Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

उद्यानांची दुरवस्था
विजय भोर

२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून गवगवाट करणाऱ्या नवी मुंबई महापालिका व सिडको प्रश्नधिकरणाने शहरातील उद्यानांकडे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने काही उद्यानांची पुरती दुरवस्था झाली आहे. नेरुळ सारसोळे डेपोजवळील उद्यानात सहा महिन्यांपूर्वी नवीन बसवलेली खेळणी तुटू लागली आहेत. तसेच नुकतीच बनविलेली संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळत आहे. या संरक्षक भिंतीवर असलेली लोखंडी जाळी चोरटय़ांनी लंपास केली आहे. उद्यानात बसण्यासाठी आसनांची व्यवस्था असली तरी पावसाळ्यात या आसनांभोवताली चिखल निर्माण झाल्याने आसनांवर बसणाऱ्यांची मोठी पंचाईत होते. त्यामुळे ही आसने ओस पडली आहेत. उद्यानात येण्याची ठराविक वेळ दिलेली असताना उद्यानात योग्य दरवाजा नसल्याने व संरक्षक भिंती पडलेली असल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती येथे आहे.

सर्पमित्रांचा मृत्यूशी खेळ!
मधुकर ठाकूर

साप म्हटला की भीतीने दरदरून घाम फुटतो. मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या नैसर्गिक जीवनचक्रात एक आवश्यक घटक समजल्या जाणाऱ्या सापांची हत्या मोठय़ा प्रमाणात केली जाते. केवळ गैरसमजुतीतून होणाऱ्या सापांची हत्या रोखण्यासाठी व सापांविषयक पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्याचे काम चिरनेर येथील फ्रेंडस् ऑफ नेचर आणि वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थांच्या सदस्यांकडून मोठय़ा शिताफीने केले जात आहे. सापांना वाचविणे एवढेच उद्दिष्ट समोर ठेवून माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन अक्षरश: मृत्यूशी झुंज देऊन सापांना वाचविण्याचे काम केले जात आहे. तेही कोणताही आर्थिक मोबदला न घेता आणि कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता. वन्यजीव वाचविण्यासाठी सतत मृत्यूच्या दाढेत वावरणाऱ्या सर्पमित्रांकडे मात्र शासन आणि वनविभागाचे दुर्लक्षच होत आहे.