Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

स्वातंत्र्यदिनी ‘रासप’च्या पदाधिकाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
अंबाजोगाई, १५ ऑगस्ट/वार्ताहर

अंबाजोगाई जिल्ह्य़ाच्या प्रश्नावर गेली २० वर्षे राजकारण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी

 

झेंडावंदनप्रसंगी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करम्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. विमल मुंदडा यांना वाढदिवसाची भेट असल्याचे रासपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अंबाजोगाई जिल्हा व्हावा ही मागणी गेल्या २० वर्षांपासून ऐरणीवर आहे. जिल्ह्य़ाला आवश्यक असणारी सर्व कार्यालये सुरू झाली; परंतु घोषणा बाकी आहे. ही घोषणा निवडणुकीच्या काळातच होत आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनोहर जोशी, शरद पवार यांनी तर जिल्हा झालाच, असे प्रत्येक सभेत आतापर्यंत सांगितले आहे. मात्र केज मतदारसंघाच्या आमदार डॉ. विमल मुंदडा तर अंबाजोगाईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विधानसभा निवडणुकीत चार वेळा विजयी झाल्या आहेत. पण त्यांच्या २० वर्षांच्या काळात काही जिल्हा झालाच नाही. ही नागरिकांची शोकांतिका आहे. १५ दिवस विविध कार्यक्रमांनी डॉ. मुंदडा यांचा वाढदिवस साजरा झाला.
वाढदिवस आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस मैदानावर सकाळी ९ वा. झेंडावंदन सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा प्रवक्ते बन्सी जोगदंड, मराठवाडा संपर्कप्रमुख बाळासाहेब दोडतले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य खमरुजमा सिद्दिकी, बाळासाहेब सोन्नर, योगिराज गडदे, सुखदेव देवकते, दत्ता काळे, बाबुराव गडदे, महादेव हाके, नामदेव खोडवे, तुकाराम वाघमोडे या ११ जणांनी अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे, अशा घोषणा देत मैदानावर येताच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.