Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

देशातील सर्वात मोठी २५ लाखांची दहीहंडी झाली ५ लाख ११ हजारांची!
मुंबई, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

एकेकाळी कोकणातील बाणकोटी बाल्यांचा खेळ म्हणून ज्याच्याकडे पाहून लब्धप्रतिष्ठित लोक नाके मुरडत असत त्या दहिहंडीलाही कॉर्पोरेट स्वरूप आले आणि आता त्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील

 

सगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात मोठी २५ लाखांची दही हंडी म्हणून संपूर्ण मुंबईत फ्लेक्सचे मोठमोठाली होर्डिग लावून ज्याचा गवगवा झाला, त्या राम कदम मित्रमंडळाची दहीहंडी फोडणाऱ्या चुनाभट्टी येथील प्रेमनगर मंडळास केवळ पाच लाख ११ हजार रुपयेच देण्यात आले आहेत. याबाबत प्रेमनगर मंडळाचे नेते विजय तांडेल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही दहीहंडी आम्ही सातव्या थरावर फोडली. दही हंडी फोडल्यावर आम्हाला पाच लाख ११ हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले. बक्षीसाची रक्कम आम्हाला अद्याप मिळालेली नाही. मात्र ती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र २५ लाखांचे बक्षीस अचानक पाच लाख ११ हजारांवर कसे काय आले व यावर तुम्ही आक्षेप घेतलात का, यावर विजय तांडेल यांनी यावर मी आता काय बोलणार तुम्ही राम कदम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया दिली. प्रेमनगर मंडळाचे अनेक कार्यकर्तेही यामुळे चिडले असून या फसवणुकीबाबत ते राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही समजते. प्रेमनगर मंडळाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने याबाबत काही वर्षांपूर्वी नायगाव येथील एका हंडीची आठवणही सांगितली. नायगाव येथे पाच लाखांची दहीहंडी जाहीर करण्यात आली व प्रत्यक्षात एका मंडळाने हंडी फोडल्यावर पाच लाख पैसे देणार असल्याचे संयोजकांनी सांगितले होते. यातून पुढे खूप भांडणे झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
राम कदम यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या एकूण बक्षीसाची रक्कम २५ लाखांची होती. आमच्या मुंबईभर लागलेल्या होर्डिग्जवरही आम्ही तसे स्पष्ट म्हटले होते. काही प्रस्थापितांच्या पोटात आमच्या दहीहंडीमुळे दुखू लागल्यानेच आता हा वाद उकरून काढला जातो आहे. आमच्या दहीहंडीसाठी २१४ दहिकाला मंडळे आली होती. आमच्याकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक मंडळाला आम्ही ठरावीक रक्कम दिली. असे करणारे आमचे एकमेव मंडळ होते. पुरुषांसाठी सहा थराला ५००० रुपये, सात थरांना १०, ००० रुपये तर आठ थरांना २५,००० रुपये रक्कम होती. तर महिलांसाठी चार थरांना ५००० रुपेय, पाच थरांना १५,००० रुपये व सहा थरांना २५,००० रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती. प्रेमनगरच्यावेळी हंडी खाली केली गेली, त्यामुळेच ती सातव्या थरावर त्यांना फोडता आली कारण गर्दी वाढत होती व स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर गर्दी वाढत असल्याने हंडी खाली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राम कदम यांनी सांगितले. याबाबत दहीकाला समन्वय समितीचे सचिन अहिर व जितेंद्र आव्हाड या दोघांनीही अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अहिर म्हणाले की, ही सरळ सरळ दहीकाला मंडळांची फसवणूक आहे. स्वस्त प्रसिद्धीसाठी अनेकजण असले प्रकार करतात. देशातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्धी करायची व नंतर रक्कम देताना कंजुषपणा करायचा हे योग्य नाही. एकूण रक्कम किती याला काय अर्थ आहे. गेल्या वर्षीच संकल्पतर्फे २८ लाखांची बक्षीसे वाटली गेली. मात्र हंडी फोडण्याची रक्कमच जाहिरातीत सांगायला हवी. आव्हाड म्हणाले की, हे प्रकार तात्काळ थांबायला हवेत. दहीहंडीच्या माध्यमातून स्वस्त प्रसिद्धी मिळत असल्याचे वाटत असल्यानेच आता असले नेते तयार व्हायला सुरूवात झाली आहे. जर प्रेमनगर मंडळाला २५ लाखांची रक्कम दिली गेली नाही, तर पुढील वर्षी या मंडळावर बहिष्कार घालण्याची भूमिका समन्वय समितीला घ्यावी लागेल.