Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य

स्वातंत्र्यदिनी ‘रासप’च्या पदाधिकाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
अंबाजोगाई, १५ ऑगस्ट/वार्ताहर

अंबाजोगाई जिल्ह्य़ाच्या प्रश्नावर गेली २० वर्षे राजकारण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडावंदनप्रसंगी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करम्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. विमल मुंदडा यांना वाढदिवसाची भेट असल्याचे रासपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. अंबाजोगाई जिल्हा व्हावा ही मागणी गेल्या २० वर्षांपासून ऐरणीवर आहे. जिल्ह्य़ाला आवश्यक असणारी सर्व कार्यालये सुरू झाली; परंतु घोषणा बाकी आहे. ही घोषणा निवडणुकीच्या काळातच होत आहे.

औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांचा बंद यशस्वी
जकातीविरोधातील आंदोलन
औरंगाबाद १५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकेतून जकात रद्द करण्याच्या संदर्भात शासनाला देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर निर्णय न झाल्याने जकात निर्मूलन समितीच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला औरंगाबाद शहरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गुलमंडी, औरंगपुरा, मछलीखडक, सराफा, शहागंज, मोंढा ही नेहमी गजबजलेली ठिकाणे ओस पडली होती.

जगजीतसिंग यांची मैफल आता सप्टेंबर महिन्यात
ठाणे, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने राज्यातील चित्रपट आणि नाटय़गृहे १६ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात रविवारी रात्री आठ वाजता आयोजित विख्यात गझल गायक जगजीतसिंग यांची पूर्वनियोजित मैफल रद्द करण्यात आली असून आता ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होईल, असे आयोजकांनी कळविले आहे.

ट्रकखाली चिरडून विद्यार्थ्यांचा मृत्यू; संतप्त विद्यार्थ्यांकडून ट्रक व बसची तोडफोड
हिंगोली, १५ ऑगस्ट/वार्ताहर

येथील माणिक स्मारक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणारा प्रकाश सुनेवार झेंडावंदनासाठी शाळेत जाताना ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत अनेक बस व ट्रकची मोडतोड झाली. ट्रकचालकाला मारहाण झाल्याची त्याची प्रकृती चिंताजनक आहे. एक बस पेटविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे असफल झाला. काही काळ वातावरण तंग झाले होते, नंतर शिवसेनेच्या वतीने बाजारपेठ बंद पाडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

ठाण्यातील अपहृत मुली राजस्थानात सापडल्या
ठाणे, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

टोमॅटो खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण करणाऱ्या माय-लेकींना वागळे इस्टेट पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या मुलींना पाकिस्तान सीमेजवळील कंजरबस्तीतून सोडविण्यात आले. वागळे इस्टेटमधील इंदिरानगरमधील यास्मीन हनीफ शेख (११) आणि शफीनाज ऊर्फ सोनी अहमद शेख (७) या दोघींचे १९ जुलै रोजी अपहरण झाले होते. या दोघी सायंकाळी टोमॅटो आणण्यासाठी जवळच असलेल्या बाजारात गेल्या होत्या.

शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी..
‘स्वाइन फ्लू’च्या भीतीवर श्रद्धेचा विजय
राहाता, १५ ऑगस्ट / वार्ताहर

‘स्वाइन फ्लू’चा वेगाने होणारा फैलाव लक्षात घेता या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीत जाऊ नका, तोंडावर माक्स वापरा, अशा वैद्यकीय सूचना धुडकावून लावत साईबाबांवर श्रद्धा ठेवून आज एक लाखांहून अधिक साईभक्तांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एकूणच ‘स्वाइन फ्लू’च्या भीतीवर श्रद्धेने विजय मिळविल्याचे चित्र शिर्डीत पदोपदी दिसत आहेत.लाखो भाविक ‘स्वाईन फ्लू’ची भीती झुगारून लावत समाधी मंदिरात निर्धोकपणे साई दर्शनाचा आनंद लुटत आहेत. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दर्शन रांगेत व गर्दीत माक्स वापरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

