Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

मशिद स्थानकातील पूल ७० टक्के जमीनदोस्त
मुंबई, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

शनिवारी संध्याकाळपर्यंत मशिद स्थानकातील ब्रिटिशकालीन पुलाच्या फलाटांवर उतरणाऱ्या पायऱ्या व रॅम्प पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आले आहेत. रॅम्पखालील आठपैकी सहा कमानी पाडल्या असून, पुलाच्या १० पैकी स्टील गर्डर्सपैकी सहा काढण्यात आले आहेत. पुलाचे १५ व्ॉगन भरून डेब्रिस हटविण्यात आले आहे. पूल पाडण्याबरोबरच तेथील फलाटांच्या विस्ताराचेही काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर येत्या तीन-चार दिवसांत तेथे बारा डब्यांना ‘सिंगल हॉल्ट’ मिळू शकेल, अशी माहिती मध्य रेल्वे सूत्रांनी दिली.

अनामी रॉय अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी
मुंबई, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्याच्या महासंचालकपदावरून न्यायालयाच्या आदेशामुळे पायउतार व्हावे लागलेल्या अनामी रॉय यांची शासनाने आज अखेर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली. याशिवाय मुंबईच्या सहआयुक्तपदी (कायदा व सुव्यवस्था) हिमांशु रॉय यांची बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील रामानंद यांच्यावर नक्षलवादविरोधी पथकाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

लालू, मुलायम, नितीश यांना वगळून नवा समाजवादी लोकमोर्चा
मुंबई, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

डॉ. राममनोहर लोहिया आणि आचार्य नरेंद्र देव यांच्या लोकशाही समाजवादाच्या शिकवणुकीवर आधारीत नवा समाजवादी पर्याय देशासमोर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी देशभरातील समाजवादी आंदोलनातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव व नितीश कुमार या तिघांनीही समाजवादी विचारधारेला काळीमा फासल्याचा आरोप करीत आता माजी परराष्ट्र राज्यमंत्री व विद्यमान खासदार दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली लोकमोर्चा ही संघटना घोषित करण्यात आली आहे.

शिवाजी महाराजांनी याकूबबाबा दग्र्याला दिलेल्या जमिनी बॉक्साईट खाणीसाठी आंदण?
रवींद्र बिवलकर, मुंबई, १५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

बॉक्साईट खाणींविरोधात सिंधुदुर्गात आता सर्वपक्षीय विरोध सुरू झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील बॉक्साईटविरोधात मात्र सर्वपक्ष मूग गिळूनच आहेत. तालुक्यात केळशी -उटंबर गावात शिवाजी महाराजांनी गुरु मानलेल्या बाबा याकूब यांचा ऐतिहासिक दर्गा आहे. या दग्र्याला शिवरायांनी ६५४ एकर इनामी जमीन दिली होती.

शालेय पोषण आहार घोटाळ्यात आता राज्यमंत्री
संदीप आचार्य, मुंबई, १५ ऑगस्ट

जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ‘तोंडपाटीलकी’ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जोरात सुरू असतानाच ‘शालेय पोषण आहार योजनेतील’ कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्यावरून शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांनी तोफ डागली आहे. या योजनेसाठी १८ जून २००९ रोजी काढलेला शासन निर्णय व निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, अशी मागणी पंचबुद्धे यांनी केली आहे.

बडय़ा नेत्याच्या मर्जीतील कंपनीसाठी कपॅसिटर पुरवठा निविदेतील अटींमध्ये बदल?
मुंबई, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रातील एका बडय़ा राजकीय नेत्याच्या मर्जीतील कंपनीला कपॅसिटर्स पुरविण्याचे कंत्राट मिळावे यासाठी ‘महावितरण’ कंपनीने निविदेतील अटींमध्येच जाचक बदल केल्याचा आरोप कपॅसिटर्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून होऊ लागला आहे. या कपॅसिटर्सचा पुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपली असतानाच अटी बदलण्यात आल्याने उत्पादक कोटय़वधी रुपयांना धुपणार असल्याने त्यांच्यात खदखदणारा असंतोष लवकरच उफाळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिवसेना सत्तेवर आल्यास प्रत्येक जिल्ह्यात ‘वारकरी भवन’
मुंबई, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या भक्तांसाठी म्हणजेच वारकऱ्यांसाठी वरळी येथे उभारण्यात आलेल्या ‘वारकरी भवना’चे आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवसेना सत्तेवर आल्यास राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ‘वारकरी भवन’ उभारण्यात येईल, असे या वेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या मुख्यमंत्री अत्यंत अयोग्य पद्धतीने हाताळत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वाइन फ्लू या रोगापासून जनतेने कसा बचाव करावा याबाबत सरकारने जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही ठाकरे म्हणाले.

मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे सात जण रुग्णालयात दाखल
मुंबई, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वाइन फ्ल्यूचे सात रुग्ण आज मुंबई व उपनगरातील तीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सातपैकी ४ जण कस्तुरबा रुग्णालयात तर २ आणि १ जण अनुक्रमे एम. टी. आग्रवाल व सिद्धार्थमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत २ हजार २५० जणांची तपासणी करण्यात आली असून २३ जणांच्या लाळेचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील ७ जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली आहे.