Leading International Marathi News Daily
रविवार, १६ ऑगस्ट २००९
  नाटकचा यू टर्न!
  ‘नजरबंदी’
  कशासाठी? सिनेमाच्या प्रेमासाठी!
  सरळसोट कादंबरी
  गोष्ट :
पाऊस
  स्मरणरंजन :
सल्ला ‘मोला’चा?
  इरजिक :
धर्माचे समाजशास्त्र आणि गणेशोपासना
  संग्रहचित्र
रणरागिणी
  दोन फुल एक हाफ
  टिकलीएवढे देश
पाण्याचं मोल जाणणारा देश
  वाद चर्चा
पाणी साठविण्यासाठी..
  पुस्तकाचे पान
सामूहिक परिश्रमाची फलश्रुती
 
 
 
 

 

नाटकचा यू टर्न!
सध्या व्यावसायिक तसेच समांतर रंगभूमीवर एकाच वेळी बरीच गंभीर नाटकं अकस्मात आलेली आहेत. या लाटेची दखल घेणारा लेख..
गेली काही वर्षे व्यावसायिक रंगभूमीनं गंभीर नाटकांकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. त्याबद्दल निर्मात्यांना कधी छेडलं तर ते म्हणतात, ‘विनोदी नाटकांनाही जिथं प्रेक्षक नाहीत, तिथं गंभीर नाटकं काढून ती बघणार कोण?’ अर्थात त्यांनी धंद्याची गणितं मांडून काढलेली तथाकथित विनोदी नाटकंही चालत नव्हतीच. परंतु तरीही नाटय़निर्माते वेगळं काही करायला धजावत नव्हते. याच काळात दिनू पेडणेकरांसारखा एखादाच अपवादात्मक निर्माता ‘फायनल ड्राफ्ट’, ‘माकडाच्या हाती शॉम्पेन’, ‘यळकोट’, ‘खेळ मांडियेला’, ‘लूज कंट्रोल’ यासारखी वेगळ्या धाटणीच#e आणि काही गंभीर आशय-विषयांवरची नाटकंही काढण्याचं धाडस करून बघत होता. त्यात ते कधी यशस्वी झाले, तर कधी त्यांनी त्यात सपाटून मारही खाल्ला. परंतु सातत्यानं त्यांनी अशा प्रकारे समांतरवरची नाटकं
 

व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी आवर्जून पुढाकार घेतला.. आजही घेत आहेत. त्याचबरोबर आपल्याला जी नाटकं व्यावसायिकदृष्टय़ा करणं शक्य नाहीत, अशांना नाटय़गृहांच्या तारखा मिळवून देऊन त्यांचे प्रयोग होतील, असंही ते पाहतात. अर्थात् त्यांनी समांतरवरची जी नाटकं व्यावसायिकला आणली, त्यातल्या बहुतांश नाटकांमध्ये काही प्रमाणात ‘कमर्शियल एलिमेंट्स’ नक्कीच होते. या अर्थी त्यांचे हे ‘प्रयोग’ व्यावसायिक ठोकताळे बांधूनच केले गेलेले होते, यात शंका नाही. मात्र त्यांनी ठरीव चाकोरीबाहेरची, तसंच वेगळ्या विषयांवरील नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर हेतुत: सादर केली, हे विशेष. त्यांच्या या ‘प्रयोगा’पासून प्रेरणा घेऊन एकाही बडय़ा निर्मात्यानं अशी नाटकं करायचं मनावर घेतलं नाही, हेही तेवढंच खरं. निर्माते चंद्रकांत लोकरे यांचं ‘खेळीमेळी’ हा नियम सिद्ध करण्यासाठीचा अपवाद! हेच कशाला, ९० च्या दशकावर आपला ठसा उमटविणाऱ्या मधल्या पिढीतल्या संवेदनशील नाटककारांची नवी नाटकं करायलाही निर्माते पुढे येईनात. इतका त्यांनी बुकिंग ऑफिसचा धसका घेतला होता. त्यामुळे याउप्पर गंभीर नाटकांना भवितव्य नाही, असा कुणाचाही समज व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली. गेल्या काही वर्षांत बरा धंदा केलेल्या, तसंच पारितोषिकप्राप्त नाटकांवर एक नजर टाकली तरी त्यांत गंभीर नाटकं अभावानंच आढळतात. गेल्या वर्षी ‘तुम्ही म्हणाल तसं!’ हे एकमेव खऱ्या अर्थी गंभीर आशय-विषय मांडणारं नाटक आलं. परंतु त्यालाही मजबूत निर्माता न लाभल्यानं ते काही प्रयोगांतच आटोपलं होतं. (सुदैवानं आता त्याला नवा निर्माता लाभला आहे!)
