Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘सीएसटी’च्या ‘रजे’मुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
मुंबई, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

महामेगाब्लॉकमुळे दादर स्थानकात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती
मशिद स्थानकातील पूल ७० टक्के जमीनदोस्त
उपनगरी लोकलमधून पडून एक ठार तर तीन जखमी
अजस्त्र यंत्रांनी घाव घालून मध्य रेल्वेने आज मशिद स्थानकातील ब्रिटिशकालीन पूलाचा जवळपास ७० टक्के भाग जमीनदोस्त केला. या पाडकामासाठी केलेला मेजर ब्लॉक, विस्कळीत

 

झालेली रेल्वे वाहतूक आणि स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असूनही उसळलेल्या गर्दीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गर्दीमुळे दादर स्थानकातील फलाट क्रमांक एक-दोनवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आजची परिस्थिती पाहता रविवारी मुंबईकरांनी मध्य रेल्वेने प्रवास टाळणेच सयुक्तिक ठरणार आहे. शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता पूजा करून मशिद स्थानकातील पाडकामास सुरुवात झाली. सर्वप्रथम ओव्हरहेड वायरचा अडथळा दूर केल्यानंतर पोकलेनसारख्या अजस्त्र मशीनने पुलावर घाव घालण्यास प्रारंभ झाला. तेव्हापासून आज रात्री उशिरापर्यंत पुलाचे पाडकाम अखंड सुरू होते. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.
मेजर ब्लॉकमुळे मध्य रेल्वेने नेहमीच्या तुलनेत आज निम्म्याच लोकल चालविल्या. या लोकल दादर, भायखळा आणि वडाळा स्थानकांपर्यंतच होत्या. परिणामी या स्थानकांत प्रचंड गर्दी उसळली. अन्य स्थानकेही गर्दीने ओसंडून वाहात होती. प्रचंड गर्दीमुळे लोकलमध्ये पाय ठेवणेही मुश्किल होते. लहान मुले व महिला प्रवाशांचे त्यामुळे अत्यंत हाल झाले.
दादर स्थानकात केवळ फलाट क्रमांक एक व दोनवरूनच लोकल चालविण्यात येत होत्या. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या फलाटांवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अन्य फलाट रिकामे असताना त्यावरून एकही लोकल चालविण्यात येत नसल्याबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त होत होता. फलाट एैसपैस असल्याने भायखळा व वडाळा स्थानकातील चित्र तुलनेत बरे होते. मात्र तेथील पादचारी पुलांच्या पायऱ्या चढण्या-उतरण्यासाठी प्रवाशांना बराच वेळ लागत होता. सकाळच्या तुलनेत संध्याकाळी अधिकच बिकट परिस्थिती होती.
प्रवाशांच्या सोयीसाठी दादर, भायखळा आणि वडाळा येथून बेस्टतर्फे सीएसटीकरिता काही विशेष बसेस चालविण्यात आल्या. यापैकी बहुतांश बसेस खास म्हणून न चालविता नेहमीच्या मार्गावर जादा म्हणून चालवल्याने प्रवाशांना तेथेही गर्दीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे टॅक्सीवाल्यांची मात्र चंगळ झाली. रेल्वे स्थानकांत जादा बसेसबाबत उद्घोषणा होत असल्या, तरी त्या कोठून सुटणार हे स्पष्ट होत नसल्याने प्रवाशांची ससेहोलपट झाली.
भायखळा येथे उतरल्यानंतर बहुतांश प्रवासी पूर्वेकडून बाहेर पडत होते. मात्र बसेससाठी त्यांना राणीच्या बागेपर्यंत पायपीट करावी लागत होती. पश्चिमेकडून स्थानकाबाहेरच बसेस उपलब्ध असल्या, तरी त्याबाबत सूचना देणारा एकही फलक कोठेही लावण्यात आला नव्हता. भायखळा पूर्व येथे टॅक्सीवाल्यांच्या बेशिस्तपणामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मात्र ती आवरण्यासाठी वाहतूक पोलिसही कुठेच नव्हते.