Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ट्रकखाली चिरडून विद्यार्थ्यांचा मृत्यू; संतप्त विद्यार्थ्यांकडून ट्रक व बसची तोडफोड
हिंगोली, १५ ऑगस्ट/वार्ताहर

येथील माणिक स्मारक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणारा प्रकाश सुनेवार झेंडावंदनासाठी शाळेत जाताना ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत

 

अनेक बस व ट्रकची मोडतोड झाली. ट्रकचालकाला मारहाण झाल्याची त्याची प्रकृती चिंताजनक आहे. एक बस पेटविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे असफल झाला. काही काळ वातावरण तंग झाले होते, नंतर शिवसेनेच्या वतीने बाजारपेठ बंद पाडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
माणिक स्मारक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणारा १३ वर्षांचा विद्यार्थी प्रकाश दशरथ सुरेवार शिवराजनगर येथून झेंडावंदनासाठी शाळेत जाताना रामकृष्ण लॉजसमोर कळमनुरीकडून येणारा ट्रक (क्र. आरजे-०९-जीयू-१७१७) वाशिमकडे भरधाव वेगात जाताना त्या खाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जमलेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी त्या ट्रकवर दगडफेक केली. काही क्षणातच मोठा जमाव जमला. जमावातील काहींनी ट्रकचालक जितेंद्र जसवंतसिंग भुलतुबा (उत्तर प्रदेश) याला जबर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. सायं. ६ पर्यंत त्याची प्रकृती चिंताजनक होती.
तसेच देवडानगर परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठा जमाव जमा झाला. यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. या जमावाने सुरुवातीला सुमारे आठ ते १० ट्रकवर जबर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर यातील अर्धा जमाव परभणी रस्त्यावर अग्रसेन चौकात आला. तेथे त्यांनी रस्ता बंद आंदोलन सुरू केले. काही वेळातच परभणी-हिंगोली बस (क्र. एमएच-२०-डी-७५१७) परभणीकडून येताच जमावाने त्या बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. त्यानंतर आलेल्या तीन बसगाडय़ांवरही जमावाने तुफान दगडफेक करून बसचे नुकसान केले. काही वेळानंतर परभणी-हिंगोली बसला आग लावण्याचा प्रयत्न झाला. यात बसमधील एक-दोन सीट जळाल्या. पोलिसांनी तात्काळ जवळच्या हॉटेलमधून पाणी घेऊन बसला लागलेली आग विझविली. ही घटना सकाळी ६.३० वा. घडली. सुमारे ९ वाजेपर्यंत जमलेल्या जमावाने संताप व्यक्त करून वाहतूक बंद पाडली.
जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्कमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम होता तो त्यांनी आटोपता घेतला. विद्यार्थ्यांची घडलेली घटना व जिल्हाधिकारी कार्यालयातील सुट्टीवर असलेला शिपाई आश्रुबा महादा कापसे (४५) याने सकाळीच प्रशासकीय इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने आजच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला सुतकाची अवकळा आली होती. स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंतांचा आयोजित सत्कार कार्यक्रम या दोन्ही घटनांमुळे रद्द करावा लागला. शिपाई कापसेच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. शहर पोलिसात गजानन उत्तमराव कद्रेवार याच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संपर्कमंत्र्यांनी माणिक स्मारक शाळेला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केली आणि मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना शासनाकडून एक लाखाची मदत देण्याचे आश्वासन दिले. मृत विद्यार्थी हा घरातील एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे शिवसेनेने हिंगोलीची बाजारपेठ बंद पाडल्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते.