Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

ग्रंथविश्व

सिनेमाची ‘स्टोरी’
दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत वर्तमानपत्रांत विविध कार्यशाळांच्या जाहिराती दिसतात. अभिनय कार्यशाळा, नाटय़लेखन कार्यशाळा, चित्रकलावर्ग, पंधरा दिवसांत फिल्म मेकिंग. त्या जाहिराती वाचून प्रश्न पडतो की ‘अभिनय’ शिकता येतो का? चित्रकलेच्या अनेक परीक्षा पास झालेले, पुढे चित्रकार म्हणून काय गुणवत्तेचे ठरतात.? लेखनाविषयी तर खूपच गैरसमज आहेत. अनेकजण ‘साक्षरता’ म्हणजेच ‘लेखन’ असं धरून चालतात आणि याच अज्ञानाने व निर्भयतेनं ते लेखनही करतात.
क्रिएटिव्ह लेखन कसं करावं याविषयी जशा कार्यशाळा भरतात तशीच अनेक पुस्तकंही निघतात. पण उपयुक्तता फारच थोडय़ांत असते. उदा. अ‍ॅरिस्टॉटलचं ‘पोएटिक्स’, नॉर्मन फ्रिडमनचं ‘पॉर्म अँड मिनिंग इन फिक्शन’, जॉन गार्डनरचं ‘ऑन बिकमिंग नॉव्हेलिस्ट’, जॉन लॉसनचं ‘द थिअरी अँड टेक्निक ऑफ प्ले रायटिंग’.. त्यातलंच एक गाजलेलं पुस्तक, ज्याला सिनेमावाले फिल्म

 

