Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अनधिकृत बांधकामप्रकरणी स्थायी समिती सभापतींसह दोघांवर अपात्रतेची टांगती तलवार
ठाणे, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

अनधिकृत बांधकामप्रकरणी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकावरअपात्रतेच्या कारवाईचा निर्णय

 

घेण्यावरून कोंडीत सापडलेल्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे. वागळे इस्टेट भागात अनधिकृत बांधकामात सहभाग असल्याचा ठपका स्थायी समितीचे सभापती चंद्रगुप्त घाग आणि त्यांच्या पत्नीवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांवरही अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर पाठविण्याचे आदेश पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी दिल्यामुळे सेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी वर्तकनगर विभागातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बळीराम नईबागकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत येत्या महासभेत चर्चेला घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, असे आदेश गेल्याच आठवडय़ात मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावरून शिवसेनेची कोंडी झालेली असतानाच आपल्याच पक्षातील आणखी दोन नगरसेवक कायद्याच्या कचाटय़ात सापडल्याने सत्ताधारी पक्षामध्ये अस्वस्थता पसरली आहे. भटवाडी-किसननगर येथे राहणारे संजय घाडीगांवकर यांनी त्याच भागातील प्रभाग क्रमांक ८० च्या नगरसेविका संगीता घाग आणि प्रभाग ८१ चे नगरसेवक व स्थायी समिती सभापती चंद्रगुप्त घाग या दोघांविरोधात त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी तक्रार पालिका आयुक्त आणि नगरविकास विभागाकडे केली होती. त्यावर पालिका आयुक्तांनी कारवाई करावी, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त जंत्रे यांनी या प्रकरणावर ६ आणि १३ जुलै रोजी सुनावणी दिली. त्यानंतर आज आपला निकाल देताना जंत्रे यांनी या प्रकरणात अनधिकृत बांधकामप्रकरणी घाग दाम्पत्यावर ठपका ठेवला आहे.
वागळे इस्टेट येथील नलिनी अपार्टमेंट या इमारतीच्या अनधिकृत बांधकामामध्ये घाग दाम्पत्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे, तसेच या इमारतीमधील धन्वंतरी चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयातून आणि इमारतीवरील रिलायन्स कंपनीच्या टॉवरच्या भाडय़ापोटी घाग दाम्पत्यास उत्पन्न मिळत आहे. एल.बी. एस. मार्गावर दर्यासारंग हॉटेलजवळ देखील घाग यांनी अनधिकृत बांधकाम केले असून, त्यांच्यावर मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १० (१ ड) अन्वये अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी घाडीगांवकर यांनी केली होती. केवळ राजकीय आकसापोटी घाडीगांवकर यांनी आपल्यावर हे आरोप केले असून, नलिनी अपार्टमेंटच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी न्यायालयानेही आपल्याला दोषमुक्त केले आहे. त्यामुळे आपण कोणतेही नियमबाह्य कृत्य केले नसल्याचा दावा घाग दाम्पत्याने केला होता. मात्र त्यांचा हा दावा आयुक्तांनी फेटाळला असून, घाडीगांवकर यांनी केलेले आरोप ग्राह्य धरले आहेत. त्यानुसार घाग दाम्पत्यावर अनधिकृत बांधकामात सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर पालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ड) अन्वये अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठविण्यासाठी सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी पाठवावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.