तिरंगा उलटा फडकाविल्याने तणाव
पनवेल, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

येथील बी. पी. मशीन अॅकॅडमीच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनी उलटा राष्ट्रध्वज फडकविण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या अॅकॅडमीचे मालक आर. सी. सिंग यांच्या सूचनेवरून शनिवारी सकाळी येथे राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मात्र यावेळी केवळ अॅकॅडमीचे सुरक्षारक्षकच उपस्थित होते. या सुरक्षारक्षकांनी झेंडा उलटा फडकविल्याची गंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रथम झेंडा सरळ करून त्याला सलामी दिली आणि संबंधित सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले. राष्ट्रध्वजाच्या या अवमानास संस्थेचा मालकही जबाबदार असल्याने त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

चाकूचा धाक दाखवून लुटले
औरंगाबाद, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री गांधीनगरातील मशिदीजवळ घडली. गांधीनगरातील रहिवासी जुबेरखान अय्युबखान यानेच ही लूट केली असल्याचे भवरलाल ठाणाराम रावल (वय २२, रा. राजस्थान, हल्ली मुक्काम उस्मानपुरा) यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.भवरलाल हा मित्र दीपक राजकुमार याच्यासोबत गांधीनगरात राहणाऱ्या मित्राकडे चालला होता. वाटेतच त्याला जुबेरखान याने अडविले आणि चाकूचा धाक दाखवून चापट-बुक्क्य़ाने मारहाण केल्यानंतर रोख ७०० रुपये तसेच नोकिया कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला.

दोन ट्रकच्या धडकेत एक ठार
सिल्लोड, १५ ऑगस्ट/वार्ताहर

सिल्लोड शहरातील वळणरस्त्यावर दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी ४ च्या दरम्यान घडली. जीजे-१२-डब्ल्यू-८८९४ क्रमांकाचा टँकर हैदराबादकडे चालला होता, तर एमपी-०९-केसी-२७२५ क्रमांकाचा ट्रक जळगावकडे चालला होता. शहरातील वळणरस्त्यावर शिक्षक कॉलनीजवळील पुलावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात टँकरमधील कैलास पाटील (रा. नागद, ता. कन्नड) हे जागीच ठार झाले. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की, मृत पाटील यांचे शीर धडावेगळे झाले. रक्तामांसाचा सडा रस्त्यावर पडला होता. ही घटना शहरात पसरताच नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.

भिंत ढासळून मुलगा मृत्युमुखी
पुणे, १५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

भवानी पेठेत रामोशी गेट पोलीस चौकीजवळील एका मशिदीची भिंत ढासळून शुक्रवारी संध्याकाळी एका १२ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाला. श्रेयश ऊर्फ सोनू रवी टिकारे (रा. भवानी पेठ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी. बी. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मशिदीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. रस्त्यालगतच्या एका भिंतीला लाकडी खांबांचा आधार देण्यात आला होता. श्रेयश हा दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. रस्त्याने जात असताना तो या भिंतीजवळ आला असता अचानक भिंत ढासळली. त्याखाली दबल्याने श्रेयसचा मृत्यू झाला. दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून संबंधित कामाच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

मराठवाडय़ात स्वाइन फ्लूच्या आणखी एका संशयिताचा बळी
औरंगाबाद, १५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

स्वाइन फ्लूसदृश्य लक्षणे दिसणाऱ्या एच१एन१ संशयित आणखी एका रुग्णाचा येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला न्यूमोनिया झाल्याचे समोर आले आहे.
या रुग्णाचे नाव संगीता टोगे असे आहेत. संशयित मृत्यूंची संख्या आता दोन झाली आहे. या दोन्ही रुग्णांच्या लाळेच्या नमुन्यांचा अहवाल सोमवारपर्यंत अपेक्षित आहे. दोन बळी गेल्याने मराठवाडय़ात खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्य़ातील शेलगाव (ता. बदनापूर) येथील संगीता टोगे हिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती नाजूक असल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.