Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

बाराशे कैद्यांना सर्दी-तापाची लागण
दिलीप शिंदे, ठाणे, १५ ऑगस्ट

स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावाने धास्तावलेल्या कारागृह प्रशासनाने सर्व कारागृहांमधील आजारी कैद्यांची माहिती मागविली असता सुमारे १२०० कैद्यांना ताप, सर्दी, खोकल्याची लागण झाल्याची माहिती

 

पुढे आली आहे. पुणे, मुंबई, ठाण्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना कारागृहात दाटीवाटीने ठेवण्यात आलेल्या कैद्यांबाबत गांभीर्याने पावले उचलण्यात आलेली नव्हती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कारागृहांमधील ताप आलेल्या संशयित कैद्यांची सिव्हिल रुग्णालयात नेऊन स्वाइन फ्लूसंबंधीची तपासणी करण्याचे निर्देश उपमहानिरीक्षकांकडून देण्यात आले आहेत. राज्यातील ३९ कारागृहांमधील सुमारे २६ हजार कैद्यांपैकी शेकडो कैदी सुनावणीसाठी कारागृहाबाहेर ये-जा करतात. त्यापैकी एखाद्या कैद्याला जर स्वाइन फ्लूची लागण झाली, तर कारागृहात हाहाकार माजेल. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांप्रमाणे कैदीही धास्तावले आहेत. पुरेसे मास्क उपलब्ध नसल्याने आता कैद्यांना रुमाल वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी ठेवण्यात आले आहेत. रोज सुमारे दहा टक्के कैदी विविध आजारांवर कारागृहातील डॉक्टरकडून उपचार घेत असतात. त्यापैकी बहुतेक रुग्ण हे ताप, सर्दी खोकल्याचे रुग्ण आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणेही तशीच असल्याने त्यांची योग्य तपासणी होणे गरजेचे आहे, म्हणून चार विभागांतील चार उपमहानिरीक्षकांनी सर्व कारागृहांकडून आजारी कैद्यांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. सुमारे १२०० कैद्यांना ताप, सर्दी, खोकल्याची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. म्हणून काही कारागृहांत स्वाइन फ्लूसंबंधीची जनजागृती आणि त्याबाबत घ्यावयाच्या काळजीसंबंधी डॉक्टरांचे मार्गदर्शन शिबिरे घेतली जात आहेत.