Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘पाणी वाचवा’ ही राष्ट्रीय घोषणा व्हावी -पंतप्रधान
नवी दिल्ली, १५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून आज देशवासियांना संबोधताना पंतप्रधान

 

मनमोहन सिंग यांनी राष्ट्रनिर्माण हाच सर्वात मोठा धर्म असल्याचा संकल्प केला. मान्सूनने दगा दिल्यामुळे देशापुढे उद्भवलेल्या भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ‘पाणी वाचवा’ ही राष्ट्रीय घोषणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना मनमोहन सिंग यांनी ऊर्जा बचतीची नवी संस्कृती सुरु करण्याची गरज अधोरेखित केली. दुष्काळाशी लढण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही देताना स्वाइन फ्लूमुळे घाबरून दैनंदिन कामकाज थांबविण्याइतपत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही, असा दिलासा त्यांनी शहरी भागातील जनतेला दिला.
१५ ऑगस्टच्या पवित्र दिनी देशाच्या जनतेपुढे आपले म्हणणे मांडण्याची सलग सहाव्यांदा संधी मिळल्याबद्दल स्वतला नशीबवान ठरविताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारताच्या भरभराटीचे नव्याने स्वप्न रंगविले.
भर पावसात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक नव्या घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभा अध्यक्ष मीराकुमार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानांचे सहकारी पावसात बसून त्यांचे भाषण ऐकत होते.
यंदा अपुऱ्या मान्सूनमुळे पडणाऱ्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची मनमोहन सिंग यांनी घोषणा केली. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात येत असल्याचे जाहीर करताना. अल्पमुदतीच्या कृषीकर्जावरील व्याज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आमच्यापाशी पुरेसा धान्यसाठा असून धान्य, डाळी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. राज्यांनीही साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कायद्याने प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. देशात कुणीही कधीही उपाशी झोपू नये, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी खाद्यान्न सुरक्षा कायदा करून दारीद्रय़रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला सवलतीच्या दरात निश्चित प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला आणि प्रशासनातील भ्रष्टाचारावर कोरडे ओढले.
२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर दहशतवादाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली असून गुप्तर संस्था आणि सुरक्षा दलांच्या कामात सतत सुधारणा घडून येत आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने भारतातून दहशतवादाचे उच्चाटन करण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील नागरिकांना आपली नाखुषी व रोष व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जनतेच्या तक्रारी व नाराजीविषयी प्रत्येक सरकार संवेदनशील असायला हवी. पण सरकारी संपत्तीची हानी करून व रक्त सांडवून काहीही साध्य होणार नाही. असहमती व्यक्त करण्यासाठी िहसेच्या मार्ग अवलंब करणाऱ्यांसाठी आमच्या लोकशाहीत कोणतेही स्थान नाही आणि अशा लोकांचा सरकार कठोरपणे मुकाबला करेल, असा इशारा त्यांनी नक्षलवाद्यांना दिला. केवळ बंदुकीच्या धाकावर शासन करता येते, असे ज्यांना वाटते त्यांना आमच्या लोकशाहीची ताकद लक्षात आलेली नाही. महिलांना सर्व क्षेत्रात समान भागीदारी मिळेपर्यंत आमची प्रगती अपूर्ण ठरेल, असे नमूद करून काँग्रेस-युपीए सरकार महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर पारित करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.