Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ठाण्यातील अपहृत मुली राजस्थानात सापडल्या
ठाणे, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

टोमॅटो खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण करणाऱ्या माय-लेकींना वागळे इस्टेट पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या मुलींना पाकिस्तान सीमेजवळील

 

कंजरबस्तीतून सोडविण्यात आले.
वागळे इस्टेटमधील इंदिरानगरमधील यास्मीन हनीफ शेख (११) आणि शफीनाज ऊर्फ सोनी अहमद शेख (७) या दोघींचे १९ जुलै रोजी अपहरण झाले होते. या दोघी सायंकाळी टोमॅटो आणण्यासाठी जवळच असलेल्या बाजारात गेल्या होत्या. मात्र त्या घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी वागळे इस्टेट ठाण्यात तक्रार दाखल केली. या मुलींना एका बारबालेने सोबत नेल्याचे टोमॅटो विक्रेत्याने सांगितले होते. हा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला असता त्या राजस्थानात असल्याचा सुगावा लागला. पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पोलीस पथकाने राजस्थानात तपास सुरू केल्यानंतर मुली पाकिस्तान सीमेलगत असलेल्या टाँक जिल्ह्यातील सोफ कंजरबस्ती भागात सापडल्या. त्यांना पळवून नेणारी बारबाला सोनिया राजाराम कंजर व तिची आई सागरबाई राजाराम कंजर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सोनिया ही पूर्वी किसननगरमधील बारमध्ये काम करीत होती. सात आणि अकरा वर्षांच्या मुली असल्याने त्यांना वाम मार्गाला न लावता सतत त्रास दिला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.