नाटय़-व्यवसायाची अशी एकूण रडकथा सुरू असतानाच गेल्या दोनेक महिन्यांत मात्र अचानक व्यावसायिक तसंच समांतरवर एकाच वेळी समकालीन वास्तव आणि वर्तमान विषयांशी नातं सांगणारी गंभीर आशयाची नाटकं एकापाठोपाठ आली आहेत. ‘अकस्मात हा चमत्कार कसा काय घडला बुवा?’ असं वाटावं अशीच ही चमत्कारिक घटना आहे. ‘गंभीर नाटकांना प्रेक्षक नाहीत, चांगल्या संहिता मिळत नाहीत, चांगलं नाटक मिळालं, तरी ते पेलू शकणारे कलावंत मालिका-चित्रपटांतून बिझी असल्याने नाटकासाठी ते उपलब्ध होत नाहीत, निर्मितीचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि बुकिंग खिडकीवरील सध्याची स्थिती पाहता तो पेलणं अशक्य आहे..’ अशी अनेक कारणं पुढं करणारे निर्माते आज अचानक गंभीर नाटकांकडे वळलेत, ही सुखद आश्चर्याचीच बाब आहे. ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’, ‘गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’, ‘मन उधाण वाऱ्याचं’, ‘झालं गेलं विसरून जाऊ’, ‘दुसऱ्या लग्नाचं प्रकरण’, ‘मायक्रोवेव्ह चकणा’ अशी आजचं वास्तव मांडणारी नाटकं नुकतीच लागोपाठ रंगभूमीवर आली आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनीही त्यांचं चांगलं स्वागत केलेलं आहे.
या नाटकांचं आणखी एक जाणवणारं वैशिष्टय़ म्हणजे- यातल्या बहुतेक नाटकांतून स्त्री-पुरुष संबंध, त्यांच्यातलं नातं, या संबंधांतले तिढे व पेच, तसंच त्याकडे पाहण्याचा उभयतांचा दृष्टिकोण आणि त्यापायी निर्माण होणारी गुंतागुंत.. या साऱ्याची झाडाझडती घेतलेली आहे. सर्वसाधारणत: हा एकच विषय वेगवेगळ्या कोनांतून हाताळणारी ही नाटकं आहेत. ती एकाच वेळी येण्यात योगायोगाचा भाग असेल कदाचित; परंतु आज स्त्री-पुरुष संबंधांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, हेही यामागचं एक कारण असावं.
