Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शाहरुखलाही अमेरिकेच्या उद्दामपणाचा फटका
विमानतळावर दोन तास कसून चौकशी
न्यूयॉर्क, १५ ऑगस्ट/पी.टी.आय.

आपले आडनाव ‘खान’ असल्यानेच अशा प्रकारची वागणूक

 

‘वर्ल्ड ट्रेड’ सेंटरवरील हल्ल्यानंतर सुरक्षततेच्या नावाखाली विमानतळावर होत असलेल्या तपासणीचा तसेच चौकशीचा प्रसाद अभिनेता शाहरुख खान यालाही मिळाला. न्यूजर्सी येथील नेवार्क विमानतळावर शाहरुखला तब्बल दोन सात चौकशीच्या नावाखाली अडविण्यात आले होते. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. या घटनेने प्रचंड निराश झालेल्या शाहरुखने आपले आडनाव ‘खान’ असल्यानेच अशा प्रकारची वागणूक दिल्याचा आरोप विविध वृत्तवाहिनींशी बोलताना केला. स्वातंत्र्यदिनाच्या एका कार्यक्रमासाठी शाहरुख न्यूजर्सी येथून शिकागोला जात असताना नेवार्क विमानतळावर ही घटना घडली. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर विशेष चौकशीसाठी शाहरुखचे नाव पुकारण्यात आले. यानंतर त्याला एका खोलीत नेण्यात आले. याठिकाणी शाहरुखला अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेत येण्याचे कारण तसेच अन्य प्रश्नांचा समावेश होता. यावेळी त्याला अन्यत्र दूरध्वनी करण्यासही प्रतिबंध करण्यात आला. अखेर विनंती केल्यानंतर त्याला एक दूरध्वनी करण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी शाहरुखने अमेरिकेतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून शाहरुखची चौकशीच्या जाचातून मुक्तता करण्यात आली. या घटनेने निराश झालेल्या शाहरुखने वृत्तसंस्थेशी बोलताना माझ्या आडनावात ‘खान’ असल्याने ही वागणूक मिळाल्याचा आरोप केला. येथील एका कार्यक्रमाच्या रितसर आमंत्रणावरुन येथे आलो असल्याचे सांगूनही चौकशी अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे शाहरुखने सांगितले. माझ्याकडे असलेल्या साहित्याची दोनवेळा तपासणी करण्यात आल्याचे तो म्हणाला. मी एक कलाकार असून चित्रीकरणाच्या निमित्ताने अमेरिकेत अनेकदा येतो असे सांगूनही या अधिकाऱ्यांनी काहीही ऐकले नाही असा आरोपही शाहरुखने केला. एक तास कोणालाही दूरध्वनी करण्यास मनाई केली होती. अनेकदा विनंती केल्यानंतर एक दूरध्वनी करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर मी तेथील भारतीय दूतावासास याबाबत माहिती दिली तसेच एक संदेश खासदार राजीव शुक्ला यांना पाठविला. शुक्ला यांनी भारतातील अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधून शाहरुखबद्दल माहिती दिली. त्यानंतर चौकशीच्या जाचातून शाहरुखला सोडण्यात आले. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नुकताच शाहरुख येथे यापूर्वी येऊन गेला होता. आता याच आडनावाने त्याला असा फटका दिल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहे.