Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी..
‘स्वाइन फ्लू’च्या भीतीवर श्रद्धेचा विजय
राहाता, १५ ऑगस्ट / वार्ताहर

‘स्वाइन फ्लू’चा वेगाने होणारा फैलाव लक्षात घेता या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीत जाऊ

 

नका, तोंडावर माक्स वापरा, अशा वैद्यकीय सूचना धुडकावून लावत साईबाबांवर श्रद्धा ठेवून आज एक लाखांहून अधिक साईभक्तांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एकूणच ‘स्वाइन फ्लू’च्या भीतीवर श्रद्धेने विजय मिळविल्याचे चित्र शिर्डीत पदोपदी दिसत आहेत.
लाखो भाविक ‘स्वाईन फ्लू’ची भीती झुगारून लावत समाधी मंदिरात निर्धोकपणे साई दर्शनाचा आनंद लुटत आहेत. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दर्शन रांगेत व गर्दीत माक्स वापरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. काही भाविक मंदिर परिसरात माक्स वापरताना दिसतात. मात्र मंदिरात शिरताच गर्दी असूनही बिनदिक्कतपणे माक्स काढून टाकत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
लागोपाठ दोन दिवस सुट्टी आल्याने भक्तांचा शिर्डीत महापूर वाढण्यास सुरुवात झाली आहे. संस्थानने भक्तांच्या निवास व भोजनाची अतिरिक्त व्यवस्था केली असल्याने संस्थान प्रशासनावर कमी ताण पडला. भक्तांच्या गर्दीने शिर्डीतील रस्ते फुलून गेले होते. वाहनतळाची अडचण असल्याने रस्त्यावरची वाहतूक वारंवार विस्कळीत होत होती.