जागतिकीकरणाच्या लाटेमुळे ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना आता प्रत्यक्षात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्त्री-पुरुष नातेसंबंधांतील आधुनिक संकल्पना आपल्याकडे झपाटय़ानं रुजू पाहत आहेत. माहिती तंत्रज्ञानातील भरधाव प्रगतीमुळे स्त्री-पुरुष संबंधांत आज एक अनौपचारिक खुलेपणा आणि कधी नव्हे इतका मोकळेपणा आलेला आहे. केवळ घराबाहेरच्या जगात वावरतानाच नव्हे, तर संगणकाच्या माध्यमातून ऑर्कूट, ब्लॉग्जवरही जगाच्या कानाकोपऱ्याशी होणाऱ्या सहज संपर्कामुळे स्त्री-पुरुष मैत्री तसंच प्रेमाबद्दलची आपली पारंपरिक मतं मागं पडत चालली आहेत. तुमची मानसिकता काहीही असो, आधुनिकतेचा स्वीकार तुम्हाला करायचा असो-नसो, त्यापासून पळून जाणं आता कुणालाही शक्य राहिलेलं नाही. हीच गोष्ट स्त्री-पुरुष संबंधांतही घडताना दिसतेय. या सगळ्याचे पडसाद कलाकृतींतून उमटणं स्वाभाविकच म्हणायला हवं. म्हणूनच या नाटकांच्या आकस्मिक उगमाचा अन्वयार्थ या अंगानं लावणं उचित ठरेल. स्त्री-पुरुष संबंधांवरील या नाटकांची छाननी करताना ही बाब अधिकच स्पष्ट होते.
लता नार्वेकरांच्या श्रीचिंतामणी निर्मित ‘मन उधाण वाऱ्याचे’ या नाटकात नुकत्याच वयात आलेल्या तरुणाचं त्याच्याहून वयानं कितीतरी मोठय़ा असलेल्या स्त्रीकडे आकर्षिलं जाणं दाखवलेलं आहे. मुळात आपल्याकडे या समस्येच्या खोलात कुणी जायला मागत नाही. वयाच्या १३-१४ व्या वर्षी लैंगिक जाणिवा जागृत झाल्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु संस्कार, व्यावहारिक अडचणी, शिक्षण, नोकरी वगैरे अडथळे पार करून लग्नाच्या बोहल्यावर चढेपर्यंत व्यक्तीची तिशी ओलांडली जाते. तोवर त्या व्यक्तीला आपल्या या लैंगिक भावना दडपाव्या लागतात. त्यातून अशा प्रकारचं आकर्षण निर्माण होतं आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होत असतात. यालाच जोडून तरुणाईच्या आपल्या जोडीदारीकडून वाढलेल्या वास्तव-अवास्तव अपेक्षांनीही नव्या समस्या तयार होत आहेत. याचं चित्रण रसिका जोशी-मिलिंद फाटक यांच्या ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’मध्ये केलेलं आढळतं. नेटवरील चॅटिंगद्वारे जगाच्या कानाकोपऱ्याशी नित्य संपर्कात असणारी आजची पिढी जीवनाचा जोडीदार शोधतानाही या माध्यमाचा सर्रास वापर करते. हे करताना त्यातले संभाव्य धोके, त्यापासून बचाव करण्यासाठी योजावयाचे डावपेच यांतही ती माहीर आहे. व्यावहारिक टक्केटोणपे खाल्ल्यानं जोडीदाराला सर्व बाजूंनी पारखून घेण्याच्या अट्टहासात वय उलटून जातं आणि भलत्याच फुफाटय़ात पडायला होतं, हेही आजचं वास्तव आहे. तर आर्थिक उदारीकरणानंतर हाती आलेल्या मुबलक पैशामुळे मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांची नीतिमूल्यं, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आयुष्य जगण्याची पद्धती या सगळ्यांतच आमूलाग्र बदल झालेला आपल्याला अद्वैत दादरकर यांच्या ‘मायक्रोवेव्ह चकणा’ या नाटकात पाहायला मिळतो. हाती खेळणाऱ्या पैशांमुळे ‘उपभोगा’ला आलेली प्राथमिकता, स्पर्धेच्या युगाची कट थ्रोट कॉम्पिटिशन यांचे परिणाम या पिढीच्या वागण्या-बोलण्यातून स्पष्टपणे प्रतीत होत आहेत. तर मनस्विनी लता रवींद्र आणि चिन्मय केळकर यांनी नाटककार नील सायमनच्या रूपांतरित केलेल्या ‘दुसऱ्या लग्नाचं प्रकरण’ या नाटकात लग्नव्यवस्थेतील कुचंबणा मांडली आहे. चं. प्र. देशपांडेंनी लिहिलेल्या आणि गिरीश पतके यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झालं गेलं विसरून जाऊ’ (मूळ नाव- ‘डावेदार’) या नाटकात साम्यवादी विचारसरणीची मंडळीही त्यांच्या व्यक्तिगत जीवनात जेव्हा नीतिमूल्यांचा न्यायनिवाडा करण्याची व्यावहारिक समस्या उभी राहते तेव्हा पारंपरिक मानसिकतेचाच आधार घेतात, असं दिसून येतं. स्त्री-पुरुष संबंधांतलं वास्तव वैचारिक पातळीवर समतोल दृष्टीनं हाताळणं साम्यवाद्यांनाही जमत नाही, हे या नाटकाचं सार!
