Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

गोविंदा पथकांची स्वाइन फ्लूवर मात
ठाणे/प्रतिनिधी - स्वाइन फ्लूने घातलेल्या थैमानामुळे संघर्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान, टेंभीनाका मित्रमंडळासारख्या प्रचंड गर्दी खेचणाऱ्या ठाण्यातील दहीहंडय़ा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या दहीहंडय़ांवर लावण्यात आलेली १७ लाखांच्या बक्षिसांची रक्कम संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वाइन फ्लूची लागण झालेल्या गरीब रुग्णांच्या उपचारावर खर्च करण्याची घोषणा केली, तर संघर्षचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आठ ते नऊ मानवी मनोरे रचणाऱ्या मुंबई-ठाण्यातील सहा गोविंदा पथकांना रुग्णवाहिका वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. एकीकडे सामाजिक बांधिलकी जपली जात असताना दुसरीकडे शहरातील विविध भागात बांधलेल्या १५७ सार्वजनिक हंडय़ा फोडण्यासाठी गोविंदा पथकांतील उत्साह ओथंबून वाहत होता.

खगोलप्रेमींना पर्वणी
प्रदर्शनातून उलगडले विश्वाचे अंतरंग
ठाणे/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय खगोल वर्षाच्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाने येथील कलाभवनात खगोल प्रदर्शन आयोजित केले असून, १५ आणि १६ ऑगस्ट रोजी नागरिकांना ते पाहता येणार आहे. आतापर्यंत ज्ञात असलेल्या विश्वाच्या अंतरंगाची माहिती या प्रदर्शनात छायाचित्रे, तक्ते आणि आलेखांच्या रूपात मांडण्यात आली आहे.

बँक भरती मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद
ठाणे/प्रतिनिधी - स्टेट बँक इंडियात होणाऱ्या अधिकारी व क्लार्क पदाच्या भरतीसाठी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस प्रकाश गांगल व शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष विलास ठुसे उपस्थित होते.

‘आगरी समाजाचे अस्तित्व टिकवायलाच हवे’
ठाणे/प्रतिनिधी - मुंबई, ठाण्यातील मूळचा भूमिपुत्र असलेला आगरी समाज आज वाढत्या शहरीकरणाने कमी होत चालला आहे, या समाजाचे अस्तित्व टिकवायलाच हवे. आगरी समाजातील नेत्यांनी एकमेकांचे पाय खेचू नये, समाजाच्या विकासासाठी साऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून काम करायला हवे, असे मत माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांनी व्यक्त केले.

लोकप्रतिनिधींच्या गांभीर्यावर समाजाची सुरक्षितता अवलंबून
- डॉ. उल्हास कोल्हटकर

डोंबिवली/प्रतिनिधी - लोकप्रतिनिधींच्या गांभीर्यावर समाजाची सुरक्षितता अवलंबून आहे, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी बुधवारी येथे केले. शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे ‘स्वाइन फ्लू-प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती’ या विषयावर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम अमोघसिध्दी हॉलमध्ये आयोजित केला होता. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, शरद गंभीरराव, वामन म्हात्रे, अंबरनाथच्या नगराध्यक्षा संपदा गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीचा मोर्चा
भिवंडी/वार्ताहर - शहर महानगरपालिका प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात सपशेल अपयशी ठरल्याने पालिका आयुक्त प्रकाश बोरसे, महापौर जावेद दळवी यांचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक खालीद गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

उल्हासनगरमधील बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त
ठाणे/प्रतिनिधी

भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळमार्गे भारतात बनावट नोटा पाठविल्या जातात. अशा हुबेहूब वाटणाऱ्या नोटा बनविण्याचा उल्हासनगरमधील छपाईखाना ठाणे खंडणी विरोधी पथकांनी उद्ध्वस्त केला असून तेथून ३ लाख ३३ हजार ८०० रुपये किमतीच्या नोटा हस्तगत केल्या.

ठाणे कारागृह मॉडेल म्हणून विकसित करणार - खासदार नाईक
ठाणे/प्रतिनिधी

दिल्लीतील तिहार कारागृहाच्या धरर्तीवर ठाणे मध्यवर्ती कारागृह विकसित करून ते एक मॉर्डल तयार करण्याची इच्छा ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी गरुवारी कारागृहाच्या भेटीदरम्यान व्यक्त केली आहे. स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर खासदार नाईक यांनी कारागृहाला भेट दिली. त्यांच्यासोबत ठाणे शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस मनोज प्रधान होते.

