एअरलाईन्समध्ये शिष्यवृत्ती तत्त्वावर नोकरीस असलेल्या अन्सारीला आजच्या विजेतेपदामुळे नोकरीत कायम होण्याची आशा आहे. तो म्हणाला सार्क स्पर्धेतील अव्वल यश हा काही चमत्कार नाही हे आता सिद्ध झाले आहे. सार्कमधील विजयामुळे येथेही विजेता होण्याची खात्री होती. आशियाई विजेतेपदाचे स्वप्न साकार झाले आहे, त्याचे श्रेय सुहास कांबळी व अरुण देशपांडे या प्रशिक्षकांना तसेच मला प्रोत्साहन देणाऱ्या पालकांना द्यावे लागेल.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची विनंती
पुणे, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, मार्गदर्शक आदी व्यक्तींना राज्य शासनातर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २००८-०९ या कालावधीसाठी या पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू,संघटक, कार्यकर्ते, तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेचा ठराव व शिफारसींसह २५ सप्टेंबपर्यंत क्रीडा व युवक संचालनालय, पुणे १ या ठिकाणी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.