स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे असे वेगवेगळे कोन दाखविणारी ही नाटकं एकाच वेळी रंगभूमीवर आलेली आहेत. प्रल्हाद जाधव लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ हे मात्र एक वेगळ्याच विषयावरचं नाटक व्यावसायिकवर आलेलं आहे. मागे हॉस्पिटलमधून मूल पळविण्याच्या घडलेल्या एका घटनेवर आधारित हे नाटक आहे. त्यात सार्वजनिक सोयीसुविधांतील भ्रष्टाचार व गलथानपणा, भ्रष्ट शासनयंत्रणा, प्रसार माध्यमांची सौदेबाजी आणि या सगळ्यात सामान्यांची होणारी फटफट अशा अनेक मुद्दय़ांना या नाटकानं स्पर्श केलेला आहे.
अशी गंभीर आशय-विषयाची अनेक नाटकं एकाच वेळी रंगभूमीवर यावीत, हे चित्र सच्च्या रसिकांसाठी नक्कीच दिलासादायक आहे. गेल्या वर्षी- म्हणजे २००८ मध्ये राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेत तसंच अन्यत्रही विजेत्या ठरलेल्या ‘यू टर्न’ या गंभीर नाटकाच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंही निर्मात्यांना हुरूप आलेला दिसतो. वृद्धत्वातील कम्पॅनियनशिपबद्दल फारसं खोलात न जाता प्रेक्षकानुनयी हाताळणी करणाऱ्या ‘यू टर्न’ नाटकाचं हे यश गंभीर नाटकांकडे वळण्यास निर्मात्यांना खचितच कारणीभूत ठरलं असावं. असो. कुणाच्याही कोंबडय़ानं का उगवेना, परंतु रंगभूमीवर पुनश्च एकदा गंभीर नाटकं येऊ लागलीत, त्यांचं आपण स्वागत करायला हवं.
