Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

‘सीएसटी’च्या ‘रजे’मुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
मुंबई, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

महामेगाब्लॉकमुळे दादर स्थानकात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती
मशिद स्थानकातील पूल ७० टक्के जमीनदोस्त
उपनगरी लोकलमधून पडून एक ठार तर तीन जखमी
अजस्त्र यंत्रांनी घाव घालून मध्य रेल्वेने आज मशिद स्थानकातील ब्रिटिशकालीन पूलाचा जवळपास ७० टक्के भाग जमीनदोस्त केला. या पाडकामासाठी केलेला मेजर ब्लॉक, विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक आणि स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असूनही उसळलेल्या गर्दीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गर्दीमुळे दादर स्थानकातील फलाट क्रमांक एक-दोनवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आजची परिस्थिती पाहता रविवारी मुंबईकरांनी मध्य रेल्वेने प्रवास टाळणेच सयुक्तिक ठरणार आहे.

‘पाणी वाचवा’ ही राष्ट्रीय घोषणा व्हावी -पंतप्रधान
नवी दिल्ली, १५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून आज देशवासियांना संबोधताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रनिर्माण हाच सर्वात मोठा धर्म असल्याचा संकल्प केला. मान्सूनने दगा दिल्यामुळे देशापुढे उद्भवलेल्या भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ‘पाणी वाचवा’ ही राष्ट्रीय घोषणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना मनमोहन सिंग यांनी ऊर्जा बचतीची नवी संस्कृती सुरु करण्याची गरज अधोरेखित केली. दुष्काळाशी लढण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही देताना स्वाइन फ्लूमुळे घाबरून दैनंदिन कामकाज थांबविण्याइतपत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही, असा दिलासा त्यांनी शहरी भागातील जनतेला दिला.
१५ ऑगस्टच्या पवित्र दिनी देशाच्या जनतेपुढे आपले म्हणणे मांडण्याची सलग सहाव्यांदा संधी मिळल्याबद्दल स्वतला नशीबवान ठरविताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारताच्या भरभराटीचे नव्याने स्वप्न रंगविले.

देशातील सर्वात मोठी २५ लाखांची दहीहंडी झाली ५ लाख ११ हजारांची!
मुंबई, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

एकेकाळी कोकणातील बाणकोटी बाल्यांचा खेळ म्हणून ज्याच्याकडे पाहून लब्धप्रतिष्ठित लोक नाके मुरडत असत त्या दहिहंडीलाही कॉर्पोरेट स्वरूप आले आणि आता त्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील सगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात मोठी २५ लाखांची दही हंडी म्हणून संपूर्ण मुंबईत फ्लेक्सचे मोठमोठाली होर्डिग लावून ज्याचा गवगवा झाला, त्या राम कदम मित्रमंडळाची दहीहंडी फोडणाऱ्या चुनाभट्टी येथील प्रेमनगर मंडळास केवळ पाच लाख ११ हजार रुपयेच देण्यात आले आहेत. याबाबत प्रेमनगर मंडळाचे नेते विजय तांडेल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही दहीहंडी आम्ही सातव्या थरावर फोडली. दही हंडी फोडल्यावर आम्हाला पाच लाख ११ हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले. बक्षीसाची रक्कम आम्हाला अद्याप मिळालेली नाही. मात्र ती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र २५ लाखांचे बक्षीस अचानक पाच लाख ११ हजारांवर कसे काय आले व यावर तुम्ही आक्षेप घेतलात का, यावर विजय तांडेल यांनी यावर मी आता काय बोलणार तुम्ही राम कदम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया दिली.

शाहरुखलाही अमेरिकेच्या उद्दामपणाचा फटका
विमानतळावर दोन तास कसून चौकशी
न्यूयॉर्क, १५ ऑगस्ट/पी.टी.आय.

