Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

विविध

वसुंधरा राजे व समर्थकांचे भाजपश्रेष्ठींना आव्हान!
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांतील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी सिमला येथे होत असलेल्या भाजपच्या चिंतन बैठकीवर बंडाचे सावट निर्माण झाले आहे. रा. स्व. संघ आणि भाजपश्रेष्ठींचे निर्देश धुडकावून राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्यास माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी नकार देत पक्षश्रेष्ठींच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकविला आहे. वसुंधरा राजेंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटविल्यास सामूहिक राजीनामे देण्याची त्यांच्या ५६ समर्थक आमदारांनी धमकी दिली आहे.

भारतापेक्षा अमेरिकेकडून पाकिस्तानला अधिक धोका
पाहणी अहवालातील नागरिकांचे मत
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट/वृत्तसंस्था

वायव्य पाकिस्तानमधील अल काईदा आणि तालिबानच्या ठिकाणांवर होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या नाराजीबाबत मोठी वाढ होत असून भारत किंवा तालिबानपेक्षा अमेरिकेकडूनच पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका असल्याचे मत सुमारे ५९ टक्के पाकिस्तानी नागरिकांनी नुकत्याच घेतलेल्या एका पाहणीत व्यक्त केले आहे.

काश्मीरबाबत शांततापूर्ण तोडगा ही पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील कोनशीलाच ठरावी - गिलानी
इस्लामाबाद, १४ ऑगस्ट / पी.टी.आय.

काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा ही पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील जणू कोनशीलाच ठरेल असे सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी अलीकडेच भारत व पाकिस्तान यांनी यादृष्टीने टाकलेली पावले ही उभय देशांमधील स्थिती सुधारण्यासाठी केलेली ठोस प्रगती आहे, असे सांगितले. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन समारंभानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अनिल कुमार टी यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार
नवी दिल्ली , १४ ऑगस्ट / पीटीआय

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात शूरपणाने लढणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील कॉन्स्टेबल अनिल कुमार टी यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या शिवाय ओरिसामध्ये नाल्को खाणीवर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात लढताना शहीद झालेल्या पाच जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तस्लिमा नसरीन जानेवारीत भारतात परतणार
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट/पी.टी.आय.

पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात भारतात येण्याचा निर्णय बांगलादेशच्या वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी घेतला आहे. नसरीन या या महिन्यात न्यूयॉर्कला जाणार असून तेथे त्या संशोधनाच्या क्षेत्रात सहा महिने काम करणार असून त्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे नसरीन यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल नसरीन यांनी समाधान व्यक्त करतानाच भारत सरकारचे आभार मानले आहेत. तस्लिमी यांच्या व्हिसाची मुदत १६ ऑगस्ट २०१० रोजी संपणार आहे.

महामार्ग उभारणीसाठी चीन-श्रीलंकेत करार
कोलंबो, १४ ऑगस्ट/वृत्तसंस्था

चीनची एक्झीम बँक आणि श्रीलंके दरम्यान सुमारे ३५ कोटी डॉलर्सचा करार झाला असून, त्यानुसार तेथे एक महामार्ग आणि एक भूमिगत खनिज तेल साठवणी केंद्र उभारण्यात येणार आहे. यापैकी भूमिगत साठवण केंद्र श्रीलंकेच्या दक्षिणेकडील हम्बन्टोटा बंदरावर उभारण्यात येणार आहे.
अन्य करारानुसार राजधानी कोलंबो ते ३० कि.मी. अंतरावरील आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत रस्ता बांधण्यात येणार आहे. गेल्या महिन्यातच श्रीलंकेतील पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे हक्क चीनच्या एक्झीम बँकेने मिळविले होते. हे विशेष आर्थिक क्षेत्र कोलंबो बंदर आणि विमानतळाजवळच वसलेले आहे.

चीनच्या खासदाराला फाशी
बीजिंग, १४ ऑगस्ट/पीटीआय

२४ शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कारासह विविध गुन्हे आणि संघटित गुन्ह्यांच्या यादीत नाव असलेल्या वू तीनाक्सी या ६३ वर्षे वयाच्या माजी खासदाराला काल फासावर लटकविण्यात आले.
२००५ ते २००७ या दोन वर्षांत १२ ते १४ वयोगटातील २४ शालेय मुलींवर आपल्या कार्यालयात आणि हॉटेलांमध्ये बलात्कार केल्याचा आणि अनेक आर्थिक व संघटित गुन्ह्यांत सहभाग न्यायालयात सिद्ध झाल्याने नान्यांग हायकोर्टाने वू तीनाक्सीला देहदंडाची शिक्षा सुनावली होती. काल प्रत्यक्षात त्याला फासावर लटकाविण्यात आले.

मेजर मोहित शर्मा यांना मरणोत्तर अशोक चक्र
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट / पीटीआय

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे मेजर मोहित शर्मा (विशेष पथक) यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर करण्यात आले आहे. शर्मा यांच्यासमवेत ईशान्येकडील राज्यात प्राणाची पर्वा न करता १२ अतिरेक्यांना यमसदनी पाठवणाऱ्या मेजर डी श्रीश्रीराम कुमार यांनाही अशोक चक्र जाहीर करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. या खेरीज ४ कीर्ती चक्र, २६ शौर्य चक्र, १०० सेना पदके, चार नौसेना पदके, ५ वायू सेना पदकांसह तीन तटरक्षक पदकांसह १४६ शौर्य पदकांची घोषणा आज करण्यात आली. झाशी येथे जन्मलेले मोहित शर्मा हे २००४ मध्ये सैन्यात भरती झाले होते. श्रीराम हे ३० आसाम रायफल्समध्ये २००७ मध्ये दाखल झाले होते. अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ऑर्किड’ मध्ये श्रीराम यांनी मोलाची कामगिरी केली होती.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या खास गाडय़ा बोरिवली -वसई दिवा मार्गे
मुंबई, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेच्या ३ खास गाडय़ा वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई, दिवा मार्गे १६, २१ आणि २८ ऑगस्ट रोजी सोडण्यात येणार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार संजय निरुपम यांच्या प्रयत्नाने या गाडय़ा कोकण रेल्वे सोडत असून १६ ऑगस्ट रोजी बोरिवली स्थानकावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे तोंड मिठाईने गोड करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. संदेश कोंडविलकर यांनी दिली. कोंडविलकर यांनी सांगितले की, कोकण रेल्वे बोरिवलीहून जावी, अशी मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासीयांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी असून निरुपम यांनी त्याचा पाठपुरावा करून गणेशोत्सवाच्या निमित्ताने तीन गाडय़ा मंजूर करून घेतल्या.