रवींद्र पाथरे

गेल्या वर्षी मला मिळालेल्या वसंत सोमण पुरस्काराच्या वेळी रत्नाकर मतकरींनी या कार्यक्रमात ‘तुला काहीतरी परफॉर्म करावं लागेल,’ असं सांगितलं. तेव्हा काय सादर करावं, असा मला प्रश्न पडला. त्यासाठी दोन-तीन नाटकं वाचली. पण ती आत्ताची नाहीयेत, असं वाटलं. मी आणि माझा मित्र मिलिंद फाटक आम्ही चॅटिंगवर खूप गप्पा करतो. तेव्हा तेच सीनच्या स्वरूपात सादर केलं तर.. असं मनात आलं. आणि आम्ही तो सीन सादर केला. प्रेक्षकांनी तो खूप अ‍ॅप्रिशिएट केला. प्रत्यक्षात आम्ही हे नाटक लिहिलेलं नव्हतं. नंतर अनेकांनी त्यावर नाटक कधी येणार, म्हणून विचारणा सुरू केली. सतीश आळेकर, मोहन आगाशेही मागे लागले. तेव्हा लाजेकाजेपोटी आम्ही ते लिहायला घेतलं. लेखनाची ही प्रोसेस खूपच गंमतीदार होती. एकटय़ानं लिहिताना तुम्हाला थकवा वगैरे येतो. काही त्रुटीही राहून जातात. परंतु आम्ही एकत्रितपणे ते लिहिल्याने दोष वेळीच लक्षात येत. दोघांनी एकत्रच ही प्रोसेस केल्यानं ते बसवताना आणि त्यात काम करताना खूप मजा आली. आजही प्रयोगागणिक प्रेक्षकांच्या सूचनांनुसार आम्ही त्यात बदल करत असतो. समांतरच्या प्रेक्षकाची वेगळं नाटक स्वीकारण्याची बौद्धिक तयारी असते. परंतु व्यावसायिकचा प्रेक्षकही ते चांगल्या प्रकारे रीसिव्ह करतोय. या नाटकातील मुद्दे व्यावसायिकवर पहिल्यांदाच मांडले गेले असले, तरी हलक्याफुलक्या विनोदातून मांडल्यानं प्रेक्षक ते एन्जॉय करतात आणि त्याचवेळी अंतर्मुख होऊन त्यावर विचारही करतात.

‘चारचौघी’पासून ‘श्रीचिंतामणी’ म्हणजे गंभीर प्रकृतीची नाटकं करणारी संस्था अशी माझ्या संस्थेची ओळख प्रेक्षकांच्या मनात रुजलीय. मधल्या ‘सही रे सही’ आणि ‘लोच्या’द्वारे मी विनोदी नाटकांकडे वळले तरी माझा ओढा प्रथमपासूनच स्त्रीप्रधान समस्या मांडणाऱ्या नाटकांकडेच राहिलेला आहे. त्यामुळे विनोदी नाटकांकडून मी पुन्हा एकदा ‘मन उधाण वाऱ्याचे’सारख्या गंभीर नाटकाला हात घातला. या नाटकाचा विषय वर्तमानाशी संबंधित आहे. वंदना गुप्तेसारखी समर्थ अभिनेत्री आणि उमेश कामतसारखा गुणी तरुण अभिनेता मला या नाटकाला लाभलेत. माझ्या या प्रयत्नांना प्रेक्षकांकडूनही उत्तम साथ मिळतेय. पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी हे नाटक उचलून धरलंय. मधल्या काळात कुणीही निर्माते गंभीर नाटकं काढायला धजावत नव्हते. कारण परिस्थितीच तशी होती. परंतु आता पुन्हा प्रेक्षक गंभीर नाटकं स्वीकारण्याच्या मूडमध्ये दिसताहेत. रंगभूमीच्या दृष्टीनं ही सकारात्मक गोष्ट आहे.