रायटिंगमधलं बायबल समजतात, ते रॉबर्ट मॅकीचं ‘स्टोरी’ नुकतंच हातात पडलं. सामान्य प्रेक्षक सिनेमा पाहून आल्यावर त्याबद्दल आपलं मत व्यक्त करताना म्हणतो की, ‘सिनेमाची स्टोरी मस्त होती’ किंवा ‘बकवास स्टोरी होती’ किंवा ‘स्टोरी नेहमीचीच होती पण फिल्म मस्त होती.’ या त्यांच्या मतात ते सिनेमाची स्टोरी म्हणून ज्याचा उल्लेख करतात तेव्हा त्यांना निव्वळ कथा अभिप्रेत नसून सिनेमाची पटकथा व संवादाबद्दल ते आपलं मत व्यक्त करत असतात. म्हणून रॉबर्ट मॅकी आपल्या पुस्तकाच्या नावात फिल्म रायटिंग. स्क्रीनप्ले रायटिंग. असले शब्द न वापरता पुस्तकाचं नावही ‘स्टोरी’ असं साधंसोपं देतो व मजकुरातली सुलभता व सोपेपणा स्पष्ट करतो. पुस्तकात रॉबर्ट मॅकी, पटकथा कशी असावी; कशी लिहिली जावी यावरच बोलतो.
सिनेमा लेखनाच्या बाबतीतले काही महत्त्वाचे मुद्दे तो सुरुवातीलाच देतो. तो म्हणतो, सिनेमा लेखनाचे काही नियम अथवा सूत्र अस्तित्वात नाहीत. ते अनेक तत्त्वांवर आधारित आहे म्हणूनच ते ओरिजिनल असणं महत्त्वाचं असतं. एखादी चांगली कादंबरी लिहायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ चांगला सिनेमा लिहायला लागतो. कारण जे जग, ज्या व्यक्तिरेखा जी गोष्ट कादंबरीकार आपल्या कादंबरीमध्ये सांगत असतो तेच सिनेमा लेखक आपल्या सिनेमा लेखनातून करत असतो. पण ‘Movies are about making mental things physical.’ तुमच्या मनातल्या भावभावनांना चित्ररूप देणं हे सिनेमा लेखकाचं अथवा दिग्दर्शकाचं काम असतं. सिनेमातल्या व्यक्तिरेखांच्या व ते ज्या प्रसंगातून जात आहेत त्यात प्रेक्षकांना कसं एकरूप करता येईल याचा सतत विचार राहिला पाहिजे. म्हणून सिनेमा लिहिताना अचूक शब्दप्रयोग करणं आणि कमीतकमी लिहिणं अपेक्षित असतं. म्हणून त्याला लिहिण्यापेक्षा खोडणं जास्त करावं लागतं. एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना भारंभार लिहायला वेळ लागत नाही पण कमीतकमी शब्दात, नेमका अर्थ पोहोचवण्यात किंवा हवा तो परिणाम साधण्यात जास्त वेळ जातो. अनेक ड्राफ्टस् करावे लागतात. म्हणून सिनेमा लिहिण्यासाठी लेखकाकडे चिकाटी आवश्यक असते. कमीतकमी लिहिताना जास्तीतजास्त तपशील देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यात शॉर्टकट वापरायचे नसतात. म्हणजे ‘यापुढचं दिग्दर्शक काय करेल ते’, असा विचार करायचा नसतो. कारण कच्ची स्क्रिप्ट अनेकांच्या हस्तक्षेपांना आमंत्रण देते.
लोकांना काय आवडेल किंवा कुठला सिनेमा गल्ला जमा करू शकेल याचा विचार करून तुम्ही सिनेमा नाही लिहू शकत. त्याचबरोबर सिनेमा लिहिताना प्रेक्षकांना तुम्ही सन्मानाने वागवलं पाहिजे. त्यांना काय कळतंय? हा अ‍ॅप्रोच ठेवणे चुकीचे आहे. चित्रपट समीक्षकांना किंवा आपल्या इंटेलेक्चुअल मित्रांना खूश करण्यासाठी आपण एखादा मुद्दा (जो खरं तर तुमच्या चित्रपटाच्या विषयाच्या जवळपासही नसेल) आपल्या चित्रपटात आणण्याची चूक कधीच करू नये.
असे काही मुद्दे सुरुवातीलाच मांडून तो पुढे पटकथेची बांधणी, व्यक्तिरेखांची ओळख व विस्तार, प्रसंगांचं खुलवत नेणं व क्लायमॅक्स कसा आणावा याचं सोदाहरण विवेचन करतो. शेवटाबद्दल बोलताना तो म्हणतो की, शेवट हा निश्चित सुखद किंवा दु:खद असू शकतो त्याचबरोबर तो त्यामधला किंवा अनिश्चितही असू शकतो. पण अनिश्चित शेवट म्हणजे गोंधळलेला शेवट नव्हे, जो आपल्या सो कॉल्ड समांतर सिनेमामधून आपल्यासमोर येतो.
सिनेमा लेखनाच्या तंत्राविषयी बोलताना रॉबर्ट मॅकी तुम्हाला सतत एका गोष्टीची जाणीव करून देत असतो ते म्हणजे सिनेमा लेखकाला जीवनाचं भान असणं गरजेचं असतं. आपण नेहमी म्हणतो की Cinema is metaphor of life, चित्रपट हा आयुष्याचं एक रूपक आहे आणि कुठल्याही लेखनाचा मंत्र आहे. आज गोष्टी सांगणारे आजी-आजोबा फारच तुरळक झाले आहेत. पण या आजी-आजोबांच्या गोष्टी ज्या आयुष्याच्या भानातून वा अनुभवातून आपल्या नातवंडांना सांगितल्या जातात. ते भान त्या लेखकाकडे असेल तरच प्रेक्षक पडद्यावरची गोष्ट बघत एकरूप होऊ शकेल.
सिनेमात व्यक्तिरेखा रंगवणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. बऱ्याच वेळेला व्यक्तिचित्रण (कॅरेक्टरायझेन) आणि व्यक्तिमत्त्व (कॅरेक्टर) यात घोळ घातला जातो. ते पात्र कुठे राहातं, काय घालतं, त्याचं आर्थिक वा सामाजिक स्थान काय? हे सगळं त्या व्यक्तिचित्रणात येतं. पण हे व्यक्तिचित्रण असलेली अनेक माणसं अस्तित्वात असू शकतात पण आपल्याला अभिप्रेत व्यक्ती आपल्या आयुष्याच्या विविध प्रसंगी विचार काय करते ? हे त्या व्यक्तीचं वेगळे पण किंवा ज्याला आपण चरित्र असं म्हणतो ते ठरवतं. नित्यनेमाने पूजापाठ व दानधर्म करणारी व्यक्ती (हे व्यक्तिचित्रण झालं) मोहाच्या क्षणी आपल्या सात्त्विक विचारांशी ठाम राहते. पण त्याच व्यक्तीच्या जिवाला जेव्हा धोका निर्माण होतो तेव्हा ती व्यक्ती आपले सर्व संस्कार धुळीला मिळवते (हे त्याचं खरं चरित्र झालं).
ही व्यक्तिचित्रणं वा अनेक प्रसंग True to life (आयुष्याशी एकनिष्ठ) असे रंगवायचे असतील तर तुम्हाला आयुष्याचं भान असणं किती गरजेचं असतं. आयुष्य कुठल्याही तर्कावर आधारित नसतं त्याच वेळेस अतार्किक असं हे आयुष्य तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांना खरं वाटेल असं सादर करावं लागतं. हे फार कठीण असतं. म्हणून सृजनशीलतेला सर्पाची कातडी असणं गरजेचं असतं. तुमची पाचही इंद्रियं ही सतत कार्यरत असणं आवश्यक असतं. जे जग आपण कधी पाहिलंच नाही. ज्या माणसांना आपण कधी भेटलोच नाही, अशांवर निव्वळ कल्पनेच्या आधारावर आपण नाही लिहू शकत. त्याकरिता तुम्हाला त्या जगात जावं लागेल. त्या माणसांना भेटावं लागेल. प्रत्यक्ष शक्य नसेल तर त्याविषयी वाचून अथवा बघून. उत्तम वक्ता होण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही उत्तम श्रोते असणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे चांगलं लेखक होण्यासाठी तुम्ही चांगले वाचक होणं गरजेचं असतं. वाचन ही तुम्हाला तुमच्या भावविश्वाबाहेरचं दाखविणारी एक खिडकी आहे. सिनेमाशी संबंधित लेखक दिग्दर्शकांनी हे पुस्तक जरूर वाचावं आणि ज्यांनी हे वाचलंय त्यांनी ते अमलात आणावं. आणि हे पुस्तक वाचलेली मंडळी सिनेमा लेखकांना मानाने वागवतील ज्यामुळे चांगला विचार करणारी नवीन मंडळी या लेखनप्रकाराकडे आकर्षित होतील व या सिनेमा व्यवसायाला नवनवीन कथा-कल्पनांचा तुटवडा भासणार नाही, जो या व्यवसायाचा कणा झाला आहे.
महेंद्र तेरेदेसाई
mahendrateredesai@gmail.com
स्टोरी
लेखक : रॉबर्ट मॅकी
पृष्ठे : ४६६; किंमत : रु. १००३.