‘चिम्स सिझलर्स’मध्ये स्वातंत्र्यदिन धमाका!
ठाणे/प्रतिनिधी - ठाण्यातील चिम्स सिझलर्समध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त अनलिमिटेड व्हेज, नॉनव्हेज बुफे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्टपासून २३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये स्टार्टर, सूप, देसी खाना, बिर्याणी, सॉफ्ट ड्रिंक्स, सिझलर व डेझर्ट असा भरगच्च मेनू अनलिमिटेड खाता येणार आहे. शाकाहारींसाठी २९९ रुपये, तर नॉनव्हेजवाल्यांसाठी ३९९ रुपयांत प्रति व्यक्तीला अनलिमिटेड जेवण मिळणार आहे. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज, वसंत विहार येथे सुरू झालेले चिम्स सिझलर्स हे लज्जतदार बिर्याणी, तसेच अनेक प्रकारच्या सिझलर्ससाठी खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. अनिरुद्ध व विनय तोरसे बंधूंनी सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त अनलिमिटेड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क- २५८४७६५५.

गुणदर्शन स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रद्द
डोंबिवली/प्रतिनिधी - स्वाइन फ्लूमुळे शनिवारी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात सकाळी साडेनऊ वाजता होणारा विविध गुणदर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती संयोजक मधुकर चक्रदेव यांनी दिली. डोंबिवली जिमखाना, गुरुकुल द डे स्कूल आणि सुधीर फडके स्मृती समिती यांच्यातर्फे या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. टाटा उद्योग समूहाचे उपाध्यक्ष माधव जोशी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार होता. पुढील तारीख संयोजकांतर्फे नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

रेगे वाङ्मयीन पुरस्कारासाठी आवाहन
ठाणे/प्रतिनिधी - येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे य़ंदाही ठाणे जिल्ह्य़ातील उत्कृष्ट साहित्यकृतीस रेगे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्य़ातून १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या साहित्यकृती पात्र ठरतील. ललित आणि ललितेतर अशा दोन विभागात प्रत्येकी पाच हजार रुपयांची पारितोषिके समारंभपूर्वक देण्यात येणार आहेत. कै. प्रभाकर वामन रेगे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दिलेल्या निधीतून हे पुरस्कार देण्यात येतात. ठाणे जिल्ह्य़ात वास्तव्य असलेले लेखकच या पुरस्कारासाठी पात्र ठरतील. स्पर्धेसंदर्भातली नियमावली आणि छापील अर्ज संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध आहेत. २८ ऑगस्टपर्यंत आलेल्या साहित्यकृतींचाच पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. पत्ता- मराठी ग्रंथसंग्रहालय, सरस्वती मंदिर, सुभाष पथ, स्टेशन रोड, ठाणे (प) दूरध्वनी-२५४०६७८७, २५४४२२५१.

मधुबाला ते माधुरी- मंगळवारी
डोंबिवली- तिरकिट-धा संस्थेच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता सावित्रीबाई फुले नाटय़मंदिरात आयोजित पूर्वघोषित ‘मधुबाला ते माधुरीह्ण हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम नाटय़गृहे तीन दिवस बंद असल्याने होऊ शकत नाही. आता हा कार्यक्रम मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता होईल.

ठाण्यात हाऊसिंग सोसायटय़ांसाठी स्वतंत्र वसुली अधिकारी
ठाणे /प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्य़ातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांच्या थकबाकी वसुलीसाठी आता वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील अनेक गृहनिर्माण संस्थांसमोर नाठाळ सभासदांकडून थकबाकी कशी वसूल करायची ही समस्या आहे. थकबाकी वसुलीची प्रक्रिया १०१ कलमाखाली सुरू करता येते. मात्र जिल्ह्य़ासाठी स्वतंत्र वसुली अधिकारी नसल्याने थकबाकीच्या समस्या असणाऱ्या सोसायटय़ा ठाणे हाऊसिंग फेडरेशनकडे मार्गदर्शनासाठी येत असत. फेडरेशनच्या प्रशिक्षित सेवकांना वसुलीचे अधिकार द्यावेत, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी वसुली अधिकारी नियुक्त केले आहेत.

शशिकांत राऊत यांना पुरस्कार
ठाणे- शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत राऊत यांना राष्ट्रीय सामाजिक एकता गौरव पुरस्कार ज्येष्ठ सिने-नाटय़ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. डोंबिवलीतील भारती सामाजिक एकता प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

साहित्य पाठविण्याचे आवाहन
ठाणे- ओम पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकासाठी नवोदित लेखकांना साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- ९९८७१७६२२६.