चं. प्र. देशपांडे यांचं ‘डावेदार’ हे नाटक मी आधी समांतरला केलं होतं. निर्माते राजन वेलणकर यांना ते आवडलं होतं. त्यांना ते व्यावसायिकला करायची इच्छा होती. पण ते व्यावसायिक रंगभूमीवर कितपत स्वीकारलं जाईल, असं वाटत होतं. कारण हे पिटातल्या प्रेक्षकांचं नाटक नाहीए. मात्र, ज्यांना जगणं समजून घ्यायचं आहे, अशांना हे नाटक पसंत पडेल, ही खात्री होती. डावी विचारसरणी म्हणजे काय, हे लोकांना कळत नाही. परंतु त्यांना कम्युनिस्ट माहीत आहेत. कम्युनिस्टांची विचारधारा आणि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्यातलं जगणं, यांतली विसंगती या नाटकात दाखवलेली आहे. त्यात केवळ बौद्धिक मनोरंजन नाही. त्यात भावनिकताही आहे. माणसं कुठल्याही विचारसरणीची असोत, स्त्री-पुरुष संबंधांत मात्र ती एकसारखीच रिअ‍ॅक्ट होतात. आपल्या इस्टेटीला आपल्याच रक्तामांसाचा वारस हवा, ही भारतीयांची पारंपरिक मानसिकता इथल्या कम्युनिस्टांमध्येही आढळून येते. बौद्धिक पातळीवर विचारपूर्वक स्वीकारलेली विचारधारा आणि व्यक्तिगत जीवन यांच्यातला हा विरोधाभास ‘झालं गेलं विसरून जाऊ’ (पूर्वीचं ‘डावेदार’)मध्ये रंगवलेला आहे. हे नाटक व्यावसायिकच्या प्रेक्षकाच्याही पचनी पडताना दिसतंय. नाटकातील व्यक्तींचा बौद्धिक वादविवाद लोक शांतपणे ऐकतात आणि योग्य वेळी, योग्य ठिकाणी ते प्रतिक्रियाही देतात. याचा अर्थ नाटक लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतंय. विशेषत: स्त्रियांना हे नाटक जास्त भावतं. याचाच अर्थ पारंपरिक नैतिकतेचं मूल्य अजूनही भारतीयांना महत्त्वाचं वाटतं. प्रदीप वेलणकर तब्बल ११ वर्षांनंतर या नाटकाद्वारे पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करताहेत.

गेली काही वर्षे मी नाटकापासून दूर होतो. त्यामुळे डेस्परेटली मला एखादं नाटक करायचं होतं. त्यासाठी मी चांगलं स्क्रिप्ट शोधत असताना नील सायमनचं लग्नसंस्थेवरचं हे नाटक माझ्या हाती लागलं. माझ्या आजूबाजूलाही सध्या लग्नसंस्थेतून निर्माण झालेला हाच राडा सुरू आहे. त्यामुळे मला ते आवडलं. त्यात आजवर मी दीर्घाकच केलेले असल्यानं दोन अंकी नाटकाचं आव्हान मला पेलून बघायचं होतं. प्रथम मनस्विनी या नाटकाचं रूपांतर करणार होती. पण तिला वेळेअभावी ते जमेना तेव्हा आम्ही दोघांनी मिळून ते करायचं ठरवलं. ‘दुसऱ्या लग्नाचं प्रकरण’चा पहिला अंक तिनं लिहिलाय आणि दुसरा मी! आधी शब्दश: भाषांतर करायचं ठरलं आणि मग त्यावर आधारित रूपांतर! परंतु आम्ही लिहायला सुरुवात केली आणि हातून थेट रूपांतरच होत गेलं. नाटकातला उपहास बाहेर काढायचं, हे बेसिकली ठरलं होतं. काही ठिकाणी संदर्भ बदलून घेतले. या प्रोसेसमध्ये आमची भाषाही match झाली. लिहितानाच अनेक जागाही सुचत गेल्या आणि भारतीयीकरण सोपं झालं. नील सायमननं ७७ साली अमेरिकेतल्या वास्तवावर लिहिलेलं हे नाटक! आज ४० वर्षांनी आपल्याकडेही तेच वास्तव आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे त्यात वेगळ्याने काहीही बदल करावे लागले नाहीत. यातल्या पात्रांच्या मनात लग्नसंस्थेबद्दल कन्फ्युजन्स आहेत. तरुण लोभन-मोमो ही आमच्या जवळची कॅरेक्टर्स होती. काहींना यातले लग्नसंस्थेत शाश्वततेचा शोध घेणारे अनिता-निखिल आवडले. एकुणात- तरुणाई आणि जुने-जाणते दोघांनाही हे नाटक आवडतंय. माझ्या आजी-आजोबांना जरी हे नाटक पचवणं जड गेलं, तरी त्यांना नाटक ‘कळलं’. विवाहबाह्य संबंधांबद्दलचं वास्तव स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी झाली असावी, असा त्याचा अर्थ होतो.
