Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांचा बंद यशस्वी
जकातीविरोधातील आंदोलन
औरंगाबाद १५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकेतून जकात रद्द करण्याच्या संदर्भात शासनाला देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर निर्णय न झाल्याने जकात निर्मूलन समितीच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत बंदचे आवाहन

 

करण्यात आले आहे. या आवाहनाला औरंगाबाद शहरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
या बंदमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गुलमंडी, औरंगपुरा, मछलीखडक, सराफा, शहागंज, मोंढा ही नेहमी गजबजलेली ठिकाणे ओस पडली होती. औरंगाबाद शहरातील आणि उपनगरातील सर्व व्यापारी पेठा लागोपाठ दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आल्या होत्या. जकात निर्मूलनाची मागणी मान्य होईपर्यंत बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मानसिंह पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर गेल्या आठवडय़ातील राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. रविवारी सोलापूर येथे राज्य जकात निर्मूलन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या बंदला मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर (मसीआ), औरंगाबाद टेलिकॉम संघटना आणि शिवसेना व्यापारी आघाडी यांनीही पाठिंबा दिला आहे.