आपले आडनाव ‘खान’ असल्यानेच अशा प्रकारची वागणूक
‘वर्ल्ड ट्रेड’ सेंटरवरील हल्ल्यानंतर सुरक्षततेच्या नावाखाली विमानतळावर होत असलेल्या तपासणीचा तसेच चौकशीचा प्रसाद अभिनेता शाहरुख खान यालाही मिळाला. न्यूजर्सी येथील नेवार्क विमानतळावर शाहरुखला तब्बल दोन सात चौकशीच्या नावाखाली अडविण्यात आले होते. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. या घटनेने प्रचंड निराश झालेल्या शाहरुखने आपले आडनाव ‘खान’ असल्यानेच अशा प्रकारची वागणूक दिल्याचा आरोप विविध वृत्तवाहिनींशी बोलताना केला. स्वातंत्र्यदिनाच्या एका कार्यक्रमासाठी शाहरुख न्यूजर्सी येथून शिकागोला जात असताना नेवार्क विमानतळावर ही घटना घडली. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर विशेष चौकशीसाठी शाहरुखचे नाव पुकारण्यात आले. यानंतर त्याला एका खोलीत नेण्यात आले. याठिकाणी शाहरुखला अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेत येण्याचे कारण तसेच अन्य प्रश्नांचा समावेश होता. यावेळी त्याला अन्यत्र दूरध्वनी करण्यासही प्रतिबंध करण्यात आला. अखेर विनंती केल्यानंतर त्याला एक दूरध्वनी करण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी शाहरुखने अमेरिकेतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून शाहरुखची चौकशीच्या जाचातून मुक्तता करण्यात आली.

आर्थिक मंदी आणि स्वाइन फ्ल्यूचा मुकाबला एकजूटीने करुया-मुख्यमंत्री
मुंबई १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यात कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती, जागतिक आर्थिक मंदी, वाढती महागाई आणि स्वाइन फ्ल्यू सारख्या आजारांचा मुकाबला आपण एकजुटीने करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केले. स्वातंत्रदिनानिमित्त मंत्रालयाच्या पं्रागणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमिता चव्हाण, कामगार मंत्री नबाब मलिक, महापौर डॉ. शुभा राऊळ, नगरपाल डॉ. इंदू शहाणी, मुख्य न्यायमुर्ती स्वतंत्रकुमार, मुख्य सचिव जॉनी जोसेफ, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलिस महासंचालक एस. एस विर्क, तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी, शासकीय सचिव अनेक मान्यवर उपस्थित होते.देशातील पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम राखण्याासाठी महाराष्ट यशस्वी ठरला आहे. मात्र हे स्थान अबाधित ठेवण्याकरिता जनता, प्रशासन, लोकप्रतिनिधी,व माध्यामांचे सहकार्य महत्वाचे आहे. यंदा राज्य सुर्वणमहोत्सवी वर्षांत प्रदार्पण करीत आहे. ही आनंदाची बाब असून सरकारने अनेक विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते विधानभवन प्रांगणात झेंडावंदन करण्यात आले. शहर आणि उपनगरातही विविध संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, सहकारी गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणीही ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

२० तारखेपासून रेशनवर ५५ रुपयांना तूरडाळ!
‘जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे सरकारचे कर्तव्य’
मुंबई, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

तूरडाळीच्या भावात झालेल्या प्रचंड वाढीनंतर राज्य सरकारने तुरडाळ रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. ही डाळ आता येत्या २० ऑगस्टपासून रेशन दुकानांवर उपलब्ध होणार आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या दिवसापासून तुरडाळ जनसामान्यांना रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा करणे हे सरकारचे कर्तव्य असून सरकार त्याप्रती कटीबद्ध असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांचे याबाबत अभिनंदन केले. लोकशाही आघाडीचे सरकार हे कायम जनसामान्यांनाच डोळ्यासमोर ठेवून आपली धोरणे आखत असल्याचेही सिंग यांनी यावेळी सांगितले.

 

प्रत्येक शुक्रवारी