नाटकाची सहलेखिका मनस्विनी लता रवींद्र हिनंही नाटय़लेखनाच्या प्रोसेसमधील गंमतीला दुजोरा दिला. त्याचवेळी गंभीर विषयांवरील नाटकं प्रेक्षकांना आवडत नाहीत, या निर्मात्यांच्या दाव्याला छेद देणारे एका सर्वेक्षणातील निष्कर्षही तिनं सांगितले. त्यात बहुतांश प्रेक्षकांनी सांगितलं की, आम्ही विनोदी नाटकं आवडीनं पाहतो. त्यातही जी नाटकं रंगभूमीवर येतात, त्यातून भल्याबुऱ्याची निवड आम्ही करतो. पण चांगली गंभीर नाटकंच येत नाहीत, तर ती पाहायची कशी? आम्हाला गंभीर नाटकं नकोत, असं अजिबातच नाहीए.

इरावती कर्णिकने आमच्या कॉलेजमध्ये एक रायटर्स वर्कशॉप घेतलं होतं. त्यात तिनं, तुमच्या आजूबाजूच्या विषयांवर लिहावं, असं आम्हाला सुचवलं होतं. तेव्हा मला माझ्या कॉलेजातल्या, ग्रुपमधल्या काही मुलींच्या चर्चा, गप्पा आठवल्या. तेव्हा मी डिस्कोथेकमध्येही जात असे. तिथे, तसंच मोन्ताज-बरिश्तामध्ये, ड्रामा डिपार्टमेंटमध्ये, दुबेंच्या वर्कशॉपमध्ये मुलींच्या आपापसात चालणाऱ्या गप्पा मी ऐकत असे. त्यातून त्यांची मानसिकता, त्यांचे बोलण्याचे विषय मला माहीत झाले होते. सेक्स, दारू, बॉयफ्रेंड्सबद्दल त्या बिनधास्तपणे बोलत. त्यात शिव्यांचा मुक्त वापर असे. त्या आपल्या मैत्रीतही पझेसिव्ह असत. उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय मुलींचे गप्पांचे हे विषय, त्यांचं जगणं यावर आपण का लिहू नये, असं वाटलं आणि मी त्यावर प्रथम एकांकिका लिहिली. नंतर तिचंच ‘मायक्रोवेव्ह चकणा’ हे नाटक केलं. या मुलींचे प्रॉब्लेम्स तोंडीलावण्यापुरतेच असतात. म्हणून नाटकाचं नावही तसं दिलं. पण हे नाटक करायला आमच्या ग्रुपमधल्या मुली तयार होईनात. कारण नाटकातल्या पात्रांचं सेक्स वगैरेवरचं खुलेआम बोलणं त्यांच्या पचनी पडणारं नव्हतं. तेव्हा त्यांना अशा मुलींबरोबर पिकनिकला पाठवलं, त्यांच्याशी बोलण्याची, गप्पा मारण्याची आणि त्यातून त्यांना समजून घेण्याची संधी दिली. तेव्हा कुठं त्या नाटकात काम करायला राजी झाल्या. या नाटकातील बहुतेक कॅरॅक्टर्स माझ्या पाहण्यातली, खरीखुरीच आहेत. नाटक प्रेक्षकांकडून कसं स्वीकारलं जाईल, याची धाकधुक होती. परंतु लोकांनी ते छान स्वीकारलंय. नाटकात काम करणाऱ्या मुलींच्या पालकांनी नाटक पाहिलं. त्यांनाही नाटकात काही धक्कादायक वाटलं नाही. याचं कारण आज या गोष्टी सर्रास घडताना दिसतात. लोकही त्यांना सरावत आहेत. आजच्या तरुणाईचं लाइफ अशाच पद्धतीचं आहे. मुलांपेक्षाही मुली अनेक निषिद्ध विषयांवर भयंकर बोलतात.